८ मे, २०११

काच फोडली डोक्यावर, खापर फुटलं फेसबुक वर....

रूथ रेमिरेझ उर्फ टुटी, शिकागो शहरात राहणारी 26 वर्षीय तरूणी. डोकं गरम. रात्री लेग रूम नावाच्या क्लबात गेली. तिथं तिचा दुसऱ्या एकीशी राडा झाला. रूथ एकदम रूथलेस झाली. तिनं हात उचलला. तो उचललेला हात त्या दुसरीनं झटकून खाली केला. रूथच ती. डबल रूथलेस झाली. गेली आणि कुठून तरी एक काच उचलून आणली. घातली ती काच त्या दुसरीच्या डोक्यात. दुसरीची हालत खराब. 32 टाके पडले तिच्या डोक्यात. मग रूथ कशाला तिथे थांबते. ती सटकली. . पुढे?

हीच ती रूथ

पुढे ती दुसरी हॉस्पिटलात अॅडमिट. 32 टाके म्हणजे काय खायचं काम आहे!
झालं, रूथनं डोकं फोडून झाल्यावर थांबायचं की नाही? पण नाही. त्या दुसरीला शिकवलेला धडा तिला आपल्या मित्र मैत्रिणींना सुद्धा सांगावा वाटला. मग काय, ती गेली फेसबुकवर. तिथं लिहीला सगळा वृत्तांत. स्टेटस सांगून मोकळी.
रात्री पोलीस आले. कोणी मारलं काय चौकशी झाली. कशी होती, काय होती वगैरे पोलीसी प्रश्न आपल्या सारखेच. त्या दुसरीचं डोकं बँडेजमध्ये होतं, पण तिची मैत्रीण उशाशी होती, तिचं डोकं चाललं. तिनं फेसबुकवर सर्च केलं. लेग रूम क्लब मध्ये मारामारी वगैरे शब्द टाईप केल्यावर तिला एकदम फेसबुक प्रोफाईलच दिसला. रूथच्या  फोटोसकट. तिनं तो पोलीसांना दिला. पोलीसांनी फेसबुकचा धागा पकडला आणि रूथला अटक केली. 32 टाके तिला चांगलेच महागात पडले. तिला कोर्टाने जामीन सांगितला एक लाख डॉलरचा. आपले भारतीय पंचेचाळीस लाख रूपये की हो ते!
तात्पर्य काय, बाहेर जरा जपून. बाहेरचं नाही जमवता आलं तर मग फेसबुकवर तरी जपून ... फेसबुक काही कमी रूथलेस नाही!!
(ता.क. काहींनी ह्या प्रकरणाची बातमी मुळातून वाचायची इच्छा असल्याचे कळविले आहे. त्यांनी ह्या दुव्यावर जाऊन ही स्टोरी वाचावी.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा