६ फेब्रु, २०१२

बिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-3)

फेब्रुवारी 2012 चा पहिला आठवडा संपत आला तरी
 अजून जामिन नाही. 
 टेलीफोन लाईन आणि मॉडेमच्या सहाय्याने शहरातल्या इतर काँप्युटर्सशी संपर्क साधण्याचा झपाटा मग सुरू झाला. हॅकर बनण्याची बीजं त्यात होती. टेलीफोन कंपन्यांच्या संगणकात बिले कमी करण्यासाठी शिरायचं तर त्यांची सॉफ्टवेअर सुरक्षा तोडावी लागे. कीम त्याच पद्धतीने दुसऱ्या संगणकांमध्ये व नेटवर्क्समध्ये शिरू लागला. आता हॅकर म्हणूनही तो पक्का तयार झाला होता. हॅकींगसाठी त्याने टोपणनावही घेतलं – किंबल.  

कीम डॉटकॉम ह्या हॅकरला 21 जानेवारी 2012 रोजी न्युझीलंडमधील त्याच्या आलिशान हवेलीवर धाड टाकून अटक करण्यांत आली हे आपण मागे वाचलं. कीमने आपलं डॉटकॉम हे आडनाव नंतर बदललं असलं तरी त्याचं मूळ आडनाव ‘श्मिट’ आहे हेही आपण पहिल्या भागात पाहिलं होतं. श्मिट हे तद्दन मध्यमवर्गीय कुटुंब मूळ उत्तर जर्मनीतल्या कीइल शहरातलं. तिथेच कीमचा जन्म 21 जानेवारी 1974 रोजी झाला. कीमच्या आईवडिलांना तीन मुलं. त्यातला कीम तिसरा. शेंडेफळ. कीमचे वडिल एका छोट्या क्रुझ जहाजावर कॅप्टन म्हणून नोकरीला होते. कीमची आई स्वयंपाकी म्हणून काम करीत असे. कीम लहानपणापासून हुशार आणि बुद्धीमान पण अत्यंत ‘अत्रंग कार्ट’ म्हणावं असा. ‘मोठेपणी मी करोडपती होणार’ हे कीम लहानपणापासूनच म्हणत असे. त्याचं हेच उत्तर पुढे सतत त्याचा पाठलाग करत राहिलं. आई आणि वडिल दोघेही सतत बाहेर असल्याने कीमच्या हुडपणाला धरबंध राहिला नाही. 
तशात 1981 साली कीमच्या नवव्या वाढदिवसाला भेट म्हणून काँप्युटर मिळाला. ‘माकडाच्या हाती कोलीत’ अशातलाच तो प्रकार होता. वयाच्या नवव्या वर्षापासून कीम संगणकाला जो चिकटला तो आजतागायत. संगणकासाठी जी सॉफ्टवेअर फ्लॉपीवर यायची त्यांची कॉपी होऊ नये यासाठी त्यांना सॉफ्ट लॉक्स किंवा कॉपी प्रोटेक्शन लावलेली असत. कीम महाशयांना ती लॉक्स तोडण्याचा छंद लागला. वय वर्षे 10, 11 आणि 12 हा खरं तर बालपणाचा निष्पाप काळ. पण त्या तीन वर्षात सॉफ्टवेअर लॉक तोडण्यासाठीचं प्रचंड कौशल्य कीमनं स्वतःच स्वतःचा गुरू बनून आत्मसात केलं. वयाच्या 12 वर्षी, म्हणजे साधारणतः 1984 च्या आसपास, अशी तोडलेली सॉफ्टवेअर कीम फुटकळ किंमतीला विकू लागला. कीमच्या हातात पैसा खेळू लागला तो अशा नादान वयात. खेरीज लोकांनाही अशी स्वस्त सॉफ्टवेअर हवीच असत. त्यासाठी कीमला मस्का लावणारेही कमी नव्हते. कीम किंचित किंचित लोकप्रिय आणि किंचित किंचित श्रीमंत व्हायला लहानपणीच अशा प्रकारे सुरूवात झाली.
सॉफ्टवेअरची कुलुपं तोडण्यासाठी प्रोग्रामिंगचं कौशल्य आवश्यक असे. त्यासाठी कीम प्रोग्रामिंग शिकत राहिला. वयाच्या 15 व्या वर्षी म्हणजे 1987-88 च्या सुमारास तो उत्कृष्ट प्रोग्रामर बनला होता. ह्याच सुमारास मॉडेम्स बाजारात आले होते. कीम साहेबांचं लक्ष त्याकडे गेलं नसतं तरच नवल. मॉडेम म्हंटलं की त्यासाठी टेलीफोन लाईन आवश्यक असे. टेलीफोन मॉडेमला लावला की टेलिफोनचं बिल मात्र आभाळाला भिडू लागे. टेलिफोनचं बिल हा कीमच्या मार्गातला अडसर होता. कीमने टेलीफोनचं मीटर न वाढता कॉल करण्याचं तंत्र शोधलं. बिल न येता भरपूर फोन वापरण्याची त्याची सोय आता झाली होती. पुढे टेलिफोनचं बिल कमी करणारं ‘ब्ल्यू बॉक्स’ नावाचं एक सॉफ्टवेअरच कीमने तयार केलं. त्याच्या 100 प्रतीही विकल्या. टेलीफोन लाईन आणि मॉडेमच्या सहाय्याने शहरातल्या इतर काँप्युटर्सशी संपर्क साधण्याचा झपाटा मग सुरू झाला. हॅकर बनण्याची बीजं त्यात होती. टेलीफोन कंपन्यांच्या संगणकात बिले कमी करण्यासाठी शिरायचं तर त्यांची सॉफ्टवेअर सुरक्षा तोडावी लागे. कीम त्याच पद्धतीने दुसऱ्या संगणकांमध्ये व नेटवर्क्समध्ये शिरू लागला. आता हॅकर म्हणूनही तो पक्का तयार झाला होता. हॅकींगसाठी त्याने टोपणनावही घेतलं – किंबल.
1991 ते 1993 हा इराक-अमेरिकेच्या युद्धाचा काळ. योगायोगाने ऑनलाईन भ्रमंती करताना त्या काळात कीम अमेरिकन संरक्षण खात्याच्या म्हणजे पेटागॉनच्या संगणकांमध्ये शिरला. पेंटागॉनच्या 100 संगणकांमधली माहिती त्याच्यापुढे हात जोडून उभी होती. अमेरिकेशी कीमने पहिला पंगा घेतला तो हा. 1993 साली कीम होता फक्त 19 वर्षांचा. पेंटागॉनचे काही संगणक सॅटेलाईटशी जोडलेले होते. कीमही त्यामुळे जर्मनीत बसून सॅटेलाईटशी जोडला जाऊन सद्दाम हुसेनच्या राजवाड्यावर टेहळणी करू लागला होता. कीम एका मुलाखतीत म्हणतो की “मला अलिबाबाची एक गुहाच सापडली होती”. आणि नंतर आलं 1996 साल. कीमचं वय फक्त 22. नुकतीच मिसरूडं फुटण्याचा तो काळ. सकाळी 6.00 वाजताची वेळ. कीमच्या फ्लॅटची बेल वाजली. दरवाजा उघडला तर समोर मशिनगनधारी पोलिस कमांडो उभे. कीमची बकोट पकडून त्यांनी त्याला गाडीत कोंबले. बाविस वर्षाच्या कीमचा तो पहिला तुरूंगवास. तिथून मग पुढे काय झालं. कीम नंतर अब्जोपती कसा झाला? न्युझीलंडमध्ये कसा पोहोचला? त्याने आणखी काय काय उद्योग केले? पाहू या पुढल्या भागात..

५ टिप्पण्या: