८ मार्च, २०१२

कल्पवृक्ष ‘गुगल’ ची कथा (18) - क्रमशः

के. राम श्रीराम
1998 च्या सुरूवातीस कधीतरी स्टॅनफोर्डमध्ये असतानाच प्रा. उलमन यांनी एका महत्त्वाच्या व्यक्तीची लॅरी-सर्जीशी ओळख करून दिली होती. त्या व्यक्तीबद्दल दोघांनीही स्टॅनफोर्डमध्येच बरच ऐकलंही होतं. जे ऐकलं होतं त्यातून दोघांच्याही मनात त्या व्यक्तीबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला होता. खास उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ती व्यक्ति भारतीय होती.


 -----------------------------------------------------------------------------------------
(वाचकांसाठी सूचनाः  ह्या लेखमालेतील हा अठरावा भाग आहे. सुरूवातीपासून भागांच्या क्रमानुसार वाचावं अशी विनंती आहे. त्यात अधिक रोचकता तर आहेच, पण स्थल, काल आणि नावे यांच्यातील सुसंबद्धताही त्याने साधली जाते. पूर्वीच्या भागांच्या लिंक्सः भाग 1,  पुढील लिंक्स )
----------------------------------------------------------------------------------------

गुगल आणि श्रीराम

लॅरी आणि सर्जी आपलं चंबूगबाळं घेऊन स्टॅनफोर्ड विद्यापीठाबाहेर पडले आणि सुसन वोजित्स्कीच्या गॅरेजमध्ये गेले. तिथून ते 165 युनिव्हर्सिटी अव्हेन्यू मध्ये हलले. दोन्ही ठिकाणचा मिळून तो काळ साधारणतः वर्षभराचाच आहे. त्या वर्षभराच्या काळात दोघांनीही स्टॅनफोर्ड विद्यापीठातून रजा मंजूर करून घेतलेली होती. पण, रजेवर असले तरीही, दोघेही, आणि विशेषतः सर्जी, स्टॅनफोर्डशी वारंवार संपर्क ठेवून होता. ह्या संपर्कामागे लॅरी-सर्जीचे काही निश्चित विचार आणि आडाखे होते. त्या विचार आणि आडाख्याचेही दोन भाग होते. पहिला भाग म्हणजे गुगलसाठी चांगले सहकारी तिथे काँप्युटर सायन्स विभागात मिळण्याची शक्यता असे. त्याच आडाख्यातून त्यांना पहिला सहकारी सीन अँडरसन मिळाला होता. पीएच.डी. सोडून तो गुगलमध्ये आला होता. अर्थात विद्यार्थ्यांनी पीएच.डी. सोडावी आणि आमच्याकडे यावं असा काही तो प्रयत्न नव्हता, पण भविष्यकाळाच्या दृष्टीनेही तेथून काही चांगले सहकारी मिळण्याची दाट शक्यता होतीच. आडाख्याचा दुसरा भाग म्हणजे वेगवेगळे अँजेल इन्व्हेस्टर्स, व्हेंचर कॅपिटल कंपन्यांचे मालक वा सर्वेसर्वा असणाऱ्या व्यक्तींचाही ह्या ना त्या कारणांनी स्टॅनफोर्डमध्ये राबता असे. यातल्या अनेक व्यक्ति ह्या काँप्युटर सायन्स विभागातील प्राध्यापकांच्या मित्रपरिवारातील असत. त्या प्राध्यापकांनी शब्द टाकला तर त्यातून गुगलसाठी भांडवल उभं राहण्याची दाट शक्यता असे. बेस्टोल्शीम यांनी जो एक लाख डॉलर्सचा चेक गुगलला दिला होता तोही स्टॅनफोर्डमधील एक प्राध्यापक चेरिटन यांच्याशी असलेल्या स्नेहाच्या माध्यमातूनच.
प्रा. जेफ्री उलमन
स्टॅनफोर्डमध्ये जेफ्री उलमन हे प्राध्यापक सर्जीचे पीएच.डी. चे सल्लागार होते. उलमन 1979 पासून स्टॅनफोर्डमध्ये काँप्युटर सायन्स विभागात प्राध्यापक होते, आणि डेटा इंटेग्रेशन आणि डेटा मायनिंग हे त्यांचे खास विषय होते. त्यांचे मार्गदर्शन सर्जी-लॅरी यांना स्टॅनफोर्डमधून बाहेर पडल्यानंतरही मोलाचे वाटत असे. 1998 च्या सुरूवातीस कधीतरी स्टॅनफोर्डमध्ये असतानाच प्रा. उलमन यांनी एका महत्त्वाच्या व्यक्तीची लॅरी-सर्जीशी ओळख करून दिली होती. त्या व्यक्तीबद्दल दोघांनीही स्टॅनफोर्डमध्येच बरच ऐकलंही होतं. जे ऐकलं होतं त्यातून दोघांच्याही मनात त्या व्यक्तीबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला होता. खास उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ती व्यक्ति भारतीय होती. अमेरिकेत इंटरनेटचे युग खऱ्या अर्थाने बहरायला सुरूवात झाली ती 1994 च्या आसपास. त्या काळापासून इंटरनेट आणि संगणकाच्या जगात त्या भारतीय व्यक्तीच्या कर्तृत्वाचा दबदबा निर्माण झाला होता. त्या व्यक्तीशी प्रा. उलमन आपला परिचय करून देत आहेत याचं मोठच अप्रुप लॅरी आणि सर्जी यांना वाटणं अगदी स्वाभाविक होतं.
त्या भारतीय व्यक्तीचं नाव आहे कवितर्क राम श्रीराम. गुगलच्या कथेत आपण गुगलच्या स्थापनेच्या अगोदरपासून राजीव मोटवानी आणि नंतर विनोद खोसला ही नावे ऐकली आहेत. राजीव मोटवानी अल्पायुषी ठरले आणि त्यांची साथ अर्ध्यावरच सुटली. विनोद खोसला ही अतिशय बुजुर्ग असामी होती. गुगलचं तंत्रज्ञान एक्साईट सर्च इंजिनने विकत घ्यावं यासाठी सर्जी-लॅरीला त्यांनी मनापासून मदत केली होती. पण त्याला यश आलं नव्हतं. आता राम श्रीराम यांच्या रूपाने आणखी एक भारतीय दोघांना भेटला होता. राम श्रीराम हा मध्यम देहयष्टीचा, अतिशय विनम्र पण हंसतमुख चेहेऱ्याचा काहीसा सावळ्या वर्णाचा मितभाषी माणूस पहिल्या भेटीतच दोघांनाही आवडला. लॅरी-सर्जींनी त्यांना आपल्या गुगल सर्चचे प्रात्यक्षिक दाखवले. राम श्रीराम यांनी त्या संदर्भात काही नेमके प्रश्न दोघांना विचारले. त्याची उत्तरे घेतल्यानंतर श्रीराम यांनी त्यांच्या समोर स्वतःच काहीतरी सर्च करून पाहिला. त्यावेळी असलेली निरनिराळी सर्च इंजिन्स आणि गुगल यांच्यावरच्या सर्चमध्ये नेमका काय फरक आहे हे प्रत्यक्ष पाहिल्यावर श्रीराम यांची खात्री पटली की गुगलवर अधिक चांगल्या संदर्भाचे सर्च रिझल्टस मिळत आहेत. सर्चच्या क्षेत्रात आणखी एका सर्च इंजिनची गरज आहे की नाही हे मला सांगता येणार नाही. पण, तुमची सर्च टेक्नॉलॉजी मात्र चांगली आहे. तुम्ही ती लायसन्स तत्त्वावर देऊन इतर एखाद्या सर्च इंजिनला विकायला हवी. त्यासाठी प्रयत्न करायला हवाअसं मत राम श्रीराम यांनी दोघांपुढे मांडलं. मात्र, त्या भेटीत त्यांनी स्वतःकडून काही भांडवल गुगलसाठी देऊ केलं नाही.
भांडवल मिळालं नाही याची रूखरूख मनात असली तरी राम श्रीराम ह्या व्यक्तीची भेट झाल्याचं समाधान लॅरी आणि सर्जी दोघांच्याही मनात होतं. श्रीराम यांच्या म्हणण्याप्रमाणे आपलं तंत्रज्ञान विकण्याचा प्रयत्न करायचा निर्धारही त्यावेळी दोघांनी केला. त्यानुसार याहू, इन्फोसीक आणि एक्साईट अशा तीन सर्च इंजिन्सच्या मंडळींशी त्यांनी चर्चाही केली. पण हाती निराशाच आली. दोघांच्याही मनात राम श्रीराम यांच्याबद्दल आशा निर्माण झाल्या होत्या. काही महिन्यांचा काळ मागे पडल्यानंतर राम श्रीराम यांच्याशी दोघांनी पुन्हा संपर्क साधला. तुम्हाला पुन्हा एकदा भेटू इच्छितो अशी विनंती त्यांनी श्रीराम यांना केली. त्या विनंतीवरून श्रीराम यांच्या एक लक्षात आलं की गुगलवाल्यांचं अजून कुठे काही जमलेलं दिसत नाही. एक सौजन्याचा भाग म्हणून त्यांनी लॅरी सर्जीला भेटायला बोलावलं असलं तरी त्यांच्या कंपनीत भांडवल गुंतवावं असा कसलाही विचार श्रीराम यांच्या मनात तोपर्यंत आलेला नव्हता.
ठरल्याप्रमाणे लॅरी सर्जी स्टॅनफोर्डपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या junglee.com च्या ऑफिसमध्ये श्रीराम यांना भेटायला गेले. तो महिना बहुधा मे 1998 असल्याचं श्रीराम यांना आठवतं. भेट झाल्यावर दोघांनी आपले अनुभव श्रीराम यांच्यासमोर कथन केले. आम्ही याहूच्या जेरी यांग आणि डेव्हिड फिलो यांना भेटलो. त्यांना आमची टेक्नॉलॉजी खूपच आवडली. खूपच म्हणजे खूपच. पण त्यांनी एक वेगळाच मुद्दा मांडला. ते म्हणाले की गुगल टेक्नॉलॉजी नेमक्या संदर्भाचे सर्च रिझल्टस देत असल्याने त्यांची पाने खूपच कमी होतात. आमच्या प्रत्येक पानांवर जाहिराती आहेत. पाने कमी झाली तर जाहिरातींचा प्रभावही कमी होतो. म्हणजे दहा पानांऐवजी फक्त दोन-तीनच पानं पाहिली तर याहूचे पेज व्ह्यूज कमी होतात.
श्रीराम यांनी दोघांचं हे कथन ऐकलं आणि त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. अरे ही तर disruptive technology !” याहू आणि एक्साईट वाल्यांना आपली साईट पोर्टल म्हणून विकसित करायची आहे. त्यांना सर्च हा त्यापुढे कमी महत्त्वाचा वाटतो आहे ही बाब त्यातून स्पष्ट होते हे श्रीराम यांच्या लक्षात आलं. गुगल ला तर केवळ उत्तम सर्च इंजिन म्हणून पुढे यायचं आहे. म्हणजे गुगलला विकासाचा महामार्ग मोकळा झालेला आहे. श्रीराम यांच्या मेंदूत एक काँप्युटर इंजिनीयर आणि एक एम.बी.ए. एकाच वेळी गुगलला जोखत होते. सिलिकॉन व्हॅलीतला अनेक महिन्यांचा त्यांचा अनुभवही त्याच्या गाठीला होता. गुगल हे एका मोठ्या वृक्षाचं बियाणं आहे ही बाब श्रीराम यांनी तात्काळ ओळखली.
दुसरीकडे सर्जी आणि लॅरी यांची गरज तातडीची होती. स्टॅनफोर्डमधून त्यांना बाहेर पडायचं होतं. काँप्युटर्स आणि इतर साधनांसाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. ते त्यांना तातडीने हवे होते. राम श्रीराम यांनी गुगलमध्ये पैसे गुंतवण्यास आपण तयार असल्याचं दोघांना सांगितल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला. स्टॅनफोर्ड विद्यापीठाशी बोलून तिथेही त्यांना काय मदत करता येईल हे पहाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ही घटना साधारणतः  मे 1998 ची. पुढे ऑगस्ट 1998 मध्ये बेस्टोल्शीम यांनी 1 लाख डॉलर्सचा चेक गुगलला दिला आणि गुगलचे ते पहिले गुंतवणूकदार ठरले. त्या पाठोपाठ 4 सप्टेंबर 1998 रोजी गुगलची कंपनी म्हणून रितसर नोंदणी झाली. Google Inc ही कंपनी जन्माला आली. नव्याने स्थापन झालेल्या Google Inc च्या संचालक मंडळामध्ये एक नाव भारतीय होते – कवितर्क राम श्रीराम. ह्याच दिवशी राम श्रीराम यांनी आपल्या भांडवलाच्या सहभागाचा चेक सर्जी लॅरीला दिला. चेकवर त्यांनी रक्कम लिहीली 2,50,000/- (अक्षरी दोन लाख पन्नास हजार डॉलर्स फक्त).
असे हे कवितर्क राम श्रीराम ही असामी नेमकी आहे तरी कोण, तिची भारतीय पार्श्वभूमी नेमकी कशी आहे ते पाहू पुढल्या 19 व्या भागात. 

1 वाचकांशी संवाद/कॉमेंटस:

Unknown म्हणाले...

Sir,I read your article in Dainik Punya Nagari News paper.Your all articles are excellent.I wish that they should read by each and every person related to the IT field.

टिप्पणी पोस्ट करा