१० मार्च, २०११

वेगवेगळे संगणकः नामे आणि कारनामे

एक वर्क स्टेशन, पीसी, डेस्क टॉप वगैरे...

पीसी, वर्क स्टेशन, डेस्क टॉप, सर्व्हर, मेनफ्रेम, सुपर काँप्युटर ही आणि आणखीही काही संगणकाचीच नावे. इथून तिथून ती सारखी कानावर पडत असतात. एकाच संगणकाची ही सारी नावे आहेत, की प्रत्येक नाव हे वेगळ्या संगणकाचे आहे? हा प्रश्न बरेचदा आपल्या मनात रेंगाळत असतो. त्याचं उत्तर मिळवावसं वाटतं, पण ह्या ना त्या कारणाने ते राहून गेलेलं असतं. संगणकइन्फो मध्ये आज त्या उत्तरावर कटाक्ष टाकूः

1) पीसीः अर्थात पर्सनल काँप्युटर. फार पूर्वी खोलीएवढे अवाढव्य संगणक होते. असे संगणक वापरण्यासाठी अनेक माणसे असत. पुढे प्रगती होत गेली आणि संगणक आकाराने लहान झाले. लहान संगणकांना मग मायक्रो-काँप्युटर्स म्हणण्याची पद्धत पडली. हे लहान म्हणजे मायक्रो-काँप्युटर्स मोठ्या संगणकाप्रमाणेच सर्व कामे करू शकत असत. मात्र त्यांना फार थोडी जागा लागे, आणि त्यावर काम करण्यासाठी फारच कमी माणसे लागत. मायक्रो-काँप्युटर्समधूनच नंतर पर्सनल काँप्युटर उदयाला आला. टेबलावर राहू शकेल इतक्या लहान आकाराचा, आणि एका माणसाला सहजपणे वापरता येण्याजोगा. हा पीसी. व्यक्तीगत संगणक. तो लॅप टॉप प्रकारचाही असू शकेल, किंवा टेबलावर कायम असलेला, सहजी हलविता न येणारा डेस्कटॉपही असू शकेल. 
2) वर्क स्टेशनः हाही टेबलावरचाच संगणक. एका माणसाने वापरण्याचाच. म्हणजे खरं तर पी.सी.च. पण त्याला पी.सी. म्हणायच्या ऐवजी वर्क स्टेशन म्हंटलं जातं, याचं कारण त्याची क्षमता आणि तुलनेने मोठा आकार. अधिक क्षमतेचा प्रोसेसर त्यात असणार हे ओघानच आलं. मेमरीही घसघशीत असणारच. गेम्स तयार करण्यासाठी, थ्रीडी ग्राफीक्ससाठी किंवा अॅनीमेशनसाठी असे तगडे संगणक लागतात. खूपदा त्यांचे मॉनिटर्स देखील चांगलेच मोठे असतात. तुमच्या घरच्या संगणकात प्रोसेसर, मेमरी वगैरे प्रचंड क्षमतेची असेल आणि तुम्ही त्यावर मोठ्या आकाराच्या फाईल्सचे काम करीत असाल तर तुमचा संगणकही वर्क स्टेशन प्रकारातच येईल. 
3) डेस्क टॉपः तुमच्या टेबलावर कायम विसावलेला संगणक. डेस्क हा शब्द टेबल ह्या अर्थाचाच. डेस्क टॉप संगणक हा मोठ्या क्षमतेचा असेल किंवा मध्यम वा कमी क्षमतेचाही असेल. पी.सी. हा एकाच वेळी डेस्क टॉप आणि वर्क स्टेशनही असू शकेल. मात्र लॅपटॉप टेबलावर कायम ठेवून वापरलात तरी त्याला डेस्क टॉप म्हणता येणार नाही. 
4) मेन फ्रेमः जुन्या काळात मोठ्या कंपन्यांमध्ये असलेले प्रचंड आकाराचे संगणक. हे एकेका खोलीइतकेही असत. किंवा, चक्क एखादा मजलाच्या मजला त्यांनी व्यापलेला असे. पुढे संगणक आकाराने लहान आणि क्षमतेने मात्र कितीतरी अफाट होत गेले. पण सवयीने आजही कितीतरी कंपन्यांमध्ये मेन फ्रेम हे शब्द वापरले जाताना दिसतात. लाखो उलाढाली करणारा संगणक, बहुधा तो एखाद्या टेबलावरच स्थानापन्न असतो. पण त्याच्या राक्षसी क्षमतेमुळे त्याला आपलं मेनफ्रेम म्हणायचं, इतकच. बाकी जुन्या काळातली आकाराची अवाढव्यता केव्हाच इतिहासात जमा झालीय.
5) सुपर काँप्युटरः भारताचा 'परम' हा सुपर काँप्युटर घ्या. आपल्या डॉ. विजय भटकरांच्या नेतृत्वाखाली तो तयार झाला हे आपण नेहमीच वाचतो आणि ऐकतो. सुपर काँप्युटर हा संख्येने एक असेल किंवा एकाच वेळी तो अनेक संगणकांचा पुंजकाही असेल. सामान्यतः सुपर काँप्युटर प्रकारातील संगणक हा मोठ्या गुंतवणूकीने तयार झालेला असतो. पीसी हा एका पेठेएवढा असला तर सुपर काँप्युटर हा खंडप्राय वा एखाद्या ग्रहाएवढा असल्यासारखा आहे. 
सर्व्हरः असा संगणक की जो त्याच्याशी जोडलेल्या इतर संगणकांना काही तरी सेवा पुरवतो. जोडलेले जे संगणक सर्व्हरची सेवा घेतात त्यांना क्लायंट असं म्हणण्याचीही पद्धत आहे. इतर संगणकांशी जोडलेला असल्याने सर्व्हर हा नेहमी नेटवर्कमध्येच असतो. थोडक्यात, एकमेकांशी जोडलेल्या अनेक संगणकांमधील जो मायबाप दाता संगणक असतो त्याला सर्व्हर असं म्हणतात. 
1980 सालचा एक मेनफ्रेम संगणक
पुढील एका पोस्टमध्ये आपण लॅपटॉप, नोटबुक, नेटबुक, पीडीए, टॅब हे कुठेही सहज नेता-आणता येणारे संगणक नेमके एकमेकांपासून कसे वेगळे असतात याची माहिती घेऊ. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा