३० मार्च, २०११

कल्पवृक्ष ‘गुगल’ ची कथा (9) - क्रमशः

योगायोग कसे असतात पहा.  जावा लँग्वेजचा जन्मदाता जेम्स गोस्लींग याने १९९५ साली जावाची पहिली नवी कोरी आवृत्ती सन मायक्रोसिस्टम्स कंपनीत बसून प्रकाशित केली. १९९६ साली लॅरी पेज तीच जावा प्रोग्रामिंग लँग्वेज वापरून बॅकरब सर्च इंजिन तयार करीत होता. आता आजची बातमी ऐका. २८ मार्च २०११ (होय, दोनच दिवसांपूर्वीची ताजी बातमी आहे ही) रोजी जेम्स गोस्लींग हा गुगल कंपनीच्या नोकरीत रूजू झाला आहे. जेम्स गोस्लींग ही संगणक जगतातली फार मोठी असामी आहे. .

 -----------------------------------------------------------------------------------------
(वाचकांसाठी सुचनाः  ह्या लेखमालेतील हा नववा भाग आहे. सुरूवातीपासून भागांच्या क्रमानुसार वाचावं अशी विनंती आहे. त्यात अधिक रोचकता तर आहेच, पण स्थल, काल आणि नावे यांच्यातील सुसंबद्धताही त्याने साधली जाते. पूर्वीच्या भागांच्या लिंक्सः भाग 1,  पुढील लिंक्स )
----------------------------------------------------------------------------------------
  लॅरीचं पहिलं सर्च इंजिन 'बॅकरब' आणि सर्जी बरोबरचे जुळलेले सूर
गुगल जन्माला आलं ते बरच नंतर. त्या अगोदर आपल्या अभ्यासाचा भाग म्हणून लॅरीने एक सर्च इंजिन स्टॅनफोर्ड विद्यापीठात तयार केल होतं. त्याचं नाव बॅकरब. खालील चित्र पहाः
 चित्रात दिसतोय तो हात लॅरीचा आहे. स्कॅनरवर हात ठेवून तो स्कॅन केला आहे आणि त्यावर BackRub ही इंग्रजी अक्षरे टाकून बॅकरब सर्च इंजिनचा लोगो तयार करण्यांत आला. विद्यापीठात उपलब्ध आहेत तेवढ्याच सुविधा वापरून लोगो तयार करायचा म्हंटल्यावर हा शॉर्टकट चांगला कल्पक म्हणावा लागेल.
बॅकरबची कल्पना साधी सोपी होती. मूळ लिंकला लागून त्याच्या मागे एकूण किती लिंक्स आहेत याचा मागोवा म्हणजे बॅकलिंक्सचा शोध घेणे ही मूळ संकल्पना. म्हणून त्याचं नाव बॅकरब. लॅरीने हे पेज १९९६ मध्ये तयार केलं. आजही तुम्हाला ते पाहता येतं, पण ते जुन्या काळातलं पान हे एखाद्या म्युझियममध्ये पेंढा भरलेला वाघ असावा तसं आहे. ते पान बॅकरबचं असलं तरी त्यावर तुम्हाला आता शोध घेता येणार नाही. त्या दृष्टीने तो जिवंत वाघ नाही. पण बाकी पान जसं होतं तसं पहायला मिळतं ते waybackmachine.org च्या सौजन्याने. बॅकरबचं ते १९९६-९७ मधलं पान ह्या दुव्यावर जरूर पहाः
बॅकरबचं ते पान पाहिलत तर १९९६ चा काळ हा आजच्या काळाच्या तुलनेत तांत्रिक दृष्ट्या तुम्हाला मागासलेला वाटल्याशिवाय राहणार नाही. त्या पानावर भल्या मोठ्या टाईपात लॅरीने लांबलचक संदेश दिला आहे -
Sorry, many services are unavailable due to a local network faliure beyond our control. We are working to fix the problem and hope to be back up soon.
त्यातलं failure चं स्पेलींगसुद्धा (बहुधा घाईचा अतिरेक झाल्याने) चुकलेलं दिसतं आहे. लॅरीच्या त्या संदेशावरून आपल्या लक्षात येतं की स्टॅनफोर्ड विद्यापीठ एरवी सुसज्ज म्हणून प्रसिद्ध असलं तरी लॅरीच्या संशोधनासाठी ते अपुरं पडत होतं. खरं तर लॅरी सॉरी म्हणत होता ते स्टॅनफोर्डच्याच वतीने. बॅकरबचं प्रोग्रामिंग करण्यासाठी जावा आणि पायथॉन ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस वापरण्यांत आल्या होत्या. त्यांना जोड होती इंटेल पेंटियम संगणकाची, आणि त्या संगणकांवर ऑपरेटींग सिस्टम होती लिनक्स. आता ह्या पार्श्वभूमीवर पुन्हा १९९६ साल आठवून पहा. त्या काळातले आजच्या तुलनेत कितीतरी स्लो असलेला तो पहिल्या पर्वातला पेंटीयम. बग्जने भरलेली ती लिनक्स सिस्टम. १९९५ मध्ये नुकतीच जन्माला आलेली जावाही पुढल्या सुधारणेसाठी धडपडत असलेली. म्हणजे शेतातल्या गुडघाभर चिखलातून धावण्याचाच तो प्रयत्न होता. सॉरी म्हणण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. लॅरीच्या पुढे आणि विद्यापीठापुढेही.
योगायोग कसे असतात पहा. जावा लँग्वेजचा जन्मदाता जेम्स गोस्लींग याने १९९५ साली जावाची पहिली नवी कोरी आवृत्ती सन मायक्रोसिस्टम्स कंपनीत बसून प्रकाशित केली. 
जेम्स गोस्लींग
१९९६ साली लॅरी पेज तीच जावा प्रोग्रामिंग लँग्वेज वापरून बॅकरब सर्च इंजिन तयार करीत होता. आता आजची बातमी ऐका. २८ मार्च २०११ (होय, दोनच दिवसांपूर्वीची ताजी बातमी आहे ही) रोजी जेम्स गोस्लींग हा गुगल कंपनीच्या नोकरीत रूजू झाला आहे. जेम्स गोस्लींग ही संगणक जगतातली फार मोठी असामी आहे. जावा लँग्वेजचा जनक तर तो आहेच, पण सन मायक्रोसिस्टम्स ही कंपनी पुढे आणण्यातही त्याचा तांत्रिक सहभाग फार मोठा आहे. सन मायक्रोसिस्टम्स जानेवारी २०१० मध्ये ओरॅकल कंपनीने विकत घेतली. ओरॅकल आणि जेम्स गोस्लींग याचे सूर जुळले नाहीत, आणि त्यामुळे अगदी पहिल्याच दिवसापासून जेम्स गोस्लींगने स्वतःला कामापासून मुक्त केले. त्यानंतर जेम्स गोस्लींग जवळ जवळ वर्षभर घरीच (वा, काय शब्द आहे..) होता. त्यानंतर तो दोन दिवसांपूर्वी गुगलमध्ये रूजू झाला. एकीकडे जेम्स गोस्लींगने गुगल धरले, आणि दुसरीकडे ह्या एप्रिल महिन्यापासून लॅरी पेजने गुगलचा सीईओ म्हणून सुत्रे हाती घेतली आहेत. ह्यापूर्वी सीईओ म्हणून एरिक श्मिट हा अत्यंत हुशार व्यवस्थापक गुगलचा सीईओ म्हणून काम करीत होता. अनेक वर्षे गुगलमध्ये काम करून, आणि गुगलची चांगली भरभराट करून आता एरिक श्मिट यांनी गुगल सोडली आहे. इतके दिवस गुगलचा संचालक असलेल्या लॅरी पेजने आता अंगावर फार मोठी जबाबदारी घेतली आहे. त्याच सुमारास जेम्स गोस्लींग लॅरीच्या जोडीला गुगलमध्ये प्रवेश करता झाला आहे. असो.
आपण १९९६ चा आणि जावाचा संदर्भ आल्यावर जेम्स गोस्लींगकडे वळलो होतो. पुन्हा आता पहिल्या विषयाकडे म्हणजे बॅकरब कडे वळू. वरच्या दुव्यावरचं ते बॅकरब चं पान नीट पहा. लॅरी त्यावर म्हणतोः  
BackRub is a "web crawler" which is designed to traverse the web.
Currently we are developing techniques to improve web search engines. We will make various services available as soon as possible.
बॅकरब हा वेबचा धांडोळा घेणारी यंत्रणा आहे. सध्या आम्ही (लॅरीने जाणीवपूर्वक स्वतःतला 'मी' टाळला आहे) वेब सर्च इंजिन्स सुधारण्यासाठी विविध तंत्रे तयार करीत आहोत. आम्ही लवकरच विविध सेवा उपलब्ध करणार आहोत.
गुगलची स्थापना पुढे १९९७-९८ मध्ये झाली, आणि त्यानंतर आजपर्यंत गुगलने किती विविध प्रकारच्या सेवा जगाला उपलब्ध करून दिल्या आहेत ते आपण पाहतोच आहोत. वास्तविक १९९६ मध्ये बॅकरब सर्च इंजिन हे लॅरीच्या पीएच.डी. च्या संशोधनाचा केवळ एक भागच होते. त्याला 'आम्ही लवकरच विविध सेवा उपलब्ध करणार आहोत' असं म्हणण्याचं तसं काहीच कारण नव्हतं. कोणतीही कंपनी लॅरी तेव्हा चालवित नव्हता. तो फक्त पीएच.डी. साठी प्रवेश घेतलेला विद्यापीठाचा एक विद्यार्थी होता. पण १९९६-९७ ह्या पहिल्याच वर्षी लॅरीतला विद्यार्थी बाजूस होऊन एक व्यावसायिकाला जागा करून देऊ पहात होता. त्याच्यातला तो व्यावसायिकच 'आम्ही लवकरच विविध सेवा उपलब्ध करणार आहोत' असं आश्वासन त्याच्या ग्राहकांना देऊ पहात होता. गुगलच्या जन्माची बीजं ही अशी विविध सेवांच्या आश्वासनात दडलेली आपल्याला सापडतात.
बॅकरब स्टॅनफोर्डच्या कॅंपसमध्ये चांगलं रूजत चाललं होतं, आणि त्याचा वापर हजारो लोक करू लागले होते ही त्याची एक बाजू होती. जरी तो विद्यापीठाच्या एका पीएच.डी. च्या विद्यार्थ्याचा संशोधन प्रकल्प होता, तरी इतरांसाठी ती एक सोयही झालेली होती हे खरं होतं. ती सोय होणं, आणि एकाच वेळी लाखो लोकांनी ते सर्च इंजिन वापरणं हे संशोधनासाठी आवश्यकही होतच. कधी कधी विद्याध्ययन आणि व्यवसायाची बीजं एकाच नावेतून प्रवास कशी करीत असतात हे बॅकरब ते गुगल ह्या उदाहरणावरून दिसून येतं.
बॅकरबच्या वाढत्या व्यापात सर्जी ब्रिन देखील चांगलाच कार्यरत होता. त्या दोघांना आणखी दोघांची साथ होती. ते विद्यार्थी म्हणजे स्कॉट हासन आणि अॅलन स्टेरेम्बर्ग. १९९७ मध्ये जेव्हा बॅकरबने गुगलचा अवतार धारण केला तेव्हा गुगलचे कॉपीराईट ह्या चौघांच्या नावे जाहीर करण्यांत आलेले होते.
२९ ऑगस्ट १९९६ ते १९९७ चे पहिले काही महिने बॅकरबचा व्याप चांगलाच वाढत गेला. वाढत्या व्यापाची आकडेवारी वरील दुव्यावर आपल्याला पहायला मिळते. गुगलच्या जन्माकडे जाण्यापूर्वी बॅकरबच्या आकडेवारीकडे एक नजर टाकायला हवी. हे आकडे पहाः
Total indexable HTML urls: 75.2306 Million
Total content downloaded: 207.022 gigabytes
Total indexable HTML pages downloaded: 30.6255 Million
Total indexable HTML pages which have not been attempted yet: 30.6822 Million
Total robots.txt excluded: 0.224249 Million
Total socket or connection errors: 1.31841 Million
एकूण साडेसात कोटी वेब पत्त्यांचे इंडेक्सींग, २०७ गिगाबाईट डेटा डाऊनलोड, ३ कोटी एचटीएमएल पानांचे डाऊनलोड हा पसारा एखादी कंपनी चालत असावी अशा प्रकारचाच होता. स्टॅनफोर्ड विद्यापीठातले विद्यार्थी आपल्या विषयांनी किती झपाटलेले असत हे त्यावरून दिसून येतं.
बॅकरबच्या अशा झपाट्यात विद्यापीठातले दिवस चालले होते. त्यात चढाव उतार होतेच. त्यातूनच एक दिवस गुगलचा जन्म झाला.
(पुढील भागात - विद्यापीठातील चढाव उतार, आणि गुगलचा जन्म)

1 वाचकांशी संवाद/कॉमेंटस:

Aditya म्हणाले...

लेख मस्त झाला आहे..
अतिशय अभ्यासपूर्ण...
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..

टिप्पणी पोस्ट करा