३ मार्च, २०११

अहो, चिमुकली इसापनीती 100 वर्षांची झाली...

राम गणेश गडकरी यांची एकच प्याला पासून राजसन्यास पर्यंतची नाटके माहित नाहीत असा मराठी माणूस मिळणे नाही. गडकरी ऐन तारूण्यात वयाच्या 34 व्या वर्षी गेले. पण तेवढ्या अल्पायुष्यातही त्यांनी महाराष्ट्रासाठी प्रचंड साहित्य संपदा निर्माण केली.
मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ॥

हे त्यांचे गीत महाराष्ट्राला आजही स्फुर्ती देत असते..
पण, गडकऱ्यांनी खास लहान मुलांसाठी लिखाण केले, आणि त्याचे एक पुस्तकही प्रकाशित झाले होते ही गोष्ट आज अनेकांना (अगदी मराठीच्या कितीतरी प्राध्यापकांनाही) ठाऊक नाही. ह्या पुस्तकाचे नाव, चिमुकली इसापनीती. गडकऱ्यांनी, परवडत नसतानाही, स्वखर्चाने ती प्रकाशित केली. हे पुस्तक फक्त 10 पानांचे आहे. त्यात इसापच्या जोडाक्षरविरहित लिहीलेल्या दहा गोष्टी आहेत.
ह्या दहा पानी पुस्तकाला गडकऱ्यांनी आवर्जुन प्रस्तावना लिहीली आहे. प्रस्तावनेच्या खाली तारीख आहेः 29/12/1910. म्हणजे 29 डिसेंबर 2010 रोजी चिमुकली इसापनीती ह्या पुस्तकाला 100 वर्षे पुर्ण झाली.
चिमुकली इसापनीतीच्या प्रस्तावनेत गडकरी काय लिहीतात पहाः

"... कोणाच्याही मदतीवाचून मुलांस हे पुस्तक वाचता येईल असा तर्क आहे. साध्या अक्षर ओळखीचा काळ तुलनात्मक दृष्टया थोडाच असल्यामुळे फक्त दहाच गोष्टी घेतल्या आहेत. वाचन सुलभ होण्यासाठी मुद्दाम मोठया टाईपाचा उपयोग केला आहे. चित्रेसुध्दा हवी होती; पण ते पडले जरा खर्चाचे काम. सुदैवाने पुढे मागे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघण्याचा सुयोग आलाच तर पाहता येईल..."

वरील लाल अक्षरांत दिलेले गडकऱ्यांचे 1910 सालचे शब्द नीट वाचा. गडकऱ्यांना चिमुकली इसापनीती मध्ये  चित्रेसुध्दा हवी होती; पण चित्रे देणे त्यावेळी गडकऱ्यांना परवडणारे नव्हते. गडकरी म्हणतात,  ते पडले जरा खर्चाचे काम. सुदैवाने पुढे मागे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघण्याचा सुयोग आलाच तर पाहता येईल.

गडकऱ्यांच्या दुर्दैवाने दुसऱ्या आवृत्तीचा सुयोग कधीच आला नाही. त्यामुळे चिमुकली इसापनीती पुढली 100 वर्षे चित्रांविनाच राहिली. पण गडकऱ्यांचे चित्रांचे ते स्वप्न चिमुकली इसापनीती 100 वर्षांची होता होता पूर्ण झाले. तो दिवस म्हणजे 25 डिसेंबर 2010. ह्या दिवशी ठाणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रकाशन कट्ट्यावर प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते www.ramganeshgadkari.com ह्या संकेतस्थळाचे प्रकाशन झाले. ह्या संकेतस्थळावर गडकऱ्यांचे समग्र साहित्य मोफत उपलब्ध आहे. समग्र साहित्यामध्ये अर्थातच ती  चिमुकली इसापनीतीही उपलब्ध आहे. संकेतस्थळावर चिमुकली इसापनीती प्रकाशित करताना प्रकाशक संगणक प्रकाशन यांनी त्या दहा गोष्टींना रंगीत चित्रांची जोड दिली. महाराष्ट्राच्या शेक्सपियरचे 100 वर्षांपूर्वीचे स्वप्न अशा प्रकारे पूर्ण झाले. मराठी साहित्य संमेलनाच्या प्रकाशन कट्ट्यावर हे स्वप्न पूर्ण झाले ही वृत्तपत्रांसाठी फार मोठी बातमी होती. पण दुर्दैवाने ही बातमी मराठी वृत्तपत्रांनीही दिली नाही. आज संगणक डॉट इन्फो वरून ती बातमी जगापुढे येत आहे.  
दुसरे दुर्दैव म्हणजे 2010 हे वर्ष जसे महाराष्ट्र राज्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते तसे ते गडकऱ्यांचे 125 वे जयंती वर्षही होते. गडकऱ्यांचा जन्म 24 मे 1885 चा. पण ज्या महाराष्ट्राला गडकऱ्यांनी गीतातून वंदन केले त्याला त्याची आठवण त्या सुवर्ण महोत्सवी वर्षभरात कधीच आली नाही. त्या वर्षात ramganeshgadkari.com इंटरनेटवर आले एवढेच एक समाधान.
ज्यांना चिमुकली इसापनीती आणि ती प्रस्तावना पूर्ण वाचायची आहे त्यांचेसाठी ती ह्या दुव्यावर उपलब्ध आहे. 

राष्ट्रपतींची खास गाडी

आपल्या राष्ट्रपतींचा आलिशान प्रवास. प्रेसिडेन्शियल सलून मधील एक कोपरा. 
राजधानी एक्सप्रेसपासून ते पॅलेस ऑन व्हील्सपर्यंत आणि फ्लाईंग राणीपासून ते डेक्कन क्वीनपर्यंत अनेक रेल्वे गाड्या आपण ऐकल्या आहेत. त्यांना इतिहास वगैरे असू शकतो असं कधी आपल्या मनात आलेलं नसतं. पण एक खास ऐतिहासिक म्हणावी अशी गाडी मात्र आपण फारशी ऐकलेली नाही. ती गाडी म्हणजे 'प्रेसिडेन्शियल सलून' अर्थात फक्त भारताच्या राष्ट्रपतींची आणि फक्त त्यांच्यासाठीच सदैव राखीव असलेली गाडी. ही गाडी फक्त दोन डब्यांची आहे. १९५६ साली बांधण्यात आलेले हे आलिशान डबे नवी दिल्ली स्टेशनात कायम उभे असतात. ह्या दोन डब्यांमध्ये राष्ट्रपतींची बेडरूम, लाँजरूम, व्हिजिटर्स रूम, कॉन्फरन्स रूम असा लवाजमा एकीकडे आहे. दुसरीकडे राष्ट्रपतींचे सचिव व इतर कर्मचारी यांचेसाठी काही केबीन्स आहेत. हे दोन्ही डबे सागाच्या फर्निचरने तसेच रेशमी पडद्यांनी सजवण्यांत आले आहेत. 'प्रेसिडेन्शियल सलून' ची परंपरा फार जुनी आहे. १९ व्या व २० व्या शतकात भारताच्या इंग्रज व्हाईसरॉयने त्याचा उपयोग केला होता. १९२७ पर्यंत इंग्रजांची भारतीय राजधानी कलकत्ता येथे असल्याने हा 'प्रेसिडेन्शियल सलून' कलकत्त्यात उभा असे. १९२७ मध्ये इंग्रजांनी राजधानी दिल्लीत हलवल्यानंतर तो दिल्ली येथे आणण्यात आला. अत्यंत आलिशान अशा ह्या गाडीत पर्शियन गालिचे वगैरे वैभवी सजावट होती. ही गाडी वातानुकूलित नव्हती, पण आत गारवा कायम रहावा यासाठी त्यात खास पद्धतीचे पडदे लावण्यांत आले होते. गाडीत चोवीस तास गरम व थंड पाण्याची सोय करण्यांत आली होती. ही गाडी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १९५० साली प्रथमच वापरली. त्यानंतर आलेल्या राष्ट्रपतींनीही त्याचा वापर केला. राष्ट्रपतींची मुदत संपल्यानंतर त्या गाडीतून त्यांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्याचा एक प्रघात त्यानंतर पडला. ह्या प्रघातानुसार गाडी वापरणारे शेवटचे राष्ट्रपती म्हणजे डॉ. संजीव रेड्डी. त्यांनी १९७७ साली राष्ट्रपती भवनाचा निरोप घेताना ही गाडी वापरली. त्यानंतरच्या काळात सुरक्षेच्या कारणास्तव ही गाडी राष्ट्रपतींनी वापरली नाही. १९७७ ते २००३ ह्या २६ वर्षांच्या काळात ही गाडी नुसती उभी होती. नुसती उभी असली तरी तिची निगा उत्तम प्रकारे सांभाळण्याची पद्धत आहे. आपले मागील राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी ही गाडी हरनौत ते पटणा ह्या ६० किलोमीटरच्या प्रवासासाठी वापरली. त्यासाठी ह्या गाडीच्या सजावटीचे खास नूतनीकरण करण्यांत आले होते. त्याचाच एक भाग म्हणून गाडीत प्रगत तंत्रज्ञानाने व उपग्रह यंत्रणेने युक्त अशी आधुनिक संपर्क साधनेही डॉ. कलाम यांच्यासाठी बसविण्यांत आली होती. त्यानंतर मात्र आता गेली सुमारे ५ वर्षे 'प्रेसिडेन्शियल सलून' नवी दिल्लीत शांतपणे उभे आहे. नव्या राष्ट्रपती महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील ह्या 'प्रेसिडेन्शियल सलून' मध्ये कधी बसतील का हे पहायचं.
(अधिक माहितीसाठी ह्याच ब्लॉगवरील हा दुवा पहा)

असाही एक सलमान खान - भाग 2

('असाही एक सलमानखान' एकूण तीन भागात आहे. हा भाग दुसरा आहे. आपण हे तिन्ही भाग क्रमाने वाचावे अशी विनंती आहे. पहिला भाग ह्या दुव्यावर उपलब्ध आहे.)

अगदी डावीकडे सलमान खान, आणि सोबत त्याचे सहकारी. अगदी उजवीकडे असलेला शंतनु, त्याने एम.आय.टी. मधून चार पदव्या घेतल्या आहेत. 
सलमान खानचा विवाह 2004 साली झाला. लग्नाच्या निमित्ताने सलमान खानच्या काकांचे कुटुंब त्याच्याकडे आले होते. थोडी उसंत मिळताच काकूने सलमान खानकडे आपल्या मुलीच्या - नादियाच्या - अभ्यासाचा विषय काढला. नादिया सातवीत शिकत होती. बाकी विषयात ती ठीक होती. पण गणितात विशेषतः Unit Conversion चा जो भाग होता त्यात ती कच्ची होती. त्यामुळे तिचे गुण कमी होत. सलमान खानच्या काकूला तिच्या मुलीच्या गणित विषयाची वाटणारी काळजी तिने चिंतातूरपणे बोलून दाखवली. आपल्या छोट्या चुलत बहिणीसाठी काहीतरी करावं असं सलमानला वाटलं, आणि तो नादियाला शिकवू लागला. नादिया काही दिवसांसाठीच त्याच्याकडे आली होती. ती परत गेल्यावर सलमान तिला कसा शिकवणार हा प्रश्न होता. सलमानने तो सोडवला इंटरनेटच्या मदतीने.
सलमानने गणिताचा एक एक छोटा धडा तयार केला. त्या धड्याचा व्हिडिओ तयार करून तो युट्युबवर टाकायचा आणि नादियाने त्यावरून अभ्यास करायचा असं सुरू झालं. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी सलमानला कॅमेरा लागत नसे. केवळ आपल्या काँप्युटरचा उपयोग करून तो व्हिडिओ तयार करीत असे. नादियाला जे समजावून सांगायचं ते तो आपल्या संगणकाच्या स्क्रीनवर करून दाखवी. ही संगणकावरची जी कृती असे त्याचे व्हिडिओ रेकॉर्डींग कॅमटासिया स्टुडिओ नावाचे एक सॉफ्टवेअर करीत असे. समजावून सांगताना दुसरीकडे सलमानचा आवाजही रेकॉर्ड होई. एक पद्धतशीर ट्युटोरियल त्यातून तयार होई. कॅमेरा वापरात नसल्याने सलमानचा चेहेरा त्यात येत नसे पण विषय समजण्यासाठी सलमानचा चेहेरा दिसण्याची गरज कुठे होती?
हे व्हिडिओ पाहून नादियाचं गणित खूपच सुधारलं. तिचं यश पाहून तिच्या काही मैत्रिणी, इतर नातेवाईकही पुढे आले. सलमानला हे शिक्षणाचं कार्य भावलं. बघता बघता व्हिडिओ ट्युटोरियल्सची संख्या वाढू लागली. आज इंटरनेटमुळे ही संख्या 3000 व्हिडिओंच्या घरात गेली आहे. सलमानला आपलं उच्च शिक्षण ह्या कामी खूप उपयोगी पडलं. त्याचे विषय पहाः अंकगणित, बीजगणित, भूमिती, कॅलक्युलस, स्टॅटीस्टीक्स, अर्थशास्त्र, जीवशास्त्र, बँकींग, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, इतिहास, आय.आय.टी. जेईई परिक्षेची तयारी, पदार्थविज्ञान वगैरे. आता हे सारे विषय शाळा-कॉलेजच्या अभ्यासाचे. विद्यार्थी आणि पालकांना ते हवेहवेसे वाटले नाहीत तरच नवल.
तुम्हालाही सलमानचे हे व्हिडिओ पाहता येतील. विद्यार्थ्यांना ते नक्कीच उपयुक्त वाटतील. ते पूर्णपणे मोफतही आहेत. आपल्याकडे मोफत म्हंटलं की त्यांना थोडं कमी लेखलं जातं. सलमानने एका ट्युटोरियलला काही हजार लावले असते तर त्याला ते अशक्य नव्हतं. पण अमेरिकेत बिल गेटस सारख्या माणसानं आपल्या मुलांना शिकवण्यासाठी सलमानचे हे व्हिडिओ नियमितपणे वापरायचं ठरवलं आहे. मोफत म्हणून अर्थातच नाही, तर प्रचंड उपयोगी म्हणून..
सलमान खानचा हा सारा शैक्षणिक खजिना त्याच्या www.khanacademy.org वर मोफत उपलब्ध आहे. त्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. आज हिंदीसह अनेक भाषांमध्ये हे व्हिडिओ खान अकॅडमीने उपलब्ध केले आहेत. त्या भाषा कोणत्या? त्यात मराठी आहे का?  सलमान खान आपल्या अनुभवाबद्दल काय म्हणतो. त्याचे पुढले बेत काय आहेत? हा महत्त्वाचा तपशील पाहू - असाही एक सलमान खान (भाग 3 ) मध्ये...

मूठभर माणसं, आणि शेतभर कणसं.....


ह्या आकडेवारीची नोंद घेतलीत का? मूठभर माणसं जगाला गवसणी घालू शकतात एवढाच त्याचा बोध...

ब्लॉगच्या जगात - अफगाणिस्तान मध्ये...


गेल्या महिन्यातली गोष्ट. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात स्टीव्ह ग्रोव्ह अफगाणिस्तानात गेला होता. गुगलच्या युट्युबतर्फे त्याच्याकडे जी कामगिरी देण्यात आली होती ती थोडी जिकीरीची होती. अफगाणिस्तानात जाऊन तिथलं माध्यमाचं जग, आणि मुख्यत्वे तिथल्या इंटरनेटच्या संबंधातलं वातावरण त्याला अभ्यासायचं होतं. ह्या अभ्यासासाठी गुगलच्या प्रतिनिधींचं एक पथकच अफगाणिस्तानला गेलं होतं. त्यात स्टीव्ह होता.
अफगाणिस्तानातल्या आपल्या काही दिवसांच्या वास्तव्यात, आणि भटकंतीत, त्याला एक अफगाण तरूणी भेटली. तिचं नाव परी अकबर. अफगाणिस्तान सरकारी कार्यालयात परी नोकरी करीत होती. नुकतीच तिला तिची नोकरी गमवावी लागली आहे. त्याचं कारण एकच - परी ब्लॉग लिहीत होती. त्या ब्लॉगचं नाव मिलाद. ह्या वेब पत्त्यावर तुम्ही परीचा ब्लॉग पाहू शकता. तुम्हाला पर्शियन (दैरी) लिपी वाचता येत नसेल तर तो मजकूर तुम्ही वाचू शकणार नाही. पण मजकूराची लांबी तुमच्या डोळ्यात भरल्याशिवाय राहणार नाही. परी अकबर अफगाणिस्तानातल्या स्त्रियांचे प्रश्न आपल्या ब्लॉगमधून सातत्याने मांडत होती. तिच्या ब्लॉगला वाचकवर्गही लाभत होता. जसजशी वाचकसंख्या वाढत गेली तसतसा परीच्या मागे इतर सहकाऱ्यांचा ससेमिरा सुरू झाला. परीला तिचा ब्लॉग थांबवण्यासाठी सतवणं सुरू झालं. पण परी बधली नाही. तिने लिखाण चालूच ठेवलं. ब्लॉगची लोकप्रियता कमी होईना, ती वाढतच राहिली. शेवटी परीला धमक्या येऊ लागल्या. आता आपला जीव धोक्यात आला आहे हे परीनं जाणलं. तिने आपली सरकारी नोकरी सोडली..
परीसारखेच इतरही दहा-बारा ब्लॉगर्स स्टीव्हला अफगाणिस्तानात भेटले. आपण म्हणतो की 2011 मध्ये आता अफगाणिस्तान मुक्त आहे. पण परंपरेतही काही अदृश्य तालिबानी वृत्ती लपलेल्या असतात.
स्टीव्ह ग्रोव्हने ही सारी हकीगत युट्युब च्या अधिकृत ब्लॉगवर दिली आहे. ती ह्या पत्त्यावर तुम्हाला वाचता येईल.
गंमत पहा, की स्टीव्ह आणि गुगल - युट्युबच्या पथकाला अफगाणिस्तान सरकारने अधिकृतपणे आमंत्रण देऊन बोलावलं होतं. आपल्या देशातल्या माध्यम स्थितीचा आढावा ( to examine the content landscape in the region and look for ways to develop and promote more local media in the country) त्या पथकाने घ्यावा अशी अफगाण सरकारची अपेक्षा होती. पण....
मला वाटतं स्टीव्हने लिहीलेली सगळीच हकीगत मी सांगण्यापेक्षा तुम्ही त्याच्याच शब्दात वाचावी...

असाही एक सलमान खान...भाग 1


तुम्ही गुगल ईमेज सर्च वर इंग्रजीत सलमान खान असं सर्च केलत तर 0.18 सेकंदात (म्हणजे पाव सेकंदापेक्षाही कमी वेळात) एकूण 32 लाख 80 हजार फोटो उपलब्ध होतात. पण तो दबंगफेम अभिनेता सलमान खान. हा लेख त्या सलमान खान बद्दल नाही. मग ह्या लेखातला कोण हा सलमान?
हा सलमान खान आहे 32 वर्षांचा एक अमेरिकन तरूण. त्याची आई कलकत्त्याची, आणि वडील बांगला देशीय. दोघेही अमेरिकेत स्थलांतरीत झालेले. सलमान खान हार्वर्ड विद्यापीठाचा एम.बी.ए. शिवाय, गणित, इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग, काँप्युटर सायन्स ह्या विषयाचा पदवीधर (B.S.) म्हणजे तीन डिग्र्या. पुढे, अमेरिकेतील प्रतिष्ठित MIT (Massachusetts Institute of Technology) मधून त्याने इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग आणि काँप्युटर सायन्स मधील मास्टर्स डिग्रीही (M.S.) घेतलेली. खरं तर एखाद्या मोठ्या कंपनीचा सीईओ म्हणून नेमला जाण्यासाठी अतिशय लायक व्यक्ती. 
तसा सलमानखान चांगल्या नोकरीत होताही. करियरचा भला मोठा हायवे त्याला मोकळा होता. एक छंद किंवा आवड म्हणून फावल्या वेळात सलमान त्याच्या नात्यातल्या शाळकरी मुलांना गणित वगैरे शिकवायचा. शिक्षण हा त्याच्या व्यक्तिमत्तवाचा भाग कधीच नव्हता.  पण वयाच्या 29 व्या वर्षी म्हणजे सप्टेंबर 2009 मध्ये त्याने आपली लठ्ठ पगाराची नोकरी सोडली. त्याने अचानक शिक्षणाला वाहून घ्यायचं ठरवलं. 'हातचं सोडून पळत्याच्या मागे' ही मराठीतली म्हण त्याला बरोबर लागू होत होती. 
सप्टेंबर 2009 ते आता फेब्रुवारी 2011 हा काळ जेमतेम दीड वर्षांचा. अगदी अलिकडचा. ह्या काळात पळत्याच्या मागे धावून सलमानने काय मिळवलं?
सप्टेंबर  2010 मध्ये गुगल कंपनीने सलमानला 2 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 9 कोटी रूपये) देणगी म्हणून दिले. मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेटस सलमानला "धिस अमेझिंग गाय" असं म्हणतात. त्यांच्या गेटस फाऊंडेशननेही सलमानला असेच मोठ्या रक्कमेचे (किती ते कळलेले नाही) पारितोषिक दिले आहे. पण ह्या सर्वांवर कडी म्हणजे बिल गेटस यांनी आपल्या मुलीला शिक्षणासाठी सलमानच्या शाळेत प्रवेश घेऊन दिला आहे. 
हे सारं काय प्रकरण आहे?
वाचू, असाही एक सलमान खान...भाग 2 मध्ये...