२७ फेब्रु, २०१२

बिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-6)

जामिन मिळाल्यानंतरची मुद्रा..
वाचकहो, गेल्या बुधवारी म्हणजे 22 फेब्रुवारी 2012 रोजी न्युझीलंड न्यायालयाने त्याला जामिन दिला. कीम डॉटकॉम आता पुन्हा आपल्या हवेलीत पोहोचला आहे. जामिन देताना कोर्टाने दोन अटी कीम डॉटकॉमला घातल्या आहेत. एक, त्याने त्याचं विमान वापरायचं नाही. दुसरी, त्याने इंटरनेट वापरायचं नाही. ज्याने आपलं आडनाव बदलून डॉटकॉमअसं घेतलं त्याने इंटरनेट वापरायचं नाही”  असा विनोद नियतीने केला आहे. 
कीम डॉटकॉम ह्या हॅकरची कथा गेले चार आठवडे आपण इथे संगणक डॉट इन्फोवर  वाचतो आहोत. त्याला 21 जानेवारी 2012 रोजी अटक झाली, आणि महिनाभरात दोन वेळा न्युझीलंडच्या न्यायालयाने त्याला जामिन नाकारला. पण वाचकहो, गेल्या बुधवारी म्हणजे 22 फेब्रुवारी 2012 रोजी न्युझीलंड न्यायालयाने त्याला जामिन दिला. कीम डॉटकॉम आता पुन्हा आपल्या हवेलीत पोहोचला आहे. जामिन देताना कोर्टाने दोन अटी कीम डॉटकॉमला घातल्या आहेत. एक, त्याने त्याचं विमान वापरायचं नाही. दुसरी, त्याने इंटरनेट वापरायचं नाही. “ज्याने आपलं आडनाव बदलून ‘डॉटकॉम’ असं घेतलं त्याने इंटरनेट वापरायचं नाही” असा विनोद नियतीने केला आहे. 
डॉटकॉमला अटक करण्याचा खरा इरादा होता तो अमेरिकन गुन्हे अन्वेषण विभागाचा म्हणजे ‘एफबीआय’ चा. त्यांना कोणत्या गुन्ह्यांसाठी कीम हवा आहे? ह्या प्रश्नाच्या उत्तराशी थेट संबंधित आहे ती कीम डॉटकॉमची megaupload.com ही वेबसाईट. ही वेबसाईट आता एफबीआय ने बंद केली आहे.  एफबीआयचा तसा फतवाच आज त्या संकेतस्थळावर आपण आज गेलो तर वाचायला मिळतो. जगभरच्या लोकांना त्यांची सॉफ्टवेअर, गाणी, किंवा सिनेमे वगैरे मोफत अपलोड करून तेथे साठविण्याची सोय megaupload.com देत असे. जगातले करोडो लोक ह्या मोफत सेवेचा लाभ घेत असत. मोफत सेवा देऊन कीम पैसा कसा मिळवित असे असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. पण त्याचं उत्तरही सोपं आहे. ह्या वेबसाईटवरची मोफत सोय वापरायची तर काही मर्यादा असत. उदाहरणार्थ डाऊनलोड वा अपलोड करण्यासाठी काही मिनिटे थांबावं लागे. डाऊनलोडचा वेगही कमी असे. पण विशिष्ट रक्कम भरून प्रिमियम मेंबरशीप घेतली की वेगही वाढे आणि मर्यादाही दूर होत. त्यामुळे पैसे भरणारेही जगात लाखोंच्या संख्येने असत. तो पैसा अर्थातच कीम डॉटकॉमच्या तिजोरीत जमा होई. megaupload.com वर लोक चोरीची सॉफ्टवेअर, गाणी, चित्रपट, पुस्तके वगैरे अपलोड करतात आणि तिथून ती जगभर पसरतात याला कीम डॉटकॉम जबाबदार आहे असा मुख्य आरोप अमेरिकेने त्याच्यावर ठेवला आहे. यामुळे 500 दशलक्ष डॉलर्सचे म्हणजे सुमारे 2500 कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे असा त्यांचा दावा आहे. 
डॉटकॉमचा न्युझीलंडमधला प्रवेशही सहजपणे झाला नव्हता. त्यासाठी त्याने खूप खटपटी लटपटी केल्या. न्युझीलंड सरकारच्या इन्व्हेस्टमेंट बाँडसमध्ये त्यासाठी त्याने सुमारे 50 कोटी रूपये गुंतविले. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहराच्या किनाऱ्यावर 1 जानेवारी नववर्षाच्या पहाटे प्रचंड आतषबाजी आकाशात करण्याची परंपरा आहे. पण तेवढा खर्च शेजारच्या न्युझीलंडला परवडत नसल्याने सिडनीसारखी आतषबाजी तिथे होत नसे. ही व्यथा न्युझीलंडच्या महापौरांनी कीम डॉटकॉमला बोलून दाखविल्यावर त्याने स्वतःच्या खर्चाने म्हणजे 25 कोटी रूपये खर्चून नेत्रदिपक अशी रोषणाई न्युझीलंडच्या किनाऱ्यावर 31 डिसेंबर 2011च्या मध्यरात्री केली. स्वतःच्या विमानातून त्या रोषणाईची हवाई पहाणीही त्याने केली.  महापौर महाशय त्यामुळे भलतेच खूष झाले. पण अमेरिकन दबावामुळे कीमसाहेब पुढल्या वीस दिवसांतच न्युझीलंड सरकारच्या लॉकअपमध्ये गेले. कीमला अटक होताच Anonymous नावाच्या हॅकर ग्रुपने अटकेचा सूड घेतला. एफबीआय, न्युझीलंड पोलीस, अमेरिकन न्याय मंत्रालय वगैरेंच्या वेबसाईटसवर ‘डिनायल ऑफ सर्व्हिस’ तंत्राने हॅकर्सनी हल्ला केला. ते प्रकरणही गाजले. आज कीम डॉटकॉमकडे एकही वाहन नाही. सुमारे वीस गाड्या, सर्व रोकड रक्कम सरकारने जप्त केली आहे. बँकांची खाती गोठवल्याने तिथूनही पैसा मिळू शकत नाही. हवेलीतली करोडो रूपयांची पेंटींग्ज आणि मौल्यवान वस्तूही जप्त करण्यांत आल्या आहेत. जो 280 किलोमीटर वेगाने गाडी चालवायचा त्या कीमला आता, न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्या हवेलीपासून जास्तीत जास्त 80 किलोमीटरपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे. असा हा कीम डॉटकॉम. एक चाकोरीबाहेरचं जीवन जगणारा चक्रम माणूस. तो चांगला की वाईट हा मुद्दा कायम वादाचाच राहणार. पण अनेकांच्या मते, तो अमेरिकन सरकारला ताब्यात मिळणं फार अवघड आहे. कारण तो जिथे राहतो त्या न्युझीलंडचे कायदे, किंवा तो ज्या देशाचा नागरिक आहे त्या जर्मनी आणि फिनलंडचे कायदे पाहता त्याला अमेरिकेत हद्दपार करण्यासाठी काही वर्ष लागतील. खेरीज, जर SOPA आणि PIPA सारखे कायदे नसतील तर अमेरिकन न्यायालयातही कीम निर्दोष सुटेल. कीमसाठी जगातले सर्वांत महागडे वकील आज कायद्याचा कीस काढत आहेत. कीमची कथा आज आपण संगणक डॉट इन्फोपुरती संपवली असली तरी कीम डॉटकॉमची कहाणी भविष्यकाळात पुढे सरकतच राहणार आहे. 
-----------------------------------------------------------
न्युझीलंडच्या किनाऱ्यावर 25 कोटीचे फटाके उडवून
कीम डॉटकॉमने नव्या वर्षाचे स्वागत केले
 त्याचा हा यु ट्युब व्हिडिओ.

९ टिप्पण्या:

 1. its always interesting to read hackers story. As same you written in your book about Kevin Mitnick.
  Really nice !

  उत्तर द्याहटवा
 2. केविन मिटनीक ह्या हॅकरबद्दल मी ऐकून आहे. त्याची कथा संगणक डॉट इन्फो वर देता येईल का? माझ्यासारखेच त्या बद्दल curiosity असणारे बरेच आहेत.

  उत्तर द्याहटवा
 3. केविन मिटनीक हा हॅकींगच्या इतिहासातला सर्वांत मोठा म्हणता येईल असा हॅकर. तो अनेक वर्षे फरारी होता आणि एफबीआय त्याचा शोध घेत होती. तो एफबीआयला सापडला नसता, पण शीमोमुरा नावाच्या संगणक तज्ज्ञाच्या वाटेला तो गेला आणि मग शीमोमुराने त्याची खोड मोडायचं ठरवलं. शीमोमुरा आणि एफबीआय एकत्र आले आणि केविन मिटनीकचा ठावठिकाणा त्यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करूनच शोधला. ती कथा जबरदस्त आहे. माझ्या संगणक जगत ह्या पुस्तकात ती आहे.

  उत्तर द्याहटवा
 4. सर,
  खुपच छान साइट आहे, माझ्यासारख्या मराठी संगणकवेड्यासाठी फारच सोईचे साइट आहे. संगणकाविषयीची कित्येक मनोरंजनात्मक माहिती या एकाच साइटवरुन मिऴतो.

  धन्यवाद सर.....

  उत्तर द्याहटवा
 5. Thanks sir, very good article and I have ur book Sanganak jagat. Everything is awesome.

  उत्तर द्याहटवा
 6. अतिउत्‍तम साईट आहे सर्वांना फायदाच होईल एकदा अवश्‍य भेट दयावी

  उत्तर द्याहटवा