२३ फेब्रु, २०११

डायरी आणि हिशोब

नव्या वर्षाची सुरूवात होताना नवं कॅलेंडर आणि नवी डायरी ह्या दोन वस्तू आपल्या भेटीला आलेल्या असतात. कॅलेंडर भिंतीवर कुठेतरी कायमचं लटकून जातं. पण, डायरी मात्र आपल्याला बर्‍यापैकी चिकटून राहते. कधी ती आपल्या पर्समध्ये किंवा बॅगेत, किंवा आपल्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये आपल्या एकट्याच्या विश्वासातली गोष्ट म्हणून साथ करू लागते. हळूहळू आपण त्यात काहीबाही लिहू लागतो. मग मात्र ती फारच व्यक्तीगत होऊन जाते. ती दुसर्‍याच्या हाती पडू नये अशी काळजी आपण आवर्जुन घेऊ लागतो. चुकून कधी ती जागेवर दिसली नाही किंवा इतरांच्या हातात क्वचित ती पडली तर आपलं बिनसतच. ही कागदाची डायरी हरवू शकते. दुसर्‍याच्या हातात पडू शकते. त्यामुळे ती जपावी लागते. ती जपण्यात आपल्या मेंदूच्या काही पेशी दिवस-रात्र बीझी राहतात.
हे झालं कागदाच्या डायरीबद्दल. आजकाल घरी आणि ऑफिसमध्ये संगणक जवळजवळ प्रत्येकाच्या टेबलावर असतो. संगणकावर ब्रॉडबॅंडचं इंटरनेट कनेक्शन हेही आता नेहमीचं होऊन गेलं आहे. संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातली डायरी ही कागदाच्या डायरीपेक्षा अधिक सुरक्षित असते. पासवर्ड शिवाय कोणीही ती उघडू शकत नाही. आणि पासवर्ड हा अर्थातच फक्त आपल्यालाच माहीत असतो. इंटरनेटवर अशी डायरी मोफत उपलब्ध आहे. त्यासाठी www.my-diary.org ह्या साईटवर जायला हवं. इंटरनेट साईटसवर मिळणारी सेवा ही तीन प्रकारची असते. आपल्याला एक तर त्यासाठी दमड्या मोजाव्या लागतात, किंवा साईटवरच्या जाहिरातींचा त्रास सहन करत ती सेवा घ्यावी लागते. My-diary.org वरील डायरीची सेवा घेण्यासाठी दमड्याही मोजाव्या लागत नाहीत आणि जाहिरातींची कटकटही तिथे नाही. ही साईट तिसर्‍या प्रकारची म्हणजे स्वेच्छेने येणार्‍या देणग्यांवर चालते. मात्र देणगी सक्तीची नाही. ती दिली नाहीत म्हणून तुम्हाला डायरी लिहीता येणार नाही अशी अट बिलकुल नाही.
My-diary.org चं वैशिष्ट्य म्हणजे ती अतिशय युजर-फ्रेंडली आहे. तिथे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही तुमचा ईमेल पत्ता फक्त द्या. तेवढं पुरे असतं. नाव, पत्ता, जन्मतारीख अमुक तमुक असं काहीही तिथे द्यावं लागत नाही. तुम्ही दिलेल्या ईमेल पत्त्यावर तुमच्या डायरीची अक्टीव्हेशन लिंक पाठवली जाते. त्या लिंकवर क्लीक करून आणि स्वतःचा पासवर्ड निवडून तुम्ही इंग्रजीत डायरी लिहायला प्रारंभ करू शकता. तुमच्याकडे मराठीचा युनिकोड फाँट असेल तर तुमची डायरी किंवा रोजनिशी तुम्ही मराठीतही लिहू शकता. मराठी युनिकोड फाँट तुमच्याकडे नसेल तर www.baraha.com वरून तो डाऊनलोड करून घ्या. Baraha वर तो मोफत उपलब्ध आहे. किंवा, तुमच्याकडे Windows XP वा त्यानंतरची विंडोज आवृत्ती असेल तर त्याबरोबर येणारा Mangal हा मराठी युनिकोड फाँटही तुम्हाला वापरता येईल. थोडक्यात काय, तर my-diary.org वर तुम्ही तुमची मराठी किंवा इंग्रजी रोजनिशी सहज आणि कुठेही लिहू शकता. यातला ‘कुठेही’ हा शब्द महत्वाचा आहे. जगात कुठेही तुम्ही गेलात तर इंटरनेटवर तुमची डायरी तुमच्या बरोबर नेहमीच असणार. कुठल्याही सायबरकॅफेत जाऊन तुम्ही ती केव्हाही उघडू शकता, त्यात लिहू शकता.
ह्या डायरीला ‘सर्च’ ची सोय आहे. समजा वर्षभरात तुम्ही शे दोनशे पाने लिहीलीत आणि त्यातला विशिष्ट संदर्भ तुम्हाला नेमका शोधायचा असेल तर तुम्ही तो ‘सर्च’ करू शकाल. मराठी युनिकोड फाँटही ‘सर्च’ ला अनुकूल आहेत. त्यामुळे केवळ इंग्रजीच नाही तर मराठीतही ‘सर्च’ इथे शक्य आहे. डायरीतलं एखादं पान तुम्हाला काढून टाकायचं असेल, किंवा बदलायचं असेल तर Delete आणि Edit ची सोयही my-diary.orgवर उपलब्ध आहे. अनेक सोयी इथे असल्या तरी my-diary.org वर स्पेलचेक ची सोय उपलब्ध नाही. डायरीत एखादा फोटो वा चित्र टाकायचं झालं तर त्याची सोय फक्त देणगीदारांसाठी उपलब्ध आहे. काहींनी केवळ अर्धा डॉलर (म्हणजे आपले जास्तीत जास्त २५ रूपये ) देणगी देऊन ही सोय पदरात पाडून घेतल्याचं देणगीदारांच्या यादीवरून आपल्याला दिसतं. ही देणगी क्रेडिट कार्ड वापरून देता येते. तुम्हाला डायरीत चित्रे वा फोटो टाकायचे नसतील तर देणगीचा प्रश्न अर्थातच उद्भवत नाही.
डायरीबरोबर हिशोब हा भागही आपल्या जीवनात दैनंदिन महत्वाचा आहे. त्यासाठी www.buxfer.com ही मोफत सेवा देणारी वेबसाईट तुमच्या मदतीला येईल. इथे तुम्हाला तुमचा रोजचा जमाखर्च ऑनलाईन लिहीता येईल. तुमचा जीमेल (गुगलमेल), याहूमेल, हॉटमेल यापैकी इमेल पत्ता असेल तर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करण्याचीही गरज नसते. तुमचा इमेल लॉगिन आणि पासवर्ड वापरून तुम्ही buxfer.com वर हिशेब लिहू शकता. तुमचं बॅंक अकाउंट, क्रेडिट कार्ड, रोजचा किरकोळ खर्च आणि जमा तुम्हाला इथे नोंदवता येते. बेरीज, वजाबाकी वगैरे गणितं अर्थातच buxfer करतो. त्यामुळे चुकण्याचा प्रश्न इथे नसतो. जमा आणि खर्च याचबरोबर उसने देणे-घेणे याची नोंद ठेवण्याचीही सोय इथे आहे. मित्रांबरोबर वा ग्रुपमध्ये असताना ‘शेअर्ड एक्सपेन्स’ किंवा खर्चातला आपला सहभाग देण्याचा प्रसंग विशेषतः कॉलेज तरूण-तरूणींना नेहमीचाच आहे. अशा ‘शेअर्ड एक्सपेन्स’ चा हिशेब ठेवण्यासाठीही खास व्यवस्था आहे. वेबसाईटस म्हंटलं की बहुधा त्या अमेरिकन वळणाच्या असतात आणि त्यामुळे तिथे हिशेब म्हंटलं की डॉलरची $ ही खूण आपल्याला पहावी लागते. आपल्याला Rs. ओळखीचे असतात आणि $ आपल्याला आपले वाटत नाहीत. पण buxfer ने याची काळजी घेतली आहे. आपले हिशोब रूपयांमध्ये ठेवण्याची सोय इथे आहे. आजकाल भारतातही अनेक बॅंका खातेदाराच्या व्यवहारांची मासिक स्टेटमेंटस इमेलने पाठवते किंवा इंटरनेटवर उपलब्ध करते. ही स्टेटमेंटस सामान्यतः .csv फाईलच्या स्वरूपात असतात. ह्या व्यतिरिक्त Microsoft Money किंवा Quicken च्या फाईल्स देणार्‍या बॅंकाही अनेक आहेत. आपली क्रेडिट कार्डची स्टेटमेंटसही ह्या फाईलच्या स्वरूपात मिळत असतात. ही संपूर्ण फाईल buxfer वर अपलोड करता येते. थोडक्यात काय, तर आपले स्वतःचे हिशोब अतिशय चोख पद्धतीने ठेवण्याची सेवा इथे उत्तम प्रकारे आणि मोफत उपलब्ध आहे.
वीज, गॅस, इंटरनेट कनेक्शन, सोसायटी मेंटेनन्स किंवा भाडे, विम्याचा हप्ता, कर्जाचा हप्ता अशा अनेक गोष्टी आपल्याला दरमहा लक्षात ठेवाव्या लागतात. घाईगडबडीत आपण विसरतो आणि मग दंड भरण्याची वेळ कधीकधी येते. Buxfer मध्ये यासाठी Reminder ची सोय आहे. आपण सांगू त्या दिवशी (तारखेस), त्यावेळी ती आठवण देणारे Reminder आपल्याला इमेलवर मिळते. अशी हवी तेवढी रिमाईंडर्स आपण वर्षभरासाठी सेट करून ठेवू शकतो.
Buxfer.com ही Buxfer Inc ह्या अमेरिकन कंपनीची वेबसाईट आहे हे खरं असलं तरी ही कंपनी शशांक पंडित आणि अश्विन भारंबे ह्या दोन ऐन विशीतल्या मराठी तरूणांनी तयार केली आहे हे ऐकल्यावर आपल्याला मनोमन समाधान वाटेल. शशांक आणि अश्विन हे दोघेही मुंबई आय.आय.टी. मधून बी.टेक (कॉंप्युटर्स) करून सध्या अमेरिकेतील कार्नेजी मेलन विद्यापीठात पीएच.डी. करण्यासाठी गेले आहेत. कार्नेजी मेलन विद्यापीठात असताना अश्विनच्या खोलीतील रेफ्रीजरेटरवर अनेक बिले वा ती देण्याची स्मरणपत्रे चिकटवलेली असतं. त्या बिलांची व्यवस्था लावण्यासाठी अश्विनने एक प्रोग्राम लिहीला. तो एवढा उपयुक्त होता की इतर मित्रांकडून त्याला मागणी येऊ लागली. प्रत्येकाला त्या प्रोग्रामची कॉपी देता देता अश्विन कंटाळून गेला. त्यातून मार्ग काढण्यासाठी मग त्याने आपला मित्र शशांक पंडित याच्या मदतीने एक वेबसाईट तयार केली. त्यात हा प्रोग्राम ऑनलाईन दिला गेला. त्यातूनच जन्माला आली Buxfer Inc ही कंपनी. Bucks आणि Transfer ह्या दोन इंग्रजी शब्दांतून Buxfer हे नाव जन्माला आले.
आज Buxfer.com बरेच लोकप्रिय होत आहे. Buxfer सारखीच सेवा देणारी www.wesabe.com नावाची वेबसाईट Buxfer च्या स्पर्धेत आहे. दोन्ही वेबसाईटसच्या तुलनेत Buxfer ची सोय वापरायला अधिक सोपी सरळ आहे. 2011 ची नवी नवलाई अजून ऐन जोमात आहे. त्या जोमात असतानाच दोन उपयुक्त सोयी आपल्याला ‘एंटर’ च्या माध्यमातून मिळाल्या आहेत. खरं तर फी घेऊन ऑनलाईन अकाऊंटींगची सुविधा देणार्‍या कंपन्या आणि वेबसाईटस अनेक आहेत. पण ही सुविधा मोफत आणि दर्जेदार पद्धतीने देणारी कंपनी आपल्या मराठी तरूणांची आहे हे ऐकल्यावर तुम्ही आम्ही आवर्जुन Buxfer वर जाऊन पाहणार यात मला शंका वाटत नाही

' ऑनलाईन प्रेमा ' तुझा रंग कसा ?

कविवर्य मंगेश पाडगावकरांचे प्रेमाबद्दलचे काव्यबद्ध शब्द माहीत नाहीत असा मराठी रसिक सापडणं अवघड. ' प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं ' ह्या शब्दांमध्ये पाडगावकरांनी विशुद्ध आणि प्रामाणिक प्रेम गृहित धरलं आहे. प्रेम हे इंटरनेटवरही सगळीकडे असंच ' सेम ' असतं असं गृहित धरून दिवस-रात्र माऊस पकडून बसलेली मुलं-मुली आपल्याला सायबर कॅफेत हमखास भेटतात. घरोघरी आलेल्या पीसीवर चिकटून असलेल्या तरूणाईचा माऊस कर्सर बहुधा ऑर्कुटसारख्या वेबसाईटवर बेभान होऊन भटकत असतो. ' ऑर्कुट ' सारख्या वेबसाईटवर किंवा इंटरनेटवर चॅट करता करता भेटलेला वा भेटलेली कुणीतरी साध्या टायपिंगयुक्त गप्पा मारता मारता एकाएकी आवडू लागते. ऑनलाईन गप्पा मारण्यासाठी ती पु्न्हा पुन्हा भेटावी असं कधी वाटू लागलं हे कळण्याच्या आत ऑनलाईन प्रेमाचा अंकुरही बरेचदा रूजू लागलेला असतो. ' भेट तुझी माझी स्मरते ' किंवा ' प्रथम तुज पाहता ' ह्या प्रकारातलं ते प्रेम नसतं. कारण समक्ष भेट कधी झालेलीच नसते आणि प्रथम सोडा, एकमेकांना त्यांनी प्रत्यक्ष कधी पाहिलेलंच नसतं. एकमेकांना पहावं असं जेव्हा फारच वाटू लागतं तेव्हा एकमेकांचे फोटो एकमेकांना ऑनलाईन पाठवले जातात, किंवा वेब कॅमेर्‍याच्या सहाय्याने एकमेकांचं दूरदर्शन त्यांनी इलेक्ट्रॉनिक चौकटीत स्वीकारलेलं असतं. ऑनलाईन प्रियकर आणि प्रेयसीचं प्रोफाईल हे साधारणतः इतपतच असतं.
प्रोफाईल ह्या शब्दात 'फाईल' आहे. संगणकाचं किंवा इंटरनेटचं जग हे इलेक्ट्रॉनिक फाईलच्या नियमाने चालत असतं. जोपर्यंत ही फाईल निर्मळ आहे तोपर्यंत समस्या नसते. संगणकाच्या आणि इंटरनेटच्या जगात आपली निर्मळ फाईल जपावी लागते. छुपे व्हायरस, वॉर्मस, स्पायवेअर, मालवेअर आणि आणखी कितीतरी प्रकारचे धोके असतात हे पावलोपावली ध्यानात घेणं क्रमप्राप्त असतं. जे फाईलचं तेच प्रोफाईलचं. जेव्हा दोन निर्मळ फाईल्सची किंवा प्रोफाईलची भेट होते तेव्हा समस्या येत नसते. पण जेव्हा दोनपैकी एक फाईल किंवा प्रोफाईल लबाडीने वा धोक्याने भरलेला असतो, तेव्हा त्यातून उद्‍भवणार्‍या समस्या जीवघेण्या असल्याचं आढळून येतं. ऑर्कुटवर प्रथम कुणीतरी कोणाचा फॅन होतो (किंवा होते) आणि नंतर तो फॅन ' फन अॅन्ड फ्रॉलिक ' करता करता ' फ्रेंड ' बनून त्याच्या वा तिच्या ऑनलाईन आयुष्याचा भाग बनून जातो. सायबर जगातला हा ' फन ' नावाचा शब्द मस्करीच्या अंगाने जात जात कुस्करीच्या परिणतीपर्यंत गेलेला अनेकदा दिसतो. ' ए मॅन, आय वॉज जस्ट कीडींग, आय वॉज नॉट सिरीयस ' असं म्हणून एखादा वा एखादी आपला मूळातच खोटा असलेला प्रोफाईल डिलीट करून मोकळा/ळी होऊन जाते. सायबर जगतात नाहीसं होण्यासाठी आपला गाव सोडून जावं लागत नाही. एकाच गावात एकाच संगणकावर राहून एकाच वेळी अनेक नावांनी, अनेक वयांनी, आणि एकाच वेळी स्त्री म्हणून व पुरूष म्हणूनही वावरता येतं. हे सारं ' फन ' म्हंटलं की झालं, इतकं सोपं असतं.
आजकाल ' ऑर्कुट 'ची चर्चा घराघरात आहे. ' ज्योत से ज्योत जगाते चलो ' एवढ्या सहजपणे भारतात ' ऑर्कुट ' पसरला आहे आणि आणखी पसरतो आहे. ' गुगल ' कंपनीची ही वेबसाईट. सोशल नेटवर्कींग साधणारी आणि जुने हरवलेले मित्र शोधून देणारी, किंवा नवे मित्र जोडण्यासाठी आवश्यक असलेला ऑनलाईन नुक्कड तयार देणारी 'ऑर्कुट ' ही वेबसाईट खरं तर एक वरदान आहे. कधीतरी शाळेत किंवा कॉलेजात असताना रोज भेटणार्‍या मित्र-मैत्रिणींना 'ऑर्कुट ' च्या माध्यमातून शोधणं सोपं आणि आनंददायकही असतं. एका वेगळ्या जिव्हाळ्याचा अंकूर त्या माध्यमातून रूजू शकतो हे अगदी खरं आहे. आपला एक मित्र लांब कुठेतरी गेलेला असतो. बरेचदा लांब म्हणजे तो साता समुद्रापार परदेशातही गेलेला वा स्थिरावलेला असतो. तिथे त्याचे नवे मित्र बनलेले असतात. तिथले त्याचे म्हणजे आपल्या मित्राचे मित्र ऑर्कुटच्या कट्ट्यावर आपलेही मित्र बनू लागलेले असतात. मित्रमंडळाचं असं सामाजिक मधाचं पोळं बनण्याची ही प्रक्रिया सर्वच अंगांनी तशी पोषकच आहे. पण समाज म्हंटलं की त्यात नकारात्मक तत्वंही आलीच. संगणक आला ही बाब सकारात्मक होती. पण त्याला लगेचच आव्हान मिळालं ते व्हायरसचं. इंटरनेटची संपर्क व्यवस्था अनेक अंगांनी खूपच सकारात्मक. पण त्याला आव्हान आलं ते वॉर्मस, स्पायवेअर, हॅकर्स वगैरेंकडून. ह्याच धर्तीवर सोशल नेटवर्कींगच्या साईटसना २००८ मध्ये नकारात्मक तत्वांकडून विविध प्रकारची आव्हानं येतील असा अंदाज आणि चर्चा आज जगभर ऐकू येते आहे.
थोडं मागे जाऊन पाहिलं तर 2011 येऊ घातलेल्या ह्या नकारात्मक किंवा घातक अशा आव्हानांचं स्वरूप नीट लक्षात येईल. ' ऑर्कुट ' ला नुकतीच सात वर्ष पूर्ण झाली. पण भारतात इंटरनेट नांदू लागलं त्याला आता पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. पूर्वी जगात 'ऑर्कुट ' नव्हतं. पण त्या काळातही काही ना काही घातक आव्हानं ही होतीच. ईमेल बरोबर येणाऱ्या फाईलला चिकटून येणारे व्हायरस हे त्या काळात मोठ्या प्रमाणावर आणि सर्रास होते. त्यांनी जगात धूमाकूळ घातला आणि अब्जावधींचे नुकसान केले. मग त्या संदर्भात जागरूकतेचा प्रचार होऊ लागला. अनोळखी ईमेल आली असेल आणि त्याला चिकटून एखादी अटॅच फाईल आली असेल तर ती स्कॅन करून घ्या. त्याशिवाय उघडू नका वगैरे सावधानतेचा सूर एवढा लागला की आता ते ईमेलला चिकटून येणारे व्हायरस कालबाह्य आहेत. व्हायरसचा एक प्रकार कालबाह्य झाला असला तरी जी प्रवृत्ती तसे व्हायरस तयार करत होती ती आजही कुठेना कुठे वावरतेच आहे. अनोळखी दिसणारी ईमेल तुम्ही उघडत नाही म्हंटल्यावर तुम्हाला ओळखीची अशी ईमेल तयार करण्याचा प्रयत्न ही प्रवृत्ती करणारच. तुमचे मित्र कोण, ते काय बोलतात, तुमचं त्यांचं नुकतच काय बोलणं झालं आहे हे कळण्यासाठी 'ऑर्कुट ' इतका चांगला माहितीचा स्त्रोत दुसरा कोणता असणार? आपण एक उदाहरण घेऊ. समजा पिंकी आणि अॅश ह्या ऑर्कुटवरच्या दोन मैत्रिणींच्या स्क्रॅपच्या माध्यमातून चाललेल्या ह्या गप्पा पहा ः
" अगं मी आज मामाकडे पुण्याला आलेय. इथे जाम थंडी आहे." - इति पिंकी.

" आयला (चालतं ऑर्कुटवर), स्वेटर नेलास की नाही ? कुठे राहतो तुझा मामा पुण्यात ?" - अॅशची चौकशी.

"अगं, तो डेक्कन जिमखान्यावर ती एक्स-वाय-झेड सोसायटी आहे नं तिथे राहतो. मस्त आहे ती सोसायटी"

"अगं बरी आठवण झाली. तुला पुण्यात ती म्युझिक सीडी मिळाली तर ट्राय कर नं. प्लीज"

"ओके, बघते, ट्राय करते, बसं?"

एवढा संवाद झाल्यावर दोन तासांनी पिंकीची एक ईमेल अॅशला मिळाली. त्याचा विषय होता Got your Music Cd.
हा विषय अॅशला माहीत असल्याने तिने ती ईमेल पिंकीचीच आहे असं समजून वाचायला घेतली. त्यात लिहीलं होतं की " त्या म्युझिक सीडीचे सगळे डिटेल्स अॅटॅच्ड फाईलमध्ये आहेत. ते बघ, आणि मला रिप्लाय कर. "
एवढा मजकूर पाहिल्यावर ती ईमेल पिंकीची नसेल असं वाटण्याचं काही कारणच नाही. अॅशने ती अॅटॅच्ड फाईल उघडली आणि नंतर एका व्हायरसने हैदोस घातला. अॅश बिथरली. पिंकीने व्हायरस कसा पाठवला. तोही एवढा डेडली!
सत्य परिस्थिती अशी होती की ती ईमेल मूळात पिंकीने पाठवलीच नव्हती. कुणीतरी पिंकी आणि अॅशचं 'ऑर्कुट' वरचं संभाषण पाहिलं होतं, आणि त्याचा संदर्भ देऊन अॅशला तो व्हायरस खोडसाळपणाने पाठवला होता. खरं तर पिंकी आणि अॅशचं संभाषण तसं अगदी साधच होतं. पण त्याचा कसा वापर केला जाऊ शकतो हे वर आलेल्या उदाहरणावरून आपल्या लक्षात आलं.
चार वर्षांपूर्वी ऑर्कुट नव्हतं, पण तेव्हा ICQ ( I seek you) नावाचा चॅट प्रोग्राम चांगला बहरला होता. तिथेही जुने मित्र भेटत होते, नवे मित्र मैत्रिणी होत होत्या, प्रेमाच्या आणाभाकाही घेतल्या जात होत्या, फोटोही पाठवले जात होते. सगळं जवळजवळ ऑर्कुटसारखंच होतं. त्या प्रेमामध्येही अनेकजण फसल्याची उदाहरणे होती. ICQ बरोबर इतरही चॅट प्रोग्राम्स होते. ईमेलची देवाणघेवाण होता होताही प्रीतीचे अंकूर फुटत होते. ते ' फुटणं ' दोन्ही प्रकारचं होतं. रूजणं ह्या अर्थीही होतं आणि फुटणं ह्या अर्थीही होतं. थोडक्यात, ज्याला पाहिलं नाही, ज्याच्या खरे-खोटेपणाची खात्री नाही त्याच्यात गूंतलात तर त्यातून फक्त गुंताच होणार हा धोका नीट लक्षात घ्या. हा मुद्दा लक्षात यावा यासाठी खालील लिंक वर जाऊन पहा ः
http://answers.yahoo.com/question/index?qid=20071129115049AACjiNo
ह्या पानावर ऑर्कुटवर फसलेल्या एका मुलीने विचारलं आहे -
I was duped by an unknown person in Orkut, whose photo was someone else. I need justice. what should be done? This person promised to marry me.where as the person is already married. I have spent lots of money.Please suggest what should be done.
कुणा तिसर्‍याच माणसाचा फोटो दाखवून त्या मुलीला लग्नाचं वचन देण्यात आलं होतं. प्रत्यक्षात तो माणूस दुसराच होता, आणि विवाहितही होता. पण दरम्यानच्या काळात त्या मुलीने त्या माणसावर भरपूर पैसा खर्च केला होता. हा पैसा अर्थातच तिने भेटवस्तू पाठवणे वगैरे मार्गाने खर्च केला असणार हे उघड आहे. पुरती फसल्यानंतर आता ह्या मुलीला काय करायचं हा प्रश्न पडला आहे. हे घडू नये यासाठी काही दक्षता पाळण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, आपला स्वतःचा आणि दुसर्‍या कुणाचाही मोबाईल नंबर वा फोन नंबर ऑर्कुटवर गप्पा मारताना स्क्रॅपवर देऊ नका. कामाशी संबंधित गप्पा स्क्रॅपच्या माध्यमातून मारू नका. मित्रांची संख्या वाढवण्याच्या मोहात कोणालाही मित्र म्हणून मान्यता देऊन टाकू नका. विशेषतः मुलींनी आपले फोटो देणं टाळलेलच बरं. फोटो गॅलरीतही आपले वा इतरांचे फोटो देताना ते शक्यतो क्लोजअप न देता लाँग शॉटचे देणंच अधिक बरं. ऑर्कुट काय किंवा तत्सम अन्य साईट काय, त्याचे व्यसन लागणार नाही, बेभान होऊन तास न तास त्यामागे जाणार नाहीत याची काळजी सर्वांनीच आवर्जुन घ्यावी. इंटरनेटवर भेटणारं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असेल, आणि त्याचं आणि तुमचं सेमच असेल याची कसलीच खात्री कुणीच देऊ शकत नाही. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे  चा संदेश हाच की ऑनलाईन प्रेमा, तुझा रंग कसा असेल हे परमेश्वरही सांगू शकणार नाही. थोडं सबुरीनेच घेतलेलं बरं. …

फोटोच्या दुनियेतील अलिबाबाची गुहा

एक दिवस असा येईल की तुमच्या संगणकावर एकही प्रोग्राम नसेल. असेल ती फक्त एकच सोय, इंटरनेट पाहण्याची. आता तुम्ही ह्यावर विचाराल की मला दररोज वर्ड प्रोग्राम वापरावा लागतो. त्यात मी दररोज काही ना काही पत्रे टाईप करतो. वर्ड प्रोग्रामच जर माझ्या संगणकावर नसेल तर माझे हे पत्रव्यवहाराचे काम मी करणार कसं? दुसरं कोणी म्हणेल मला दररोज एखादं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तयार करावं लागतं. ते कसं होणार. कोणी म्हणेल मी एक्सेलमध्ये दररोज हिशोबाचं काम फीड करतो, त्याचं काय होणार? त्यावरचं उत्तर आहे की हे सारे प्रोग्राम्स तुम्हाला इंटरनेटवर लाईव्ह वापरता येतील. म्हणजे तुम्ही एखाद्या विशिष्ट साईटवर जाल. तिकडे वर्डच्या लिंकवर क्लीक कराल. काही क्षणात मग तुमच्यासमोर वर्डप्रोसेसरचं कोरं पान येईल. तुम्ही त्या पानावर पत्र टाईप करायचं. हवा तो टाईप किंवा फाँट वापरायचा. बोल्ड, ईटालिक जसा हवा तसा त्याला आकार द्यायचा. परिच्छेद पाडायचे. सारं झालं की स्पेलींग चेकसुद्धा करायचं. मग तो तुमच्या अकाउंटमध्ये असलेल्या जागेत सेव्ह सुद्धा करून ठेवायचा. ही सारी सोय जर इंटरनेट देत असेल तर मग हवी कशाला तुमच्या संगणकात हार्ड डिस्क, आणि हवेत कशाला ते ऑफिस नामक अगडबंब प्रोग्राम्स? पॉवरपॉईंट असो की एक्सेल असो, तुम्ही क्लीक केलत की तो प्रोग्राम इंटरनेटच्या त्या एखाद्या साईटमध्येच उघडणार. एक्सेल असेल तर कोर्‍या कागदाच्या ऐवजी तुमची वर्कशीट समोर येऊन उघडणार. त्यात हवे ते आकडे फीड करा. मग फाईल सेव्ह करा.
आता ह्यावर कोणी म्हणेल की हे कसं शक्य आहे. किंवा हे शक्य होण्यासाठी अजून खूप वर्ष जावी लागतील. तर मंडळी, तसं नाहीये. ह्या सोयी अगदी आज म्हणाल तर आजच, नव्हे आता ह्या क्षणालाही उपलब्ध आहेत. आपलं गुगल सर्च इंजिन आहे त्याच्या वरच्या बाजूस डावीकडे पहा. खाली दिलेल्या वेगवेगळ्या लिंक्स दिसतात.
Web Images News Orkut Groups Gmail more ▼
त्यातली शेवटची लिंक आहे more . ह्या more वर क्लीक केलंत तर आणखी काही लिंक उघडतात. त्यातल्या Documents ह्या लिंकवर क्लीक करा. त्यानंतर येणार्‍या पानावर Take a tour of Google Docs नावाची लिंक तुम्हाला दिसेल. त्यावर क्लीक करा. आता पहा Create documents, spreadsheets and presentations online असं ठळठळीत शीर्षक मधोमध दिसेल. तुमच्याकडे गुगलची ईमेल किंवा गुगल अकाऊंट असेल तर Start Now ह्या खालील बाजूस दिसणार्‍या लिंकवर क्लीक करून लॉगिन करा. एक वर्डप्रोसेसर प्रोग्राम तुमच्यापुढे उभा असेल. त्यात तुम्ही वर्ड स्टाईलने पत्र टाईप करू शकता. एक्सेल स्टाईलने स्प्रेडशीट तयार करू शकता किंवा चक्क एखादे पॉवरपाईंट प्रेझेंटेशन सुद्धा त्यात तयार होऊ शकते. ह्यातून तयार होणारी तुमची फाईल सुद्धा गुगलच्या सर्व्हरवर सेव्ह करता येते. हवी तेव्हा जगात कुठूनही ती उघडता येते. प्रिंट करता येते वगैरे. २००८ च्या मे महिन्यात ही सोय इंटरनेटवर उपलब्ध आहे. सहजपणे. तुम्हाला चोरीचं म्हणजे पायरेटेड सॉफ्टवेअर वापरण्याची आवश्यकताच नाही. हे सारं शक्य झालं ते वेब अॅप्स किंवा वेब अॅप्लीकेशन्स ह्या संकल्पनेमुळे. तुम्हाला जो प्रोग्राम किंवा अॅप्लीकेशन लागतं ते वेबसाईटवरच उपलब्ध करून देणं ही वेब अॅप्सच्या मागची भूमिका.
आता हे वेब अॅप्सबद्दलचं प्रास्ताविक ऐकल्यानंतर कुणीतरी नक्कीच हात वर करून उभा राहणार आणि त्याची शंका विचारणार, हे मला अपेक्षित आहे. तो मला विचारणार की मी (म्हणजे तो) दररोज फोटोशॉप नावाचा प्रोग्राम वापरतो. त्यात त्याचे रंगीत फोटो उघडतो. त्याचे कृष्ण- धवल म्हणजे ब्लॅक अॅन्ड व्हाईट करतो. किंवा, त्या फोटोंवर निरनिराळ्या प्रक्रिया करतो. फोटोशॉप ह्या अवाढव्य आणि पॉवरफुल म्हणता येईल असा प्रोग्राम ते सारं शक्य करतो. ह्या त्याच्या कामासाठी तरी संगणकावर प्रोग्राम हवा की नको? की ते सारं कामही इंटरनेटवर करता येईल? तर मंडळी, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे - होय, फोटोवरचं ते बहुतेक सारं कामही इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या वेबअॅपवर करणं शक्य आहे. आता हे उत्तर ऐकल्यानंतर लगेचच पुढला प्रश्न किंवा शंका ही की हे शक्य होण्यासाठी किती काळ वाट पहावी लागेल. आज वर्ड, एक्सेल, पॉवरपाईंटसारख्या प्रोग्रामचं काम वेबअॅप करीत आहेत. फोटोशॉपसारख्या प्रोग्रामचं काम करणारं वेबअॅप केव्हा उपलब्ध होणार? ह्या प्रश्नाचं उत्तरही खूप आशादायक आहे. मंडळी, फोटोशॉपसारखं काम करणारं वेबअॅप आज ह्या क्षणाला इंटरनेटवर उपलब्ध आहे. ज्या साईटवर ते उपलब्ध आहे त्या साईटचं नाव आहे picnik.com.
हे पिकनीक डॉट कॉम नाव ऐकलं की आपल्या डोळ्यापुढे काहीतरी वेगळच चित्र उभं राहील. काहीतरी सहली किंवा पिकनीकच्या मजेसंबंधीची ही साईट असेल असा अंदाज आपण पटकन करूनही टाकू. पण नाव छोटं लक्षण मोठं अशा प्रकारची ही picnik.com आहे. त्यावर गेल्याशिवाय मी काय म्हणतोय याचा अंदाज येणार नाही. पिकनीक डॉट कॉम ला मी फोटोच्या दुनियेतली अलिबाबाची गुहा असं म्हणतो. त्याचं कारण सरळ आहे. ह्या साईटवर फोटोशॉपसारखं वेबअॅप उपलब्ध आहे, आणि त्यात फोटोवर काम करण्यासाठी लागणार्‍या शेकडो सोयी आणि टूल्स उपलब्ध आहेत. ह्या सोयी कोणकोणत्या याची ही एक वरवरची यादी पहाः १) रंगीत फोटोंचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो तयार करणे. २) समजा एखाद्या फोटोत कॅमेरा तिरका धरल्याने माणूस वा दृश्य तिरकं आलं असेल तर ते सरळ (Rotate) करणं. ३) एखाद्या फोटोतला विशिष्ट भाग कापून टाकणं (Crop करणं). ४) एखाद्या फोटोत Exposure चा दोष आल्याने फोटोत अनावश्यक सावली वा अंधुकता असेल तर त्याची दुरूस्ती करणं. ५) फोटोतले रंग कमीअधिक गडद वा फिकट वाटत असतील तर ते सुधारणं. ६) फोटोतला शार्पनेस वाढवणं. ७) फोटोत रेडआय नावाचा दोष काही वेळा दिसतो. डोळे अधिक लाल वगैरे वाटतात. तो रेडआय चा दोष दूर करणं. ८) एखाद्या फोटोतल्या माणसाचे पानामुळे लाल लाल झालेले दात पांढरे शुभ्र करणं ९) फोटोला सुंदरशी फ्रेम किंवा चौकट देणं. १०) फोटोचे कोपरे गोलाकार करणं. ११) फोटोखाली छान अक्षरांत टीपा किंवा नावे वेगवेगळ्या रंगात देणं. (पिकनीक फॉंट फार सुंदर आहेत. ते पहाच. १२) फोटोचं रेखाचित्र तयार करणं. १३) फोटो नाईटव्हिजन (हिरव्या प्रकाशात) मध्ये काढल्याप्रमाणे परिणाम तयार करणं. वगैरै वगैरे वगैरे.
ह्या सुट्टीच्या दिवसात छोट्या दोस्तांसाठी ही picnik.com एकदम मस्त टाईम पास साईट आहे. टाईम पास तर आहेच पण आपले उद्योग आणि उपदव्याप चाललेले असताना आपण नकळत फोटोचं तंत्रही शिकत असतो. आजकाल घराघरातून टीव्ही जसे आलेले आहेत, तसे डिजिटल कॅमेरेही आले आहेत. त्यातले फोटो आपण आपल्या संगणकात साठवत असतो. त्या फोटोंवर सुद्धा आपल्याला हे सारे इफेक्ट आणि युक्त्या वापरून पाहता येतील. मात्र, मूळ फोटो शाबूत ठेवून त्याच्या कॉपीवरच हे उद्योग करून पहा. नाहीतर चांगलेच फटकेच प़डतील. पण समजा तुमच्याकडे डिजिटल कॅमेरा नसेल तर इंटरनेटवरचे कोणतेही फोटो तुम्हाला घेता येतील. तुमच्या संगणकातले इतर काही निरूपयोगी फोटो किंवा चित्रे सुद्धा त्यासाठी उपयोगात येतील. सगळे उद्योग झाल्यानंतर आलेल्या इफेक्टचा फोटो तुम्हाला तुमच्या संगणकावर सेव्ह करता येतो. किंवा flickr.com, पिकासा वेब अल्बम वगैरेमध्येही ठेवता येतो.
पिकनीक डॉट कॉमचं कौतुक जगातल्या अनेक काँप्युटर मॅगझीन्सनी तोंड भरून केलं आहे. पीसी मॅगझीन पासून ते सीनेट पर्यंत, आणि वॉल स्ट्रीट जर्नल पासून ते बीबीसी व टाईम मॅगझीनपर्यंत अनेकांनी पिकनीक डॉट कॉमचं परिक्षण छापलं आहे. पिकनीक सारखी फोटोचं अॅप देणारी वेबसाईट आज तरी विरळा आहे. पण मंडळी, अतिशय झपाट्याने आपलं इंटरनेट विकसित होतय. पूर्वीसारख्या नुसत्या मुक्या साईटस आता जुनाट गणल्या जाऊ लागल्या आहेत. वेबअॅप आणि डायनॅमिक कंटेंटचे आता दिवस आहेत. पिकनीक डॉट कॉम ही सध्याच्या दिवसांचीच एक प्रतिनिधी आहे.
फोटोग्राफीमध्ये रस असणार्‍या प्रत्येकाने पिकनीक ला भेट द्यायला हवी.