१८ मार्च, २०११

गुगलवर पब्लीक डोमेनमध्ये उपलब्ध चित्रे, फोटोंचे प्रमाण किती?

आपण ब्लॉग लिहीतो. त्यावरील लेखनाबरोबर छायाचित्रे, चित्रे वगैरे टाकली की आपल्या पोस्टस चांगल्या दिसतात. पण गुगल इमेजेसमध्ये सर्च केल्यावर उपलब्ध होणारी सगळीच चित्रे आपल्याला वापरता येत नाहीत. याचं कारण सरळ की ती चित्रे कॉपीरायटेड किंवा संबंधित कलावंताचा स्वामित्वहक्क राखलेली असतात. अशी हक्क राखून ठेवलेली चित्रे  ब्लॉग वा संकेतस्थळावर वापरणं हे बेकायदेशीर ठरतं. त्यामुळे आपण शोधात असतो ते पब्लीक डोमेनमधील चित्रांच्या.
हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. समजा तुम्ही
ताजमहालशी संबंधित एक पोस्ट ब्लॉगवर टाकला आहे. जर तुम्ही स्वतः कॅमेऱ्यावर टिपलेली ताजमहालची चित्रे ब्लॉगसाठी वापरलीत तर प्रश्न नाही. कारण त्या छायाचित्रांवर तुमचाच मालकी हक्क वा कॉपीराईट आहे. पण समजा तुम्ही काढलेली छायाचित्रे नसतील तर मग आपल्याला अशी छायाचित्रे शोधावी लागतील की ज्याचा मालकी हक्क (कॉपीराईट) संबंधित कलावंताने जगाला बहाल केला आहे, अथवा कायद्याने ते हक्क जगाला मुक्तपणे बहाल केले आहेत. अशी मुक्त हक्कांनी युक्त व उपलब्ध चित्रे वा कलाकृती ह्या पब्लीक डोमेन मधील असतात.
आता तुम्ही गुगल ईमेजेस मध्ये Tajmahal म्हणून शोध घेतलात तर किती चित्रे वा छायाचित्रे उपलब्ध होतात? आकडा फारच मोठा आहे - 26,20,000 (सव्वीस लाख वीस हजार फक्त).
पण यात पब्लीक डोमेन मध्ये असलेली म्हणजे मुक्तपणे आपल्याला वापरता येणारी चित्रे/छायाचित्रे किती? फक्त 176.

आता हा 176 चा आकडा कसा मिळाला? त्याची कृती फार सोपी आहे.
प्रथम गुगल ईमेज सर्च वर जा.
त्यानंतर उजवीकडील Advanced Image Search  वर क्लीक करा.
येणाऱ्या पानावर खालून दुसरा मुद्दा पहा Usage rights  चा आहे.

म्हणजे उपलब्ध चित्रांचा कसा उपयोग करता येऊ शकतो याचे निकष इथे आहेत. ते एकूण चार निकष आहेत. पहिला - Labeled for reuse. ह्या प्रकारातील चित्रे जशीच्या तशी (म्हणजे त्यात काहीही बदल न करता) तुम्हाला वापरता येतील. मात्र ती धंदेवाईक वा व्यावसायिक उद्देशासाठी वापरता येणार नाहीत. तुमचा ब्लॉग सामाजिक उद्देशाचा असेल तर अडचण येणार नाही. पण तुमच्या कंपनीच्या वेबसाईटसाठी ती चित्रे वापरता येणार नाहीत, कारण तो उद्देश व्यावसायिक उद्देश ठरेल.
आता दुसरा प्रकार पहाः Labeled for commercial reuse. ही चित्रे तुम्हाला तुमच्या वेबसाईटसाठी सुद्धा म्हणजे व्यावसायिक उद्देशानेही वापरण्याची मुभा आहे.
हा तिसरा प्रकार पहाः Labeled for reuse with modification.  चित्रे वा छायाचित्रांत बदल करूनही ती वापरता येतील. पण फक्त सामाजिक उद्देशासाठी.
आणि, हा चौथा प्रकारः Labeled for commercial reuse with modification. ह्या प्रकारातील चित्रे आपल्याला त्यात बदल करून व्यावसायिक उद्देशानेही वापरता येतील.
आता वरील tajmahal चं उदाहरण पुढे चालवून पाहूः
पहिला निकष - Labeled for reuse मध्ये tajmahal ची चित्रे आहेत फक्त 176.
दुसरा निकष - Labeled for commercial reuse मध्ये हा आकडा 127 पर्यंत खाली येतो.
तिसरा निकष- Labeled for reuse with modification मध्ये आकडा आहे 159.
चौथा निकष - Labeled for commercial reuse with modification साठी हा आकडा 122 आहे.
मंडळी, इंटरनेटवरील कलाकृतींच्या हक्कांचा विषय हा असा गंभीर आहे. कुठे तो सव्वीस लाखाचा आकडा, आणि कुठे तो 176 चा आकडा. इंटरनेटवर अधिकृतपणे पब्लीक डोमेनमध्ये असलेल्या कलाकृती तुलनेने खूपच कमी आहेत. तेव्हा गुगल इमेजेस मधील चित्रे वापरताना सावधान.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा