२ मार्च, २०११

मराठी ब्लॉगः एक रांगतं माध्यम (लोकसत्ता, लोकरंग पुरवणीतील लेख)आज आपल्याला जे मराठी ब्लॉग्ज ऐकायला, वाचायला आणि पाहायला मिळतात, त्यातले बहुसंख्य एक तर गुगल कंपनीच्या Blogger.com (blogspot.com) वर किंवा Wordpress.com ने देऊ केलेल्या सेवेचा लाभ घेणारे आहेत. इंटरनेटवर सहज उपलब्ध असलेल्या या दोन्ही सेवा पूर्ण मोफत आहेत आणि आता चांगल्या स्थिरावल्या आहेत. इ’Blogger आणि Wordpress या दोन्हींची सुरुवात २००३ सालातली. अमेरिकेबाहेर इतर भाषांमध्ये ब्लॉगलेखनाचा प्रसार झाला, तो मुख्यत्वे २००३ नंतरच. म्हणजेच आपले मराठी ब्लॉग्ज हे काळाचं वय पाहता केवळ सात-आठ वर्षांचे आहेत. मराठी ब्लॉग्ज हे केवळ ‘युनिकोड’ प्रकारचे फाँट्स वापरूनच होऊ शकतात, हे आता सर्वानाच माहीत झालं आहे. अनेक कारणांमुळे २००७ पर्यंत मराठीसाठी ‘युनिकोड’चा वापर फारच थोडय़ा प्रमाणात झाला आणि त्यामुळे २००७ पर्यंत फारच नगण्य म्हणता येतील, इतकेच मराठी ब्लॉग्ज झाले. म्हणजेच मराठी ब्लॉग्ज रूजण्याचा खरा काळ हा २००७ ते २०१० असा केवळ चार वर्षांचाच आहे.
मराठी ब्लॉगलेखन
इंटरनेट आणि त्यासंबंधीचं सर्व तंत्रज्ञान आपल्याकडे अमेरिकेतून इंग्रजी वेष्टनात बांधून आलं. ते वेष्टन उघडल्या-उघडल्या जमेल तसं त्यावर मराठी प्रतिशब्दांचे शिक्के मारायला आपण सुरुवात केली. त्यातून मग ‘ब्लॉग’ या शब्दाचं बारसं ‘अनुदिनी’ हा अस्सल मराठी शब्द त्यासाठी योजून झालं. १८५७ साली (सुमारे दीडशे वर्षांपूर्वी) प्रसिद्ध झालेल्या मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोशाने ‘अनुदिनी’ या शब्दाचा अर्थ इंग्रजीत 'Every day' असा दिला आहे. त्यामुळे आपले मराठी ब्लॉग लिहिणारे बांधव दररोज ब्लॉग (अनुदिनी) लिहिणारे असावेत, असा समज होणं स्वाभाविक आहे. पण प्रत्यक्षात आपले किती ‘अनुदिनी लेखक’ त्यांचे मराठी ब्लॉग्ज दररोज लिहितात, हा संशोधनाचा विषय आहे. मराठीत जगभरात आज सुमारे तीन हजार ते साडेतीन हजार ब्लॉग्ज असावेत व त्यातले जेमतेम २५० किंवा त्यापेक्षाही कमी हे दररोज लिहिले जाणारे असावेत, असा अंदाज व्यक्त केला जातो. मराठी ब्लॉग्जची नेमकी स्थिती, संख्या व दिशा यांची नोंद घेणारी वा त्यांचे प्रोत्साहनार्थ नियमन करणारी कोणतीही यंत्रणा आज उपलब्ध नाही. राज्य सरकारच्या नव्या मराठी विभागाने त्यात लक्ष घातल्यास महाराष्ट्रात एक वेगळे चित्र पुढल्या काही वर्षांत दिसू शकेल.
आजचे मराठी ब्लॉग्ज
महाराष्ट्रात आज फेसबुकचा वापर तरूणाई फार मोठय़ा प्रमाणात करत आहे. अगदी गाव, तालुका आणि जिल्हा पातळ्यांवर सायंकाळी सायबर कॅफेच्या दारावर नजर टाकली की, चपला-बुटांचा ढीग दिसतो. आत जाऊन पाहावं तर मंडळी फेसबुकात डोकं घातलेली दिसतात. मध्यंतरी नांदेडमध्ये गेलो असताना तेथील सायबर कॅफेत आलेल्या काही तरूण मित्रांशी याबाबत संवाद साधला. ते म्हणाले, ‘आम्ही फेसबुकवर भेटतो, गप्पा मारतो, पण मराठी टायपिंग करता येत नाही. कसंतरी इंग्रजी कम मराठीतच मॅनेज करतो. फेसबुकचं मराठी सेटिंग अजून जमत नाही.’ इंग्रजी कच्चं आणि मराठी पक्कं नाही, अशा स्थितीतही फेसबुकवर बसणारे तरूण हजारोंच्या संख्येने आहेत. हे तरूण मठ्ठ आहेत, असं मात्र अजिबात नाही. उघडय़ा डोळ्यांनी ते आज जे घडतं आहे, ते पाहत आहेत, ऐकत आहेत, कदाचित कमी वाचत असतील, पण त्यांना जगात काय चाललं आहे, हे कळतंय आणि त्यांची त्यावरची आपली स्वतची मतं आहेत. ही मतं विस्ताराने लिहावीत, यासाठी त्यांचे मराठी सेटिंगचे म्हणजे ‘युनिकोड’ तंत्राबद्दलचे अज्ञान किंवा अपुरे ज्ञान यासाठी काहीतरी करायला हवे. तसे झाल्यास आज दिसणाऱ्या मराठी ब्लॉग्जचा दर्जा अनेक पटींनी वाढण्यास मदत होईल.
आजच्या मराठी ब्लॉग्जमध्ये चाकोरीबाहेरचे विषय हाताळणारे काही लेखक निश्चितच आहेत. केवळ विनोद, कविता, प्रवास वर्णनं, स्वतचे अनुभव व वरवरची मते यांनी भरलेल्या ब्लॉग्जची गर्दी ही सर्वच भाषांत दिसते, तशी मराठीतही आहे, आणि ती राहणारच. ती राहणं हे अंतिमत: उपकारकही आहे. प्रश्न सुमारांच्या गर्दीचा नाही. कारण ब्लॉगोस्फिअरमध्ये लाखो करोडो कोरी पाने उपलब्ध होऊ शकतात. ती कमी पडणार नाहीत. फक्त त्यातून वाचायलाच हवीत, अशी चमकदार पानं तयार व्हायला हवीत. त्या दृष्टीने नाटक सिनेमांचं होतं, तसं ब्लॉग्जचं परीक्षण किंवा त्यांना एक ते पाचच्या श्रेणीत बसवणं अशी व्यवस्था नाही. वृत्तपत्रं सिनेमांना एक ते पाच स्टार्स देऊन परीक्षणं करत असतात. कारण ती पठडी आता पक्की झाली आहे. ब्लॉग्जनाही तसा न्याय लावावा, एवढय़ा दर्जाचे ते नसावेत, असं वृत्तपत्रांना कदाचित आज वाटत असावं. त्यासाठी एकूण मराठी ब्लॉग्जची संख्या आज वाढायला हवी. मराठी नाटकांचा जोमाने प्रसार होण्यामागे वृत्तपत्रांनी त्यांना देऊ केलेले सवलतीचे जाहिरातदर हे देखील एक कारण होते. मराठी ब्लॉग्जसाठीदेखील तशा प्रकारच्या ‘दे धक्क्या’ची गरज आज आहे.
आज अनेक मराठी पत्रकारांचे स्वतचे ब्लॉग्ज आहेत. पण इंग्रजीत ज्या नियमितपणाने ब्लॉग्ज चालतात, तेवढा नियमितपणा आणि सातत्य आपल्यात दिसत नाही. त्याचं एक कारण अजून ब्लॉग या प्रकाराला मराठीत जे ग्लॅमर प्राप्त व्हायला हवं, तेवढं मिळालेलं नाही. ब्लॉग हा प्रकार आपणदेखील जेवढा गांभीर्यानं घ्यायला हवा, तेवढा घेतलेला नाहीय. आपल्या हातातला मोबाइल फोन आपण आज गांभीर्यानं घेतला आहे, कारण आपल्याला त्याचा उपयोग नीट कळला आहे. आपल्या हातातला किंवा लेखणीतला ब्लॉग आपल्याला त्या दृष्टीने अजून नीट कळायचा आहे. ही बाब ब्लॉग्जना (अगदी पत्रकारांच्या गंभीर ब्लॉग्जनाही) ज्या प्रकारच्या सवंग कॉमेंटस् येतात, ते पाहिलं की ते जाणवतं. ब्लॉग्जवरील कॉमेंटस्चा दर्जा वाढण्यासाठी उत्कृष्ट कॉमेंटस्चाही गौरव व्हायला हवा. जर ब्लॉग्जची स्पर्धा आयोजित केली जात असेल तर त्यात एक पुरस्कार उत्कृष्ट कॉमेंटलाही देण्यात आला पाहिजे. ब्लॉग ही गांभीर्याने घेण्याचीच गोष्ट आहे. भले तो ब्लॉग विनोदासाठी वाहिलेला का असेना! उदाहरण देऊनच सांगायचं तर राजकीय पक्षाचं खुलं अधिवेशन, विधानसभा किंवा लोकसभा यांच्यात जो फरक आहे वा असावा, तो ब्लॉग आणि आपल्या नेहमीच्या ऑनलाइन भंकस यामध्ये रहायला हवा. तसं झालं नाही तर ब्लॉग हा प्रकार वेगळा असण्याची गरज राहणार नाही. फेसबुक वा तत्सम माध्यम ती गरज भागवू शकेल. आगामी २०१२ आणि २०१३ ही वर्षे टॅबची, आयपॅडची किंवा गॅलक्सी वगरेंची आहेत. त्यावर ब्लॉग्जना आपले स्वतचे स्वयंभू स्थान असणार आहे. मात्र त्यात चमक व दर्जा नसेल, आणि नुसतीच भंकस चालणार असेल तर कोणीही त्यासाठी वेळ देणार नाही, हेही तेवढच खरं.
काही वैशिष्टय़पूर्ण ब्लॉग्ज
ब्लॉग सजवणं, तो रंगबिरंगी, हलता-डुलता करणं हे आज फार सोपं झालं आहे. शाळेत मुलाच्या हातात सुशोभित पाटी किंवा वही द्यावी, अशा ब्लॉगच्या देखण्या टेम्पलेटस् शेकडय़ाच्या संख्येने समोर हात जोडून मोफत डाऊनलोडसाठी उभ्या आहेत. लहान-लहान मुले त्यांचा उपयोग करताना दिसतात. प्रश्न ब्लॉग कसा दिसतो हा नाहीच, तर त्यात काय आहे, हा आहे. सगळीकडे ‘कंटेंट विल बी दि किंग’ असं म्हटलं जातं. मराठी ब्लॉग आज चाकोरीबाहेरच्या कंटेटसाठी आसुसलाय. चाकोरीबाहेरचे ब्लॉग आले की, ते वाचण्यासाठी वाचक हजारोंच्या संख्येने या महाराष्ट्रातल्या जिल्ह्या-जिल्ह्यांत वाट पाहत आहेत. जोडीला वादळी प्रचारासाठी फेसबुक आणि ट्विटरसारखी अवजारे आहेत. लक्षात हे घ्यायला हवं की, फेसबुक हे कॉलेजच्या कॅन्टिनसारखे, तर ब्लॉगोस्फिअर हे सभागृहात उत्साहानं चाललेल्या चर्चासत्रासारखं आहे. दोन्हींची आपली दालनं वेगळी आहेत. ती एकमेकांना उपकारक ठरत राहतील आणि आपापलं वेगळंपणही जपत राहतील. अमेरिकेत आज ब्लॉगवर लिहून उपजिविका करणारे, पगारापेक्षा अधिक रक्कम त्यातून नियमित मिळवणारे आहेत. ते भाग्य मराठी ब्लॉग लिहिणारांच्या वाटय़ाला कधी येईल का, या प्रश्नाचं उत्तर अनेक संबंधित घटकांच्या एकत्रित परिणामात लपलेलं आहे. प्रत्येकाच्या हातात क्षणाक्षणाला मोबाइलचा कॅमेरा आहे. त्यात पकडलेल्या छायाचित्राचे किंवा चलत्चित्राचे क्षण तिथल्या तिथे मोबाइलमधूनच ब्लॉगवर प्रकाशित होऊ शकतात. घडल्या क्षणापासून काही सेकंदात ते चित्र जगाला दिसू शकतं. ‘सिटीझन जर्नालिझम’चं फार मोठं बीज नजिकच्या काळात मराठी ब्लॉग्जमध्ये रूजू शकतं. ‘सिटीझन जर्नालिझम’ या शक्तीचा अंदाज आपल्याला अजून यायचा आहे. ब्लॉग हे त्यासाठीचं जबरदस्त व्यासपीठ आहे.
मराठीतले काही ब्लॉग्ज लक्ष वेधून घेणारे आहेत. ते सगळं वाचलं जाणं, वा प्रत्येकातली प्रत्येक पोस्ट वाचली जाणं, हे अशक्य कोटीतलं आहे. काही उत्तम ब्लॉग्ज नजरेतून सुटलेले असण्याची दाट शक्यता आहे. माझ्या वाचनात आलेल्या ब्लॉग्जपकी काहींनी विशेष लक्ष वेधून घेतलं. त्यातले काही ब्लॉग्ज असे :

१) गणेश मतकरी यांचा http://apalacinemascope.blogspot.com

२) परेश प्रभू यांचा http://pareshprabhu.blogspot.com

३) नितीन पोतदार यांचा http://www.myniti.com

४)http://sujaanpalaktva.blogspot.com

५)http://chakali.blogspot.com

६)http://sahajach.wordpress.com

७)http://restiscrime.blogspot.com

८)http://mazisahyabhramanti.blogspot.com

९)http://dhondopant.blogspot.com

१०)http://aadityawrites.blogspot.com

११)http://www.2know.in

१२)http://chehare.blogspot.com

१३)http://sahajsuchalamhanun.blogspot.com

१४)http://kayvatelte.com

१५) http://vinayak-pandit.blogspot.com
पारंपरिक ज्ञानकोशापेक्षा अधिक क्षमतेचं माध्यम
ब्लॉग हा एकटय़ाला लिहिता येतो, दोघांना लिहिता येतो आणि अनेकांना मिळूनही लिहिता येतो. एकाचवेळी जगातल्या चार कोपऱ्यात हजारो मल दूर असताना ब्लॉगच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहून ब्लॉग लिहिला जाऊ शकतो. जगातील कोणालाही कुठेही आणि केव्हाही तो वाचता येतो. एका ब्लॉगमधील किंवा एकाचवेळी लाखो ब्लॉग्जमधील विशिष्ट विषयाचे संदर्भ क्षणार्धात गुगल (क्रियापद) करून शोधता येतात. व्यक्तीबरोबर संस्था आणि सरकारी ब्लॉग्जही असतात. चित्रपट, ध्वनिप्रसारण, छायाचित्रे आणि त्याला तात्काळ परस्परसंपर्काच्या (इंटेरॅक्टिव्हिटी) क्षमतेची जोड या वैशिष्टय़ांमुळे ब्लॉग हे माध्यम ज्ञानप्रसारणाच्या क्षमतेत पारंपारिक ज्ञानकोशाला मागे टाकू शकतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाच्या आवाक्यातलं हे माध्यम आहे. स्वतंत्र संकेतस्थळ आणि ब्लॉग यांच्यातला फरक स्वतंत्र बंगला आणि टू बेडरूम किचन फ्लॅट असा आहे. ब्लॉगच्या माध्यमात देवकीला झालेल्या आठव्या पुत्राची ताकद आहे. फक्त हे बाळ आज रांगतं आहे. किशोरवयात एखाद्या कालियाचं मर्दन त्याने केलं की, ते लक्ष वेधून घेईल. या जगाच्या तोंडून गीता वदवण्याची कुवतही त्याच्यात उद्या असेल. हे आपण आजच ओळखलेलं बरं..

(लोकसत्ता - लोकरंग पुरवणी दिनांक 27 फेब्रुवारी 2011)
लोकसत्ता लिंकः
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=138966:-blog---&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117#JOSC_TOP

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा