३ मार्च, २०११

अहो, चिमुकली इसापनीती 100 वर्षांची झाली...

राम गणेश गडकरी यांची एकच प्याला पासून राजसन्यास पर्यंतची नाटके माहित नाहीत असा मराठी माणूस मिळणे नाही. गडकरी ऐन तारूण्यात वयाच्या 34 व्या वर्षी गेले. पण तेवढ्या अल्पायुष्यातही त्यांनी महाराष्ट्रासाठी प्रचंड साहित्य संपदा निर्माण केली.
मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ॥

हे त्यांचे गीत महाराष्ट्राला आजही स्फुर्ती देत असते..
पण, गडकऱ्यांनी खास लहान मुलांसाठी लिखाण केले, आणि त्याचे एक पुस्तकही प्रकाशित झाले होते ही गोष्ट आज अनेकांना (अगदी मराठीच्या कितीतरी प्राध्यापकांनाही) ठाऊक नाही. ह्या पुस्तकाचे नाव, चिमुकली इसापनीती. गडकऱ्यांनी, परवडत नसतानाही, स्वखर्चाने ती प्रकाशित केली. हे पुस्तक फक्त 10 पानांचे आहे. त्यात इसापच्या जोडाक्षरविरहित लिहीलेल्या दहा गोष्टी आहेत.
ह्या दहा पानी पुस्तकाला गडकऱ्यांनी आवर्जुन प्रस्तावना लिहीली आहे. प्रस्तावनेच्या खाली तारीख आहेः 29/12/1910. म्हणजे 29 डिसेंबर 2010 रोजी चिमुकली इसापनीती ह्या पुस्तकाला 100 वर्षे पुर्ण झाली.
चिमुकली इसापनीतीच्या प्रस्तावनेत गडकरी काय लिहीतात पहाः

"... कोणाच्याही मदतीवाचून मुलांस हे पुस्तक वाचता येईल असा तर्क आहे. साध्या अक्षर ओळखीचा काळ तुलनात्मक दृष्टया थोडाच असल्यामुळे फक्त दहाच गोष्टी घेतल्या आहेत. वाचन सुलभ होण्यासाठी मुद्दाम मोठया टाईपाचा उपयोग केला आहे. चित्रेसुध्दा हवी होती; पण ते पडले जरा खर्चाचे काम. सुदैवाने पुढे मागे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघण्याचा सुयोग आलाच तर पाहता येईल..."

वरील लाल अक्षरांत दिलेले गडकऱ्यांचे 1910 सालचे शब्द नीट वाचा. गडकऱ्यांना चिमुकली इसापनीती मध्ये  चित्रेसुध्दा हवी होती; पण चित्रे देणे त्यावेळी गडकऱ्यांना परवडणारे नव्हते. गडकरी म्हणतात,  ते पडले जरा खर्चाचे काम. सुदैवाने पुढे मागे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघण्याचा सुयोग आलाच तर पाहता येईल.

गडकऱ्यांच्या दुर्दैवाने दुसऱ्या आवृत्तीचा सुयोग कधीच आला नाही. त्यामुळे चिमुकली इसापनीती पुढली 100 वर्षे चित्रांविनाच राहिली. पण गडकऱ्यांचे चित्रांचे ते स्वप्न चिमुकली इसापनीती 100 वर्षांची होता होता पूर्ण झाले. तो दिवस म्हणजे 25 डिसेंबर 2010. ह्या दिवशी ठाणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रकाशन कट्ट्यावर प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते www.ramganeshgadkari.com ह्या संकेतस्थळाचे प्रकाशन झाले. ह्या संकेतस्थळावर गडकऱ्यांचे समग्र साहित्य मोफत उपलब्ध आहे. समग्र साहित्यामध्ये अर्थातच ती  चिमुकली इसापनीतीही उपलब्ध आहे. संकेतस्थळावर चिमुकली इसापनीती प्रकाशित करताना प्रकाशक संगणक प्रकाशन यांनी त्या दहा गोष्टींना रंगीत चित्रांची जोड दिली. महाराष्ट्राच्या शेक्सपियरचे 100 वर्षांपूर्वीचे स्वप्न अशा प्रकारे पूर्ण झाले. मराठी साहित्य संमेलनाच्या प्रकाशन कट्ट्यावर हे स्वप्न पूर्ण झाले ही वृत्तपत्रांसाठी फार मोठी बातमी होती. पण दुर्दैवाने ही बातमी मराठी वृत्तपत्रांनीही दिली नाही. आज संगणक डॉट इन्फो वरून ती बातमी जगापुढे येत आहे.  
दुसरे दुर्दैव म्हणजे 2010 हे वर्ष जसे महाराष्ट्र राज्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते तसे ते गडकऱ्यांचे 125 वे जयंती वर्षही होते. गडकऱ्यांचा जन्म 24 मे 1885 चा. पण ज्या महाराष्ट्राला गडकऱ्यांनी गीतातून वंदन केले त्याला त्याची आठवण त्या सुवर्ण महोत्सवी वर्षभरात कधीच आली नाही. त्या वर्षात ramganeshgadkari.com इंटरनेटवर आले एवढेच एक समाधान.
ज्यांना चिमुकली इसापनीती आणि ती प्रस्तावना पूर्ण वाचायची आहे त्यांचेसाठी ती ह्या दुव्यावर उपलब्ध आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा