९ मार्च, २०११

PDFESCAPE एक जबरदस्त वेब अॅप

ही गोष्ट आहे राहुलची. राहुल एका कंपनीत एक्झेक्युटीव्ह आहे. एका घरगुती कामासाठी तो गावी गेला होता. तिथे कंपनीतून तातडीचा फोन आला की तुम्हाला एक पीडीएफ फाईल ईमेलने पाठवली आहे. ती पाहून लगेच तुमच्या कॉमेंटस पाठवा. इटस अर्जंट.
राहुलने गावी लॅपटॉप नेला नव्हता. गावातल्या सायबर कॅफेत जाणं भाग होतं. राहुल तिथल्या एका सायबर कॅफेत गेला, संगणकावर बसला. ईमेल पाहिली, ती पीडीएफ फाईल त्याने डाऊनलोड सुद्धा केली. पण पुढे गाडं अडलं. राहुलला ती पीडीएफ फाईल एडिट करायची होती. गावातल्या त्या सायबर कॅफेत पीडीएफ एडिटर किंवा अॅडोबी अॅक्रोबॅट नव्हता. कुठून तरी तो डाऊनलोड करायचा, मग तो त्या सायबर कॅफेच्या संगणकावर लावायचा एवढा वेळ राहुलकडे नव्हता. शिवाय गावातलं इंटरनेट कनेक्शनही काहीसं स्लो होतं. राहुलची घाईघाईने फोनाफोनी सुरू झाली. पीडीएफ एडिटर इंटरनेटवर कुठे मिळेल? हा प्रश्न तो वेगवेगळ्या मित्रांना विचारत होता. शिवाय गुगलवरही शोधाशोध चालू होती. पण गुगलच्या त्या हिमालयाएवढ्या राशीतून हाती काही लागत नव्हतं.
शेवटी एका मित्राने त्याच्या एका अमेरिकन मित्राकडून माहिती मिळवली. त्याने प्रश्न सुटला.
इंटरनेटवर एक चांगला पीडीएफ एडिटर उपलब्ध झाला www.pdfescape.com ह्या साईटवर. PDFEscape हे एक वेब अॅप्लीकेशन आहे. म्हणजे हा प्रोग्राम तुम्हाला डाऊनलोड करण्याची, वा इन्स्टॉल करण्याची गरज ऩाही. इंटरनेटवर लगेच वापरण्यासाठी तो तयार आहे. तुम्ही फक्त इंटरनेट चालू करून त्या साईटवर जायचं, तेथेच तुमच्या हार्ड डिस्क मधली पीडीएफ फाईल उघडायची आणि एडिट करायला सुरूवात करायची. एडिट करून झालं की ती सेव्ह करायची. अतिशय सुलभ, सोपं आणि वेळ वाचवणारं...
PDFEscape ची वैशिष्ट्ये काय आहेत, त्यावर काय काय करता येतं वगैरे माहिती आपण पुढल्या भागात पाहू....