२१ फेब्रु, २०११

इंटरनेटच्या भविष्यकाळाची चाचपणी

इंटरनेटला चाळीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दलचे लेख गेल्या दोन महिन्यांतील वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमध्ये वाचायला मिळाले. त्या निमित्ताने गेल्या चाळीस वर्षांवर एक दृष्टीक्षेप टाकला गेला. त्या चाळीस वर्षांमध्ये १९९९ आणि २००० ही वर्षेही आहेत. ह्या वर्षांमध्ये इंटरनेट जगताचा प्रचंड बोलबाला झाला. १९९९ नंतर संगणकी जगताचे घड्याळ ९९ नंतरचे पुढचे दोन आकडे शुन्य शुन्य होऊन १९०० होणार काय, आणि इयर २के च्या समस्येने जगात काय काय अघटित घडणार याची चर्चा झाली. १ जानेवारी २००० नंतर त्या ताणतणावातून हळूहळू जग मुक्त झालं. त्यालाही आता ९ वर्षे झाली. पुढे सन २००० मध्ये डॉट कॉम चा बुडबुडा फुटला आणि जगातल्या अनेक डॉट कॉम कंपन्यांना आपला गाशा त्या काळात गुंडाळावा लागला होता. तेव्हा इंटरनेटचं आता पुढे काय होणार अशीही भितीयुक्त चर्चा ऐकू येत असे.
१९९९ साली जे झालं ते होऊन गेलं. २००९ मध्ये जे चाललय ते आपल्याला दिसतय. ह्याच क्रमाने पुढे जाऊन २०१५ ते २०१९ ह्या दरम्यान संगणकीय आणि इंटरनेटचं जग कसं असेल याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. मूळात (आणि मुख्यतः) ज्या अमेरिकेतून इंटरनेटचं तंत्र विकसित होत गेलं तेथे तर ही उत्सुकता अधिकच असणार हे ओघानच आलं. भविष्यकाळातील इंटरनेट ह्या विषयाचा अतिशय खोलवर विचार करणारा एक अहवाल अमेरिकेतील एलॉन विद्यापीठ आणि प्यु इंटरनेट ही संशोधन संस्था ह्या दोघांनी संयुक्तपणे तयार केला आहे. येत्या १५० वर्षांत इंटरनेट कोणकोणते अवतार धारण करेल याचे अतिशय शास्त्रशुद्ध अंदाज ह्या अहवालात मांडण्यात आले आहेत. एलॉन विद्यापीठ आणि प्यु इंटरनेट ह्या दोन्ही संस्था असा अहवाल तयार करण्यासाठी अत्यंत सक्षम आहेत. इंटरनेट ह्या विषयाच्या सर्व अंगांच्या तज्ज्ञांचा ताफा ह्या दोघांकडेही आहे. अशा मोठ्या अभ्यास प्रकल्पांसाठी जी आर्थिक ताकद लागते तीही त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच त्यांचा हा अहवाल महत्वाचा मानला जातो.
ह्या अभ्यास प्रकल्पाने २००० साली कामास सुरूवात केली. फ्युचर ऑफ इंटरनेट हे त्यांच्या प्रकल्पाचं नाव होतं. ह्या प्रकल्पाचा पहिला सर्व्हे हा २००४ ते २०१४ ह्या काळाबद्दल होता. ह्या दहा वर्षांच्या काळात इंटरनेटचं नेमकं काय होईल यासंबंधी त्यांनी जगातल्या तमाम संशोधक व तज्ज्ञांची मते मागवली होती. एकूण १३०० जणांनी आपली मते ह्या प्रकल्पाकडे पाठवली. २००४ ते २०१४ ह्या दशकात इंटरनेट, आपली कामाची जागा (वर्क प्लेस), कौटुंबिक जीवन, शिक्षण आणि अशाच आणखी काही विषयांवर नेमका कोणता परिणाम करेल ह्या प्रश्नाचं उत्तर त्या १३०० तज्ज्ञांनी दिलं होतं. ह्या आणि अशा प्रकारच्या सातत्याच्या अभ्यासातून आता ह्या प्रकल्पाने काही पुस्तकेही प्रकाशित केली आहेत. ते काम आजही अखंड चालू आहे. येत्या १५० वर्षांत इंटरनेटचं काय होणार हा प्रश्न फार मोठा आहे. १५० वर्षांचा काळ हा तर कल्पनातीत आहे. ज्यांना इंटरनेटच्या येत्या १५० वर्षांबद्दल जाणून घ्यायचं आहे त्यांनी http://www.elon.edu/predictions/ ह्या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी. येत्या १५० वर्षांत काय होईल याची झलक ह्या साईटने एका २१ पानी सचित्र पुस्तिकेत दिली आहे. ही पुस्तिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असून ती http://www.elon.edu/e-web/predictions/forward150years.pdf ह्या पत्त्यावर वाचता येईल किंवा डाऊनलोड करता येईल. प्यु इंटरनेटची माहिती www.pewinternet.org ह्या वेबसाईटवर वाचता येईल.
२०१० ते २०१९ ह्या येत्या दहा वर्षांच्या काळात इंटरनेटचं नेमकं काय होईल असं ह्या प्रकल्पाला वाटतं? कोणती भाकितं त्यांनी वर्तवली आहेत? ह्या प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी त्या २१ पानी पुस्तिकेवर नुसती नजर टाकली तरी आपण अचंबित होतो. खरंच असं होईल, हो असं शक्य आहे? की ह्या नुसत्याच कल्पना आहेत? अशी आश्चर्यमिश्रित प्रतिक्रिया आपल्या तोंडून बाहेर पडते. त्यातल्या काही भाकितांकडे ह्या लेखात कटाक्ष टाकू. मूळातच ही २१ पानी पुस्तिका वाचण्यासारखी आहे याचा उल्लेख येथे पुन्हा करावासा वाटतो.
२०१० हे वर्ष सुधारित इंटरनेटचं असेल हे पहिलं भाकित त्यांनी केलं आहे. पुढल्या पिढीचं इंटरनेट हे प्रचंड संख्येने जगभरचे लोक वापरणार आहेत. त्यात फार मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ तंत्राचा वापर असणार आहे. त्यासाठी आजचं इंटरनेट तंत्र सुधारण्याची गरज आहे. म्हणूनच त्या कामासाठी अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशनने फार मोठी आर्थिक तरतूद आज केली आहे. Global Environment for Networking Investigations (GENI) जेनी असं ह्या प्रकल्पाचं नाव आहे. केवळ संगणकच नव्हे तर मोबाईल फोनसारख्या साधनावरील इंटरनेटही ह्या नव्या तंत्राने सुधारेल याकडे लक्ष दिलं जाणार आहे. पूर्वीच्या तंत्राची जागा नवं तंत्र घेताना त्यात सुरक्षिततेचा चोख विचार जेनी करीत आहे. GPS/RFID अर्थात ग्लोबल पोझीशनिंग सिस्टम व रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटीफिकेशन डिटेक्टर्सचे तंत्र अमुलाग्र सुधारणार आहे. काही व्यक्ती व प्राणी हे नेमके कुठे आहेत हे एका क्षणात त्यामुळे जाणता येणार आहे.
२०११ मध्ये अमेरिकेत एक नवा सुपर काँप्युटर जन्म घेत आहे. तो एका सेकंदाला 1,000,000,000,000,000,000,000,000 एवढी ऑपरेशन्स करू शकेल. ह्या मापाला एक पेटाफ्लॉप असं म्हणतात. जपानचं तंत्र मंत्रालय २०११ मध्ये १० पेटाफ्लॉप क्षमतेचा संगणक तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. ही क्षमता मानवी मेंदूएवढी आहे. ह्याच काळात, मानवी मेंदूच्या क्षमतेच्या पलिकडे लवकरच संगणक जाईल असं अनेक तज्ज्ञांच मत आहे.
२०१२ मध्ये आपण खातो त्या अन्नपदार्थांच्या बाबतीत संगणक क्रांती करेल. गाई म्हशींसारख्या प्राण्यांना किंवा झाडे व पिकांना विशिष्ट इंजिक्शन्स देऊन त्यातील माणसाला अॅलर्जी ठरू शकणारे घटक थांबवता येतील. ज्या वस्तू खायच्या त्यांतच औषधांचे अंश तयार होतील अशा प्रकारे फळे, भाज्या वगैरे बनू शकतील. २०१० ते २०१४ ह्या काळात काय काय होऊ शकेल याची एक भली मोठी यादी एलॉन विद्यापीठ व प्यु इंटरनेटच्या अहवालात आहे. त्यापैकी ह्या काही शक्यता पहाः
  • माणसाच्या अंगातले कपडे त्याच्या शरीराचे तपमान जाणतील व त्याप्रमाणे रूममधील वातानुकुलित यंत्रणा तपमानाचे नियमन करेल.
  • रूममधील माणसाच्या मूडनुसार तेथील प्रकाश कमी वा जास्त होईल.
  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए आय) च्या सहाय्याने फुटबॉल व सॉकरच्या कृत्रिम टीम्स तयार होतील. त्यांच्यातील सामने हे टीव्हीवर प्रचंड लोकप्रिय होतील.
  • अंगावरचे टॅटुज हे आज मुक्या चित्रांच्या स्वरूपात असतात. ते चालते बोलते म्हणजे व्हिडिओवर आधारित असतील.
  • बहुसंख्य घरांमध्ये वायरलेस नेटवर्क असेल.
  • टीव्हीवर मॅच पाहताना दर्शकाला मैदानातील हवा तो कोपरा बटणाने फिरवून पाहता येईल.
  • १०० जीबीचे पेन ड्राईव्हज सर्रास वापरात असतील.
  • स्फोटके शोधण्याच्या कामात बॅक्टेरिया (सुक्ष्म जंतू) चा उपयोग होऊ लागेल.
  • संगणकाचा मॉनिटर एखाद्या कागदाएवढा बारीक असेल. तो गुंडाळून कुठेही नेता येणे शक्य होईल. अशा कागदवजा मॉनिटरचा वापर वृत्तपत्रासारखा होईल. केव्हाही हा कागद उघडला तर त्यावर ताज्या बातम्या कुठेही बसून वाचता येतील. ई पेपर व ई इंक ची संकल्पना साकार होऊ लागेल.
२०१५ ते २०१९ ह्या पुढल्या पाच वर्षांत तर चमत्कार वाटाव्या अशा गोष्टी साध्य होऊ लागतील. त्या नेमक्या कोणत्या हे यथावकाश एका स्वतंत्र लेखात पाहू. एक लक्षात घ्यायला हवं की हा अहवाल विश्वासार्ह संस्थांनी तयार केलेला आहे. तो जाहीरपणे इंटरनेटवर प्रकाशितही केला आहे. त्याप्रमाणेच नेमकं घडेल की आणखी काही वेगळं चित्र आपल्याला २०१० ते २०१४ ह्या काळात अनुभवायला मिळेल हे सांगणं अवघड आहे. पण हे सारं येत्या पाच वर्षांतच आपल्याला पहायला मिळेल. घोडं मैदान खरंच फार लांब नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा