२१ फेब्रु, २०११

बहुगुणी गुगल कॅलेंडर

गुगल आणि जीमेलच्या सेवेशी आपण एव्हाना चांगले रूळलो आहोत. जीमेलमध्ये युनिकोडचे मराठी फाँट वापरून मराठी ईमेल पाठवता येते याचे प्रयोगही आपण बहुतेकांनी केलेले आहेत. आपण जेव्हा आपलं जीमेल अकाऊंट उघडतो तेव्हा त्या अकाऊंटच्या पोटात इतरही अनेक मोफत सेवा साठलेल्या आहेत याची कल्पना असूनही आपण त्यांच्या वाटेला फारसे गेलेलो नसतो. जीमेल अकाऊंट उघडून आपल्याला आलेल्या ईमेल पाहून झाल्या, किंवा फार तर पाठवायच्या ईमेल पाठवून झाल्या की आपण लॉगआऊट करून बाहेर पडतो. गुगलच्या सेवांपैकी फक्त जीमेल वापरणे आणि इतरांकडे फारसे न पाहणे म्हणजे आपल्या टीव्हीवर फक्त एकच चॅनेल बारा महिने पहात राहण्यासारखं आहे. आपल्या टीव्हीवर इतरही वेगवेगळ्या प्रकारचे चांगले-बरे-सोसो वगैरे वर्गीकरणात जाऊ शकणारे शेकडो चॅनेल्स असतात. ते न पहाता फक्त एकच चॅनेल पाहण्यात ज्या प्रकारचा तोटा आहे तोच तोटा आपण गुगलच्या अन्य सेवांचा लाभ न घेण्यात आहे.
गुगलच्या अनेक सेवांपैकी गुगल कॅलेंडर ह्या मोफत सेवेबद्दल मला आज खास करून बोलायचं आहे. ज्या मंडळींनी हे कॅलेंडर आजपर्यंत वापरलच नाही त्यांनी हा लेख वाचून ते वापरणं सुरू केलं तर एका कायम व उत्तम सुविधेचा अनुभव त्यांना येईल. इतर अनेक सेवांतून मी गुगल कॅलेंडर निवडलं याचं कारण हे कॅलेंडर आणि आपला मोबाईल फोन यांची अतिशय उपयुक्त सांगड आपल्याला घालता येते. उदाहरणार्थ पहा. रामरावांना डॉक्टरांनी त्यांचं दुपारचं आणि रात्रीचं जेवण वेळेवर घेण्याचा सल्ला दिला आहे. प्रकृतीला महत्व असल्याने रामरावांनीही दुपारी ठीक एक वाजता आणि रात्री ठीक आठ वाजता जेवायचच असा निश्चय केला आहे. रामराव तसे दिवसभर कामात गढलेले असतात. व्हिजिटर्स, मिटींग्ज, पत्रलेखन, ऑफिसच्या कामाचं वाचन यात पहिल्या दिवशी दुपारचे दोन कधी वाजले हे रामरावांना कळलच नाही. एक तास उशीर झाल्याने रामराव मनातल्या मनात चरफडले. कुणीतरी आपल्याला ठीक एक वाजता आठवण करायला हवी, आपण निदान मोबाईलवर अलार्म तरी लावायला हवा असं त्यांना वाटलं. पण पुढल्या काही दिवसांतही वेगवेगळ्या तर्‍हा होत राहिल्या. कधी ते अलार्म लावायलाच विसरायचे, कधी अलार्म लावलेल्या वेळी मोबाईल सायलेंट मोडवर असल्याने अलार्म कधी होऊन गेला हे कळायचं नाही. पुढे रामरावांची ती समस्या सुटली गुगल कॅलेंडरमुळे. रामरावांना ठीक बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी लंच घेण्याची आठवण करणारा एक एस.एम.एस. गुगल कंपनीतर्फे मिळू लागला. दररोज न चुकता त्या ठरलेल्या वेळेला तो एस.एम. एस. येणार याची रामरावांना सवयच झाली. रामराव एव्हढे बेशिस्त की केवळ एका एस.एम.एस. ला ते दाद देईनात. तो एस.एम.एस. यायचा. ते तो पहायचे. पुन्हा जेवण वेळेवर घेण्याचं विसरून जायचे. यावर त्यांनी रिरिमाईंडरचा उपाय शोधला. त्यानुसार त्यांना पहिला एस.एम.एस. बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी, दुसरा ठीक एक वाजता आणि तिसरा एक वाजून तीन मिनिटांनी मिळू लागला. हा उपाय मात्र बराचसा लागू पडला. तीन तीन वेळा त्यांच्या मोबाईलवर एस.एम.एस. आल्याने ते वेळेवर जेऊ लागले. ते तिन्ही एस.एम.एस. आता त्यांनी तीन महिन्यांसाठी कायम लावून ठेवून दिले आहेत. दररोज अलार्म लावण्याची कटकटही आता त्यांना नाही.
रामरावांनी हे आठवण करून देणारे एस.एम.एस. लावले ते गुगल कॅलेंडरवर. दिवसभरात ते असेच चहाच्या वेळेचे, ऑफिसमधून बाहेर पडण्याचे, एवढेच कशाला कुणाच्या वाढदिवसाचे, कुठल्या ठरलेल्या कार्यक्रमाचे, भेटीगाठींचे एस.एम.एस. वर्षभरासाठी लावून ठेवत असतात. हे एस.एम.एस. देखील ते तीन तीन वेळा रिरिमाईंडर पद्धतीने लावत असतात. त्यामुळे त्यांचा मोबाईल आता स्वस्थ नसतो. सारखा तो काही ना काही गोष्टींची आठवण करून देतच असतो. रामराव त्याप्रमाणे आपलं आयुष्य शिस्तबद्ध राखण्यात यशस्वीही होत असतात. आज तरी गुगल कॅलेंडरवर ही सेवा मोफत आहे. पुढेही ती मोफतच राहील असा विश्वास अनेकांना वाटतो आहे. रामरावांचं हे उदाहरण ऐकल्यावर काहींना प्रश्न पडेल की हे एस.एम.एस. रिमाईंडर भारतीय मोबाईल फोन्सवर लावता येतात का? ते आल्याबद्दल काही चार्ज आपल्याला द्यावा लागतो का? ह्या दोन प्रश्नांची उत्तरे प्रथम देतो आणि नंतर त्याच्या तंत्राकडे वळतो. पहिली गोष्ट म्हणजे गुगल कॅलेंडरची ही सेवा मोफत आहे. म्हणजे ह्या सेवेबद्दल गुगल कोणताही उघड वा हिडन चार्ज लावत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मोबाईल कंपन्याही येणार्‍या एस.एम.एस. साठी कोणताही चार्ज लावत नाही. म्हणजेच आपल्याला गुगल कॅलेंडरवरून कितीही एस.एम.एस. आले तरी आपल्या खिशाला कसलीही चाट पडत नाही.
गुगल कॅलेंडरवरून आठवणींचे मोठे मोठे एस.एम.एस. पाठवणं शक्य असतं. म्हणजे उदाहरणार्थ, समजा २१ नोव्हेंबर २००८ रोजी तुमच्या अमुक तमुक मित्राचे लग्न पुण्यात आहे. तुम्ही आज सप्टेंबर २००८ मध्ये ( किंवा अगदी वर्ष दोन वर्ष अगोदर सुद्धा) तो एस.एम.एस. प्रोग्राम करू शकता. त्या एस.एम.एस. मध्ये त्या लग्नाचा तपशील, वधू-वरांची नावे, लग्नस्थळाचा पत्ता, मित्राचा व लग्नस्थळाचा दूरध्वनी क्रमांक, मुहुर्ताची वेळ असं सारं काही सप्टेंबरमध्ये टाकून ठेवलत आणि तो एस.एम.एस. तुम्हाला २० नोव्हेंबर २००८ रोजी सकाळी ९ वाजता मिळावा असं गुगल कॅलेंडरमध्ये प्रोग्राम करून ठेवलत की तुम्ही सगळं विसरायला मोकळे. बरं, हे सारं करणं अगदी सोपं. आपल्या संगणकावर जीमेल पहात असताना आपल्या कीबोर्डचा वापर करून काय हवा तो आणि हवा तेव्हढा तपशील टाईप करून ठेवायचा. मोबाईलवर अलार्म लावायचा तर आपण किती तपशील की ईन करू शकणार याला मर्यादा असते. शिवाय मोबाईलची बटणं दाबून तो सारा तपशील टाकत बसणं किती जिकीरीचं असेल याचा विचार तुम्हीच करा. त्यापुढे गुगल कॅलेंडरची ही एस.एम.एस. रिमाईंडर्स खूपच सोपी आणि सुलभ वाटतात.
कॅलेंडर म्हंटलं की आपल्याला अपुरी जागा, तो तारखेचा इंचभर चौकोन असं काहीतरी डोळ्यासमोर येतं. गुगल कॅलेंडरचं तसं नाही. तुम्ही आफिसचं कॅलेंडर वेगळं, व्यक्तीगत कॅलेंडर वेगळं, आणखीही इतर काही खात्यांची वा प्रकल्पांची कॅलेंडर्स वेगवेगळी ठेवू शकता. ही वेगवेगळी कॅलेंडर्स वेगवेगळीही पाहू शकता, किंवा हवी तर सगळी एकदमही पाहता येतात. हा मुद्दा थोडा अधिक स्पष्ट करून सांगतो. गुगल वेगवेगळ्या कॅलेंडरसाठी वेगवेगळा रंग तुम्हाला देते. समजा ऑफिस कॅलेंडरचा रंग हिरवा असेल आणि व्यक्तीगत कॅलेंडरचा रंग लाल असेल तर हिरवं आणि लाल कॅलेंडर वेगवेगळं पाहता येणं शक्य असतं. पण समजा एका विशिष्ट तारखेला एकूणच काय स्थिती आहे हे पहायचं असेल तर तेही पहाता येतं. उदाहरण समजा १ ऑक्टोबर २००८ चं घ्या. ह्या दिवशी कोणत्या वेळी ऑफिसच्या कामाची आणि आपल्या व्यक्तीगत कार्यक्रमांची काय स्थिती आहे हे एकदम पाहता येतं. १ ऑक्टोबर २००८ ह्या दिवशी हिरव्या रंगातील आणि लाल रंगातील अपॉइंटमेंटस वा रिमाईंडर्स एकदम दिसत असल्याने नियोजन करणं अगदी सोपं असतं. ह्या सार्‍या गोष्टी एस.एम.एस. रिमाईंडर्सनी युक्त असल्यास आपण संगणकाच्या समोर नसलो तरी कोणतीही गोष्ट विसरणं शक्य नसतं.
गुगल कॅलेंडरचा पुढला महत्वाचा भाग म्हणजे तुमच्या मोबाईल फोनवर इंटरनेट चालू करून तुमच्या गुगल कॅलेंडरमध्ये तुम्ही भर घालू शकता वा त्यात बदल करू शकता. गुगल कॅलेंडरमध्ये एस.एम.एस. ची सुविधा मिळविण्यासाठी तुम्हाला विशिष्ट सेटींग (आजकाल सेटींग म्हंटलं की लोकांना सरकारी चहापाणी वगैरे वाटतं, इथे ते सेटींग नव्हे) करावं लागतं. त्यासाठी जीमेलच्या स्क्रीनवर सर्वांत वर डावीकडे असलेल्या Calendar ह्या शब्दावर क्लीक करून गुगल कॅलेंडर उघडा. मग सर्वांत वर उजवीकडे Settings ह्या शब्दावर क्लीक करा. तुम्हाला तीन प्रकारची कॅलेंडर सेटींग्ज दिसतील. त्यातील Mobile Setup वर क्लीक करा. ज्या मोबाईल फोनवर तुम्हाला एस.एम.एस. हवे असतील तो मोबाईल नंबर गुगल व्हेरीफाय करते. त्यासाठी तो मोबाईल नंबर टाईप करा. त्यानंतर Send verification code वर क्लीक करा. क्लीक केल्यानंतर काही क्षणातच गुगल तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक एस.एम.एस. पाठवेल. त्या एस.एम.एस. मध्ये एक कोड दिलेला असेल. तो कोड Settings मध्ये टाईप करायचा व नंतर Finish Setup वर क्लीक करायचं. एवढं केलत की तुमचा मोफत एस.एम.एस. मिळण्याचा मार्ग खुला झाला. आता तुमच्या कॅलेंडरमध्ये विशिष्ट तारखेला तुम्ही जे टाईप कराल त्याचा एस.एम.एस. मिळण्यासाठी Option मध्ये Reminder च्या खाली Email,Pop up आणि SMS हे जे तीन पर्याय आहेत त्यातील SMS हा पर्याय निवडा. शेवटी तळाशी असलेल्या Save ह्या बटणावर क्लीक करायला विसरू नका.
तुम्हाला तुमचे हवे तेवढे रिमाईंडर अशा प्रकारे लावता येतील. गुगल कॅलेंडरमधील ही एक महत्वाची सुविधा झाली. पण ही सुविधा म्हणजे गुगल कॅलेंडर नावाच्या मालगाडीचा एक डब्बा झाला. इतर डबे हेही अशाच प्रकारच्या महत्वाच्या सुविधा आहेत. त्यांचा वापर करून पाहिलात तर एक प्रकारचा खजिनाच हातात आल्याचा आभास तुम्हाला होईल. तो अनुभव मी घेतला आहे. तुम्हीही तो घेऊ शकता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा