३० जाने, २०१२

बिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-2)

 आपण पाहिलं की कीम डॉटकॉम ह्या हॅकरच्या न्युझीलंडमधील हवेलीवर दोन हेलीकॉप्टर्स उतरली आणि त्यातून एकूण 76 पोलीस कमांडो उड्या टाकत त्याला पकडण्यासाठी सरसावले. हवेलीचे इलेक्ट्रॉनिक लॉकचे दरवाजे तोडत पोलीस आत शिरले. पोलीसांना हवेलीच्या आतला भाग हा एक भुलभुलैय्याच वाटला. बंद होणारे इलेक्ट्रॉनिक दरवाजे आणि एका आत एक भपकेबाज दालनं.
पोलीस कमांडो हातातल्या मशिनगन्स सरकवत एक एक दालन काबीज करीत होते. तर, आत कीम डॉटकॉम इकडून तिकडे सरकत होता. सहजासहजी हातात येत नव्हता. कुटुंबिय, स्टाफ, त्याचे पाहुणे आणि मित्र पोलीसांच्या ताब्यात आले होते. पण कीम डॉटकॉम दृष्टीपथात येत नव्हता.

खरं तर कीम डॉटकॉमचं वजन आहे 136 किलोग्रॅम. (अक्षरी, एकशे छत्तीस किलो फक्त). उंची 6 फूट 7 इंच. 
कीम डॉटकॉम क्लोज अप
असं हे 38 वर्षे वयाचं अजस्त्र धूड पोलीसांच्या दृष्टीपथात येऊ नये? कसं शक्य आहे? कीम दिसत नव्हता कारण तो होता हवेलीतल्या सेफ रूममध्ये. ही सेफ रूम म्हणजे एक अजस्त्र चिलखतच होतं. बंदुकीच्या गोळ्या असोत की बॉम्बस्फोट, आतला माणूस त्यात सेफ राहील अशी व्यवस्था म्हणजे ती सेफ रूम. त्या सेफ रूममध्ये आत एक शॉटगन घेऊन कीम आरामात बसला होता. पोलीस त्या सेफ रूमशी पोहोचले आणि कीमच्या खुर्चीच्या शेजारी जेव्हा त्यांना ती शॉटगन दिसली तेव्हा ते काहीसे बचावात्मक पवित्र्यात गेले. पोलीसांच्या गोळ्या त्या सेफ रूमला भेदू शकत नव्हत्या. सेफ रूमच्या एखाद्या भोकातून कीमने मशिनगन चालवली असती तर समोरचा एकही कमांडो शिल्लक राहिला नसता. प्रशिक्षित कमांडोंनी कीम डॉटकॉमला शेवटचा इशारा दिला - ‘शरण ये, नाही तर.....’ 
कीमची बायको मोना गरोदर आहे, आणि एप्रिल 2012 मध्ये तिला जुळ्या मुली होणार आहेत. त्या जुळ्या मुली धरून डॉटकॉम पतीपत्नींवर एकूण 5 मुलांच्या संगोपनाची जबाबदारी असणार आहे. तसा डॉटकॉमला तुरूंगाचा अनुभवही नवा नाही. 
ही आणखी एक मुद्रा..
अधिकाऱ्यांना ‘मॅनेज’ करणं, बडे वकील देणं हा तर त्याच्या ‘बाये हात का खेल’. शिवाय ‘सिर सलामत तो पगडी पचास’ हे जाणलं नाही तर तो कीम कसला. आपला अब्जावधी किंमतीचा 136 किलोचा देह न्युझीलंड पोलीसांच्या गोळ्या खाऊन हुतात्मा व्हायला कीम म्हणजे काही मूर्ख अतिरेकी नव्हे. पण एवढं असूनही कीमने सहजासहजी शरणागती पत्करली नाही. शेवटी ती सेफ रूम फुटली. पोलीस आत शिरले. आत गोरापान कीम डॉटकॉम दोन्ही हात वर करून पोलीसांना सहजपणे शरण आला. कितीतरी वाचकांनी त्या हवेलीचे फोटो इंटरनेटवर कुठे पहायला मिळेल असा प्रश्न मला विचारला. वाचकांनी त्यासाठी www.sanganak.info ह्या संकेतस्थळावर जावं, आणि कीम आणि त्याची हवेली डोळे भरून पहावी. जी मंडळी येत्या आठवड्यात चंद्रपूरच्या साहित्य संमेलनाला जाणार असतील त्यांनी अवश्य संगणक प्रकाशनच्या स्टॉलला भेट द्यावी. तेथे जिज्ञासूंसाठी कीम डॉटकॉमची सविस्तर माहिती आणि इतर हॅकर्सच्या अचाट कथा उपलब्ध आहेत. 
मंडळी, ज्याच्यावर 2500 कोटी रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा अमेरिकेचा आरोप आहे अशा कीम डॉटकॉमची थरारक कहाणी आत्ता कुठे सुरू झाली आहे.

कीम डॉटकॉमला चार हॅकर सहकाऱ्यांसह अटक केल्यानंतर पोलिसांनी एका रांगेत उभे केले तेव्हा...
न्युझीलंड सरकार बहुधा लवकरच त्याला अमेरिकेच्या ताब्यात देईल. अमेरिकेत त्याची केस चालवण्यासाठी नामांकित वकील रॉबर्ट बेनेट यांना त्याने अगोदरच पाचारण केले आहे. रॉबर्ट बेनेट म्हणजे बिल क्लींटन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असताना त्यांचा सेक्स स्कँडलचा खटला चालवणारे, तसेच एनरॉन कंपनीचे बडे वकील. ते कीमला सोडवू शकतील का? कीम डॉटकॉम बद्दल जगभरच्या हॅकर्सना आज काय वाटते? कीम डॉटकॉमला पकडल्यावर संतापून त्यांनी अमेरिकन सरकारच्या कोणत्या वेबसाईटस हॅक केल्या? कीम डॉटकॉम ओसामा बिन लादेनला आपला शत्रू मानत असे. लादेनला पकडण्यासाठी अमेरिकेने 50 लाख डॉलर्सचे बक्षीस लावले होते. पण, कीम म्हणजे अमेरिकन सरकारचे पिताश्री ! ह्या महाशयांनी स्वतःच्या तर्फे 100 लाख डॉलर्सचे खाजगी बक्षीस लावून अमेरिकन सरकारला अपशकुन केला. कीमने नेमकं काय काय केलं? ह्या आणि अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी पहायला हवं कीम डॉटकॉमचं थरारक पुर्वायुष्य. त्यावर नजर टाकू  तिसऱ्या भागात..लवकरच. वाचकहो,  ही कथा पाच भागांत संपेल. दर मंगळवारी पुढील भाग तुमच्यासमोर येईल..

७ टिप्पण्या:

 1. Compiling and organising a lot of data about Google, presently. Would definitely come out with a valid stuff soon.. Thanks for your interest.

  उत्तर द्याहटवा
 2. फारच छान माहिती आहे. पुढच्या भागांची प्रतिक्षा आहे सोबत कल्पवृक्ष ‘गुगल’ ची कथा (16)
  नंतरचे भागांची वाट पहात आहे.

  उत्तर द्याहटवा
 3. this is like the story of Allandin in good olden days.
  But very smart Guy. Hatoff to you for giving us the insight of this.

  उत्तर द्याहटवा