१३ मार्च, २०११

सन 1955, महिना मार्च, तारीख 13. पं. नेहरूंवर नागपूरमध्ये चाकूहल्ला

आज 13 मार्च 2011. बरोब्बर 65 वर्षांपूर्वी म्हणजे 13 मार्च 1955 रोजी नागपूर शहरात भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आले होते. सोनेगाव विमानतळावरून ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री रविशंकर शुक्ल यांच्या घरी निघाले होते. नागपूर तेव्हा मध्य प्रदेशचा भाग होते. तो काळ आजच्या सारखा झेड सिक्युरिटीचा नव्हता. नेहरू उघड्या मोटारीतून नागपूरच्या रस्त्यावरून प्रवास करीत होते. लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या जवाहरलाल नेहरूंवर हल्ला होईल असं कोणाच्या स्वप्नातही नव्हतं. पण, अचानक एक 32 वर्षांचा तरूण नेहरूंच्या त्या गाडीच्या दिशेने गेला. त्याच्या हातात चाकू होता.
तो नेहरूंवर झेपावला. पण चाकू चालवणार इतक्यात नेहरूंनी त्याला आपल्या हाताने जोराने ढकलले. नेहरूंच्या सुरक्षा व्यवस्थेतले काही पोलीस त्या तरूणाच्या दिशेने झेपावले. त्या तरूणाला त्यांनी ओढले. क्षणभर लोकांच्या हृदयाचा ठोकाच चुकला होता. त्या तरूणाचे नाव होते बाबू राव. तो साधा रिक्षा चालक होता.
हा हल्ला झाला तरी नेहरू हंसतमुख होते. नेहरू पत्रकारांना म्हणाले "अहो, तो तरूण साधा होता. त्याचा तो सुरा फक्त सहा इंचीच होता. त्याने मला काहीही झालं नसतं."
त्या तरूणाला नंतर मानसिक तपासणीसाठी नेण्यांत आलं.
1955 सालची, 65 वर्षांपूर्वीची ती बातमी मला इंटरनेटवर वाचायला मिळाली. कोणी म्हणेल की ती विश्वासार्ह बातमी असेल कशावरून. तर मित्रांनो, मी प्रत्यक्ष  Pittsburgh Post-Gazette ह्या दैनिकाच्या 14 मार्च1955 च्या अंकातील ती बातमी वाचली आहे. तुम्हालाही ती वाचता येईल. हा अंक इंटरनेटवर स्कॅन केलेला म्हणजे डिजिटाईज्ड स्वरूपात उपलब्ध आहे. तुम्हाला तो पहायचा असेल तर ह्या दुव्यावर जा..
प्रश्न ही एक बातमी वाचण्याचा नाही. तुम्हाला हव्या असलेल्या इतिहासातल्या बातम्या इंटरनेटवर उपलब्ध होत आहेत हा मुद्दा महत्त्वाचा आहे. डिजिटायझेशन तंत्राची ही किमया आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा