२१ फेब्रु, २०११

'क्रोमा' तुझा रंग कसा?

गणेश चतुर्थी, ३ सप्टेंबर २००८ रोजी गुगल कंपनीने आपला 'क्रोम' नावाचा नवा कोरा वेब ब्राऊझर अचानक आणि अनपेक्षितपणे बाजारात आणला. सध्या क्रोम हा बीटा आवृत्तीत आहे. ' जन्मानंतर पोराचं बारसं झालय, पण अजून पाळण्यातले पाय नीटपणे दिसायलाही लागलेले नाहीत' अशा अर्भकावस्थेत गुगलचा आजचा क्रोम ब्राऊझर आहे. क्रोमच्या स्पर्धेत मुख्यत्वे इंटरनेट एक्स्प्लोअरर, फायरफॉक्स आणि ऑपेरा हे तीन गेली कित्येक वर्षे कुस्तीचे फड गाजवणारे व पट्टीचे म्हणावे असे पैलवान आहेत. क्रोम नावाचं कुक्कुलं बाळ विरूद्ध इंटरनेट एक्स्प्लोअरर, फायरफॉक्स व ऑपेरा ह्या सामन्यात कोण जिंकणार, कोण किती तुल्यबळ आहे वगैरे चर्चा एव्हाना जगभर सुरूही झाली आहे. एवढच नव्हे तर क्रोम चा पोर्टेबल अवतार आपल्या पेन ड्राईव्हसाठी एव्हाना तयारही झाला आहे. जन्माला आलेल्या बाळाच्या दंडाची बेडकी किती फुगतेय हे पाहण्यासाठी आज जगभरचे हजारो तज्ज्ञ अक्षरशः लाखो तास आपापल्या संगणकासमोर बसून क्रोमची चांचणी घेण्यात गुंग झाले आहेत.
क्रोम हा गुगल ह्या खाजगी कंपनीचा ब्राऊझर असला तरी तो 'ओपन सोर्स' प्रकारचा (म्हणजे 'फायरफॉक्स' सारखा खुला व सार्वजनिक म्हणता येईल असा) ब्राऊझर आहे. तुमच्या आमच्यासाठी मोफत डाऊनलोडींगसाठी आज तो सहजपणे http://www.google.com/chrome येथे उपलब्ध आहे. गुगलच्या होमपेजवरही त्याची लिंक आहे. आपल्यापैकी शेकडोंनी गेल्या आठवड्यात क्रोम डाऊनलोड केलाही असेल, आणि वापरूनही पाहिला असेल. ज्यांनी तो केला नसेल त्यांनी काही नाही तरी एक गंमत म्हणून तो वापरून पहायला हवा. मात्र एक लक्षात घ्या की क्रोम हा आज फक्त विंडोज (एक्सपी व विस्टा) सिस्टम्सवरच चालेल. मॅक आणि लिनक्स साठी क्रोम अजून गर्भावस्थेत आहे. म्हणजे, मॅक व लिनक्ससाठीचा क्रोम अजून जन्माला आलेलाच नाही.
गुगल कंपनीने सर्च इंजिनपासून ते गुगल अर्थपर्यंत अनेक उत्पादने व सेवा आजपर्यंत उपलब्ध केल्या आहेत. त्यात आता त्यांना ह्या क्रोम ब्राऊझरची भर का घालावीशी वाटली याचं स्पष्टीकरण गुगलने स्वतःच अधिकृतपणे केलं आहे. त्यात गुगलवाले म्हणतात, " आम्ही ब्राऊझरमध्ये काम करण्यात आमचा जास्तीत जास्त वेळ व्यतित करीत असतो… लोक आज वेबवर ज्या गोष्टी (व कामे) करतात त्यांची कल्पनाही पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा वेब (इंटरनेट) सुरू झालं त्यावेळी कुणी केली नव्हती. आमच्या लक्षात आलं की ज्या वेब ब्राऊझरमध्ये आपण जास्तीत जास्त वेळ घालवतो त्याबद्दल अगदी मुलभूत विचार गंभीरपणे करण्याची गरज आहे. साधी वाचण्याची पानं ह्या स्वरूपात वेब सुरू झालं आणि आज ते अगदी आधुनिक अशा इंटरॅक्टीव्ह वेब अॅप्लीकेशन पर्यंत येऊन पोहोचलं आहे…" गुगलचं म्हणणं थोडक्यात असं की वेबचं जग सुरू झालं तेव्हा त्या सुरूवातीला अनुसरून असे ब्राऊझर तयार झाले. यथावकाश त्यात सुधारणा केल्या गेल्या. पण त्याचा मुलभूत गाभा हा जुनाच राहिला. त्या पार्श्वभूमीवर क्रोम हा नव्या जगाचा, नव्या मनूचा नवा दमदार अवतार आहे. त्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा आहे.
एखाद्या बंगल्याचा खुला व्हरांडा असावा तशी वेब ब्राऊझरची संगणकातली स्थिती असते. बंगल्याच्या व्हरांड्यात जसं बाहेरचं कोणीही येऊ शकतं. बसू शकतं. पोरं बाळं येऊन पकडापकडी खेळून जात असतात. तसंच, ब्राऊझरमध्ये जगभरच्या वेबसाईटस व त्यांचेशी संबंधित अप्लीकेशन्स वा लहानमोठी सॉफ्टवेअर येतात, सक्रिय होतात आणि निघून जातात. ह्याच प्रक्रियेत सुरक्षेची जोखीम असते. आजही अनेक स्पायवेअर्स, ट्रोजन्स वगैरे विघातक गँगस्टर्स आणि खतरनाक गुंड ब्राऊझर नावाच्या व्हरांड्यात वेष बदलून येतात, आणि हळूच आपल्या संगणकाच्या बंगल्यात कधी शिरतात हे आपलं आपल्यालाही कळत नाही. ब्राऊझर हा मूळात व्हरांडाच असल्याने इंटरनेट एक्स्प्लोअरर असो की फायरफॉक्स, आणि ऑपेरा असो की आणखी एखादा दुसरा ब्राऊझर असो सुरक्षेचा प्रश्न हा असतोच. व्हरांड्यात जमणारे सगळेच काही गुंड वा गँगस्टर नसतात. काही जण खरोखरीच सज्जन, विद्वान, ऋषी-मुनी असतात. ते बंगल्याला आणि व्हरांड्याला उपयुक्तही असतात. पण काही गुंड-पुंड हे सज्जनाच्या चेहेर्‍याने वा ऋषी-मुनींच्या वेषात व्हरांड्यात येतात. तेव्हा व्हरांड्याची सुरक्षा व्यवस्था उत्तम असणं गरजेचं असतं. आज मायक्रोसॉफ्टच्या इंटरनेट एक्स्प्लोअररचा आठवा अवतार उपलब्ध आहे. म्हणजे पुर्वीच्या सात अवतारांचा अनुभव इंटरनेट एक्स्प्लोअररच्या गाठीला आहे. जगातल्या शंभरातले सत्त्याण्णव लोक आजही इंटरनेट एक्स्प्लोअरर उघडून इंटरनेटवर मुशाफिरी करीत असतात. मायक्रोसॉफ्ट सारखी यंत्रणा, अनुभव मागे असतानाही आजही इंटरनेट एक्स्प्लोअरर (चा व्हरांडा) सुरक्षित नाही. तोच प्रकार कमी-अधिक फरकाने फायरफॉक्स व ऑपेराचाही आहे. थोडक्यात, वर्षो नु वर्षे जे ब्राऊझर्स विकसित होत आले आहेत, त्यांनीही अद्यापि इष्ट अशी विकासाची पातळी गाठलेली नाही. असं जर आहे, तर मग क्रोम नावाच्या त्या कुक्कुल्या बाळाचं काय? असा प्रश्न आहे. पण कृष्ण हे जसे देवकीचे बाळ होते, तसे क्रोम हे गुगलचे बाळ आहे. त्यामुळेच क्रोमभोवती एक वेगळे वलय आहे.
क्रोमचा विचार दोन पातळ्यांवर आपण करायला हवा. एक म्हणजे तुम्ही आम्ही युजर म्हणून क्रोममध्ये असे काय आहे की आपण तो वापरण्याचा विचार करावा? आज आपल्यापैकी बहुतेक जण एक तर इंटरनेट एक्स्प्लोअरर किंवा फायरफॉक्स हे ब्राऊझर वापरत आहेत. हे आपण महिने नु महिने करीत आलो आहोत. एकाएकी एका रात्री गुगलने नवा ब्राऊझर काढला म्हणून आपला नेहमीचा ब्राऊझर सोडून आपण आंधळेपणाने क्रोम वापरायला सुरूवात करायची का? पहिल्या पातळीवरचे हे दोन प्रश्न खूपच महत्वाचे आहेत. दुसरी पातळी आहे ती सुरक्षेची. हा भाग बराचसा तांत्रिक आहे. त्यात सहसा आपण डोकं घालत नाही. कारण आपली भूमिका इंटरनेट सर्फर इतकीच सरळ साधी असते. फार फार तर आपण ह्या बाबतीत अनुभवी वा तज्ज्ञांचा सल्ला अंगिकारत असतो. जरी आपल्याला सुरक्षेच्या बाबतीत खूप काही गम्य नसलं तरी क्रोमची परिस्थिती त्या बाबतीत कशी आहे? तज्ज्ञ मंडळी त्याबाबत काय म्हणताहेत? हे मुद्दे तुमच्या आमच्यासाठी महत्वाचे आहेत.
क्रोम मध्ये असं काही खास वा जास्त आहे का की कुणी सध्याचा ब्राऊझर सोडून क्रोम वापरायला लागावं. वेग व इंटरफेस (व्हरांड्याची मांडणी) ह्या बाबतीत क्रोममध्ये काही वैशिष्ट्ये आहेत एवढं नक्की. वेगाच्या बाबतीतल्या विश्वासार्ह चांचण्या अजून मोठ्या प्रमाणावर आलेल्या नसल्याने क्रोम त्या बाबतीत नेमका किती मागे वा पुढे आहे हे सांगणं थोडं जल्दबाजीचं होईल. पण एक मात्र नक्की की क्रोम हा कच्चा खिलाडू मात्र अजिबात नाही. जन्माला आल्या आल्या हनुमानाने सूर्यावर उ़डी घेतली अशी कथा आहे. क्रोमनेही आल्या आल्या इंटरनेट एक्स्प्लोअरर व ऑपेराच्या मार्केंट शेअरच्या दिशेने झेप घेतल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. फायरफॉक्सचे युजर्स हे जगात एखादा भला मोठा खंड असावा एवढ्या मोठ्या संख्येत आहेत. तिथेही चलबिचल आहे. क्रोम आज बीटा आवृ्‌त्तीत आहे. एवढ्यात त्याच्याकडे वळण्याचं कारण नाही. आगे आगे देखते है, होता है क्या असा पवित्रा बहुतेकांनी आज घेतला आहे. क्रोम चा इंटरफेस वैशिष्ट्यपूर्ण म्हणावा लागेल. मूळात गुगलचे होम पेज जसे स्वच्छ, सुटसुटीत व शुभ्र पांढरे आहे, तसाच क्रोम आहे. गडबड-गचडी तिथे अजिबात नाही. FILE, EDIT, VIEW, TOOLS वगैरे तोच तो आणि तोच तो प्रकारचा मेनू त्यात नाही. प्रथमदर्शनी आवडेल असा क्रोमचा इंटरफेस आहे. अक्षरे, चित्रे, फोटो त्यात व्यवस्थित दिसतात. वेगात इतरांच्या मानाने फार मोठी तफावत नाही (निदान पिछाडी तरी नक्कीच जाणवत नाही). गुगलचं म्हणणं असं आहे की त्यांनी सुरक्षेची फार मोठी काळजी क्रोमच्या बाबतीत घेतली आहे. एकाच वेळी ब्राऊझरमध्ये अनेक साईटस अनेक टॅब्जमध्ये उघडलेल्या असताना एखादी साईट वाईट प्रकारची असल्यास संपूर्ण ब्राऊझरच मान टाकून बंद होतो, हा अनुभव तुम्हा आम्हा सर्वांना कधी ना कधी आलेला आहे. गुगल म्हणते की हा अनुभव क्रोममध्ये येणार नाही (किंवा खूपच कमी येईल) कारण प्रत्येक टॅब हा क्रोममध्ये एक सॅन्डबॉक्स (गुगलनेच हा Sandbox शब्द वापरलाय) आहे. एक कोसळल्यास दुसरा कोसळणार नाही. खेरीज जावास्क्रीप्टच्या हाताळणीसाठी V2 हे नवे इंजिन क्रोममध्ये गुगलने वापरले असल्याने त्यावर आधारित अप्लीकेशन्स क्रोममध्ये इतरांपेक्षा फास्ट चालतील असा गुगलचा दावा आहे.
क्रोम तयार करताना गुगलने मोझीला फायरफॉक्स व अॅपलच्या सफारी ह्या दोन ब्राऊजर्समधील काही तंत्रे वापरली आहेत याची कबुली जाहीरपणे दिली आहे. खेरीज जे काही आहे ते ओपन सोर्स म्हणजे खुले आहे. खुले असल्याने तुम्हाला त्यात काही बदल करणे, अथवा क्रोमसाठी इतर उपयुक्त असे प्लगिन्स वा टूल्स बनवणे शक्य आहे. फायरफॉक्ससाठी अशी शेकडो प्लगिन्स व टूल्स बनून त्यांच्या कित्येक सुधारित आवृत्त्या आज उपलब्ध आहेत. क्रोमच्या बाबतीतही अशी शेकडो प्लगिन्स व टूल्स उद्या बनणार यात शंका नाही. क्रोमचा आजचा रंग आणि उद्याचा रंग यात झपाट्याने प्रवास होणार आहे. क्रोमचा उद्याचा म्हणजे भविष्यातला रंग नेमका कसा असेल याचा अंदाज करणं फार अवघड आहे. एक मात्र नक्की की मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट एक्स्प्लोअरर आणि गुगलचा क्रोम यांच्यात येत्या वर्षभरात एक जबरदस्त फ्री स्टाईल कुस्ती रंगणार आहे. ही कुस्ती आपण त्या दोन्ही ब्राऊझर्समध्ये पाहू शकू. देखने में क्या हर्ज है?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा