३० जाने, २०१२

बिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-1)

2012 चा पहिला जानेवारी महिना नुकताच संपला. पण, ह्या वर्षातील सर्वांत वेधक घटनांपैकी एक ह्या महिन्यांत घडली आहे. ही ताजी बातमी आहे गेल्या शनिवारची म्हणजे 21 जानेवारी 2012 ची.
21 जानेवारी, वेळ सकाळी साडेसहा पावणेसातची. स्थळ न्युझीलंडमधला ऑकलंड हा अत्यंत निसर्गरम्य परिसर. ऑकलंडमध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी हा उन्हाळ्याचा काळ. पण तापमान असतं जास्तीत जास्त 23 डिग्री सेल्सियस. म्हणजे उन्हाळा नव्हेच, सुखद हिवाळाच बारा महिने. अशा वातावरणात एखादा हिल स्टेशनसारखा हिरवागार परिसर डोळ्यासमोर आणा. ऑकलंड तसं आहे. अशा ऑकलंडमध्ये संपूर्ण न्युझीलंड देशातली सर्वांत आलिशान अशी हवेली आहे. राजवाड्यालाही लाजवील अशी. माणसांचा राहण्याचा कारपेट एरियाच 25,000 चौरस फुटांचा. आजूबाजूला सुंदर, विस्तीर्ण, हिरवं-पोपटी लॉन, त्यावर अनेक कारंजी, सर्वत्र सुंदर वनराई. असा एकूण सुमारे 26 लाख स्क्वेअर फुटांचा (म्हणजे 60 एकरांचा) ऐसपैस परिसर. अशा त्या हवेलीचे
फोटो इंटरनेटवर पहायला मिळतात. ते फोटो पाहिले तरी डोळ्याचं पारणं फिटतं.
ही हवेली एका फोटोत मावत नाही. तिचा प्रत्येक कोपरा प्रेक्षणीय आहे. 
चोवीस तास गरम पाण्याचा स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट देखील त्यात आहे. 
डॉटकॉम मँन्शनची अनेक गेटस आहेत. त्यातलं हे एक. 
 खरेखुरे प्राणी वाटावे असे पुतळे हवेलीच्या आवाराची शोभा वाढवतात..
घर असावे कीम डॉटकॉम सारखे, नकोत नुसते फ्लॅट...
त्या हवेलीत चार दिवसांपूर्वी प्रत्यक्ष घडलेली घटना. सकाळी साडेसहाच्या सुमारास दोन हेलिकॉप्टर्स आभाळातून त्या हवेलीवर कर्कश्य घिरघिरत खाली आली. राजवाड्यावरही नसेल अशी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तिथे होती. सुरक्षा रक्षकांनी आपल्या बंदुका सावरून पोझीशन घेतलीच असणार. हेलिकॉप्टर्स काही क्षणातच हवेलीजवळ उतरली. सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आलं की हे पोलीस आहेत. एकूण 76 सशस्त्र न्युझीलंड पोलीस कमांडोंना पाहून सुरक्षा रक्षकांना बचाव पवित्रा घ्यावाच लागला. पोलिस कमांडोंनी आपली ओळखपत्रं आणि वॉरंट दाखवलं. एव्हाना हवेलीतल्या माणसांना काय घडतय याचा अंदाज आला असावा. प्रतिकार केला तर पोलिस गोळ्या घालून एन्कांउंटर करायला मागे पुढे पाहणार नाहीत हे तर स्पष्टच दिसत होतं. पळून जाण्याची कोणतीही शक्यता नव्हती. भल्या सकाळी साखरझोपेत असताना अचानकपणे समोर आलेल्या त्या परिस्थितीत काय करावं यामुळे आतली मंडळी गोंधळली असावीत. 
पोलीसांनी एव्हाना हवेलीला वेढा घातला होता. अत्याधुनिक मशिनगनधारी कमांडो आता हवेलीत शिरण्याच्या बेतात. पण हवेलीतले सर्व दरवाजे इलेक्ट्रॉनिक लॉकींग्जची व्यवस्था असलेले. पासवर्ड आणि योग्य तो लॉगिन केल्याशिवाय दरवाजा उघडणार नाही अशीच कडेकोट व्यवस्था. आतून कोणी बाहेर येईना. हवेलीचे दरवाजे उघडले जाईनात. परिणामी, पोलीस एक एक इलेक्ट्रॉनिक लॉक फोडू लागले. आत सरकू लागले. त्यांना हवा होता त्या हवेलीचा मालक. त्याचं नाव ‘कीम’. आणि, आडनाव ‘डॉटकॉम’. होय ‘कीम डॉटकॉम’ हेच त्याचं कागदोपत्री असलेलं अधिकृत नाव. वय वर्षे 38. घरात त्याची 6 महिन्यांची गरोदर बायको मोना आणि तीन लहान मुलं. खेरीज हवेलीचा नोकरवर्ग, प्रशासकीय स्टाफ वगैरे. पण त्या दिवशी त्या घरात इतरही अनेक पाहुणे मंडळी होती. त्या पाहुण्यांमध्ये कीम डॉटकॉमचे मित्र, आणि मुख्य म्हणजे त्याचे साथीदारही होते. 20 जानेवारीच्या रात्री ते सारे त्या हवेलीत जमले असणार याचा पक्का अंदाज पोलिसांना होता. कारण 21 जानेवारी हा कीम डॉटकॉमचा जन्मदिन होता. वाढदिवसाची पार्टी आदल्या रात्री म्हणजे 20 जानेवारीला उशीरापर्यंत चालणार आणि 21 जानेवारीच्या सकाळी आपल्याला सगळेच बेसावध अवस्थेत सापडणार हे पोलिसांना माहित होतं. म्हणूनच 21 जानेवारीची पहाट त्यांनी आपल्या ऑपरेशनसाठी निवडली होती. हे सारं ऑपरेशन झालं होतं ते अमेरिकेच्या विनंतीवरून. एफबीआयचे लोक त्यावेळी ऑकलंडमध्ये आलेले होते. पण धाडीत फक्त न्युझीलंड पोलीसच होते. हा कीम डॉटकॉम असा आहे तरी कोण? हा प्रश्न डोक्यात येऊन वाचकहो तुमची उत्सुकता ह्या टप्प्यावर ताणली गेली आहे हे मला कळतय. म्हणून त्याचं उत्तर प्रथम सांगतो, आणि मग त्या पोलीस धाडीत काय घडलं याकडे वळू. कीम डॉटकॉम हा संगणक क्षेत्रातला एक हॅकर आहे. 38 वर्षांचा कीम हा मूळ जर्मन. हॅकर म्हणून अत्यंत चलाख. बीझनेसमन म्हणून अत्यंत धुर्त. माणूस म्हणून कमालीचा ऐषारामी, विलासी आणि पक्का उडाणटप्पू. कीमचं खरं नाव कीम श्मिटझ. पण न्युझीलंडमध्ये राहू लागल्यावर आपलं आडनाव रितसर कायदेशीरपणे बदलून त्याने ते ‘डॉटकॉम’ असं केलं. डॉट कॉम म्हणजे इंटरनेटचं क्षेत्र. ह्या क्षेत्रानेच त्याला एवढं श्रीमंत केलं होतं. त्या कृतज्ञतेपोटीच म्हणे त्याने आपलं श्मिटझ हे आडनाव बदलून ‘डॉटकॉम’ केलं होतं. हवेलीचं नावही ‘डॉटकॉम मॅन्शन’. ह्या माणसाचं आयुष्य म्हणजे एक अफलातून कादंबरीच आहे. वाचायला सुरूवात केलीत तर पानापानावर संगणक जगतातील अचाट घटनांची मालिकाच. पोलीस कीमच्या मागे का लागले? अमेरिका आणि एफबीआयला तो का हवा होता? तो संगणक जगतातला चक्रावणारा तपशील पाहू या भाग 2 मध्ये. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा