२१ फेब्रु, २०११

मराठी विकीपेडियाचं दुर्लक्षित जग

इंटरनेटवर विकीपेडिया नावाचा एक ज्ञानकोश सर्वांसाठी मोफत खुला आहे. www.wikipedia.org ह्या साईटवर गेलात की तुम्हाला इंग्रजी विकीपेडियाचा ज्ञानखजिना मोफत खुला होतो. इंग्रजी धरून जगातल्या एकूण २५५ भाषांमध्ये आज हा विकीपेडिया उपलब्ध आहे. ह्या २५५ भाषांमध्ये इंग्रजी जशी आहे तशी आपली मायबोली मराठी पण आहे. इंग्रजीमध्ये आज पुस्तक रूपाने उपलब्ध असणारा एनसायक्लोपेडिया ब्रिटानिका, किंवा मुख्यत्वे सीडीवरचा मायक्रोसॉफ्टचा एनकार्टा एनसायक्लोपडिया वगैरे हजारो पानांचे ज्ञानकोश आपण पाहिले आहेत किंवा ऐकले आहेत. मराठीतही ज्ञानकोशकार श्री.व्यं. केतकरांचे ज्ञानकोश खंड, ग.रं भिडे यांचे व्यावहारिक ज्ञानकोशांचे खंड, पं. महादेवशास्त्री जोशी यांचे भारतीय संस्कृती कोश, आणि महाराष्ट्रात सर्वांना परिचित असलेला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा विश्वकोश असे लहान-मोठे ज्ञानकोश प्रकाशित झाले. इंग्रजीतल्या ब्रिटानिका किंवा एनकार्टा सारख्या ज्ञानकोशाची सुधारित (म्हणजे अद्ययावत ह्या अर्थाने) आवृत्ती पुस्तकरूपाने व/वा सीडी-डीव्हीडीच्या स्वरूपात दरवर्षी प्रकाशित होते. मात्र, मराठीत अद्ययावत स्वरूपात ग्रंथ वा सीडी-डीव्हीडी स्वरूपात नियमित प्रकाशित होणारा एकही ज्ञानकोश आज अस्तित्वात नाही.
ह्या पार्श्वभूमीवर मराठीत अद्ययावत स्वरूपात उपलब्ध होणारा ज्ञानकोश एकच, तो म्हणजे इंटरनेटवरचा मराठी विकीपेडिया. हा मराठी विकीपेडिया ज्ञानकोशाच्या स्वरूपात इंटरनेटवर उपलब्ध असला तरी तो परिपूर्ण मात्र नाही. मराठी विकिपेडिया व इंग्रजी विकीपेडिया यांच्यातला फरक डोळे दिपवणारा आहे. इंग्रजीत जो विकीपेडिया इंटरनेटवर उपलब्ध आहे त्यात १ मे २००८ रोजी २,३३,५४,८८० (अक्षरी- दोन कोटी तेहतीस लाख चोपन्न हजार आठशे ऐंशी फक्त) नोंदी (Articles) उपलब्ध होत्या. ह्याच तारखेस, मराठी विकीपेडियामध्ये १७,१०० (सतरा हजार एकशे फक्त) नोंदी (Articles) होत्या. जगातले ७० लाखांहून अधिक लोक (सदस्य) आज इंग्रजी विकीपेडियाचा वापर करतात. मराठीत त्या तुलनेत फक्त २०९४ लोक विकीपेडियाचे मेंबर युजर्स आहेत. केवळ ७ जण मराठी विकीपेडियाचे व्यवस्थापक (Admins) आहेत. इंग्रजीत व्यवस्थापकांचा हाच आकडा १५३८ आहे. इंग्रजीत ७ लाखांहून अधिक चित्रे/छायाचित्रे/आकृत्या/नकाशे नोंदींबरोबर पहायला मिळतात. मराठी विकीपेडियाचा हाच आकडा १,१९६ आहे.
इंग्रजीच्या मानाने मराठी विकीपेडिया हा इंटरनेटवरचा मराठी ज्ञानकोश खूपच मागे असला तरी इतर भारतीय भाषांतले विकीपेडियाही मराठीच्याच वळणाने प्रवास करताना दिसतात. तेलगू विकीपेडिया आज भारतीय भाषांमध्ये सर्वांत आघाडीवर आहे. त्यात ३९,९०८ नोंदी (Articles) आहेत. त्या खालोखाल बंगाली विकीपेडियामध्ये १७,३२९, हिंदी विकीपेडियात १८,२६०, तामिळमध्ये १३,६५९, उर्दूमध्ये ७५५३, मल्याळीमध्ये ६१४०, कानडीमध्ये ५४५२, संस्कृतमध्ये ३८८२, भोजपुरीमध्ये २४०९, गुजरातीमध्ये ५६७, उडिया ५४३, काश्मीरी ३७५, सिंधी ३१०, पंजाबी २९५, असामी १८० अशी इतर भारतीय भाषांमधील विकीपेडियांची अवस्था आहे.
जगातील अन्य भाषांमध्ये विकीपेडिया कशा प्रकारे विकसित होतोय हे पाहणंही उदबोधक ठरेल. इंग्रजीच्या खालोखाल दुसरा क्रमांक लागतो तो जर्मन भाषेचा. जर्मन विकीपेडियामध्ये ७,४३,४७७ नोंदी (Articles) आहेत. फ्रेंच ६,५२,६४७, जपानी४,८७,५५७, इटालियन ४,४६,८०९, डच ४,३४,११६, स्पॅनिश ३,५६,७३२, रशियन २,६७,३८१, चिनी १,७४,७२६.
ह्या संदर्भात सर्व २५५ भाषांची तपशीलवार आकडेवारी ज्यांना पहायची आहे त्यांनी http://meta.wikimedia.org/wiki/List_of_Wikipedias ह्या इंटरनेट लिंकवर जाऊन अवश्य पहावं.
विकीपेडियाचं स्वरूप 
लोकशाही सरकारची व्याख्या करताना नेहमी of the people, for the people, by the people अशी केली जाते. विकीपेडियाची व्याख्याही त्याच धर्तीवर करता येईल. विकीपेडिया हा सर्वांचा, सर्वांसाठी असलेला, सर्वांनी मिळून तयार केलेला खुला ज्ञानकोश आहे. विकीपेडिया हा कोणा एका व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या मालकीचा नाही. तो सर्वांचा आहे. त्यासाठी कोणीही लिखाण करू शकतो. उपलब्ध असलेले लेख जगातील कोणालाही संपादित करता येतात. उपलब्ध लेखातील माहिती चुकीची वाटली तर कोणीही ती सुधारू शकतो. नसलेली माहिती त्यात टाकू शकतो. चुकीची माहिती काढूनही टाकू शकतो. हा अधिकार जगातील प्रत्येकाला आणि अक्षरशः कोणालाही आहे. अशा परिस्थितीत विकीपेडियातील माहिती अचूक कशी काय असू शकेल? कोणी चेष्टा-मस्करी करण्यासाठी, किंवा मुद्दाम एखाद्याची बदनामी करण्यासाठी हेतुतः चुकीची माहिती त्यात टाकू शकणार नाही का? वगैरे प्रकारचे प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविक आहे.
विकीपेडियाचं हे खुलं आणि अनिर्बंध स्वरूप हे एकीकडे त्याचं बलस्थान आहे, आणि त्याच वेळी त्याचं दोषस्थानही आहे. जग हे चांगल्या माणसांमुळे चालत असतं असं म्हणतात. विकीपेडियाही असाच चांगल्या प्रवृत्तीच्या माणसांमुळे आज चालतो आहे ही वस्तुस्थिती आहे. महात्मा गांधीच्या वरचा विकीपेडियातील लेख समजा एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या माणसाने संपादित केला आणि त्यात महात्माजींची बदनामी करणारा मजकूर टाकला तर काय होईल? तो तसा मजकूर टाकू शकेल का? उत्तर आहे, होय, तो तसा मजकूर टाकू शकेल. पण मग जगाला तो बदनामीकारक मजकूर विकीपेडियामध्ये वाचायला मिळेल का? तर त्याचं उत्तर आहे, तशी शक्यता फार कमी आहे. याचं कारण जे बदल वा संपादन विकीपेडियातील लेखांमध्ये होत असतं त्यावर विकीपेडियाच्या व्यवस्थापकांचं (Admins) चं बारीक लक्ष असतं. ह्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येकाचं त्यावर लक्ष असणंही अपेक्षित असतं. जर एखाद्याच्या लक्षात तो बदनामीकारक मजकूर आला तर लगेचच तो काढून टाकण्याचं काम ती व्यक्ती करू शकते. वाईट प्रवृत्ती विरूद्ध सतप्रवृत्ती असा लढा विकीपेडियाच्या व्यासपीठावर होणार हे विकीपेडियाने गृहित धरलेलं आहे. नेमक्या ह्याच पायावर आजचा विकीपेडिया उभा आहे.
मूळात विकीपेडियामधला wiki कुठला हा प्रश्न अनेकांसमोर उभा असेल. Wiki हा हवाईयन शब्द आहे. त्याचा अर्थ- त्वरेने म्हणजे इंग्रजीत quick. १९९५ साली वार्ड कनिंगहॅम ह्या अमेरिकन सॉफ्टवेअर कंन्सल्टंटने प्रथम wiki तंत्र वापरले. कनिंगहॅम अँड कनिंगहॅम नावाची त्याची कन्सल्टंसी देणारी व्यावसायिक संस्था होती. आपल्या संस्थेत त्याने wikiwikiweb नावाचे सॉफ्टवेअर तयार केले आणि आपल्या कंपनीच्या वेबसाईटवर ठेवले. हे सॉफ्टवेअर वापरल्याने त्याच्या वेबसाईटवर इतर प्रोग्रामर्स येऊ शकत असत, आणि त्यांच्या काही नव्या कल्पना असतील तर त्यांना त्या तेथे ठेवता येत असतं. विकीपेडियाची कल्पना राबवणारे ते पहिले सॉफ्टवेअर. आपली कल्पना वेबसाईटवर पटकन (quick) ठेवण्याची सोय म्हणून त्या सॉफ्टवेअरचे नाव कनिंगहॅमने wikiwikiweb असे ठेवले. कनिंगहॅम एकदा होनोलूलू विमानतळावर गेला असताना विमानतळावरील एका सेविकेने त्याला त्याचे सामान पटापट एअरपोर्ट बसमध्ये ठेवण्यास सांगितले. तेव्हा तिने विकी विकी हे शब्द उच्चारले होते. कनिंगहॅमच्या ते विकी विकी हे शब्द लक्षात राहिले होते. आपण जो विकी हा शब्द वापरून एक सॉफ्टवेअर केले आहे त्यातून उद्या wikipedia.org नावाचा ज्ञानसूर्य उगवणार आहे याची कल्पना कनिंगहॅमला तेव्हा नव्हती. १५ जून २००१ रोजी विकीपेडियाचा शुभारंभ झाला आणि आज २००८ साली wikipedia.org ही वेबसाईट जगातील दहाव्या क्रमांकाची वेबसाईट आहे.
विकीपेडिया आणि मराठी 
इंग्रजी विकीपेडिया केवळ साडेसात वर्षांमध्ये ३० लाख लेखांचा विक्रम करू शकला. साधारणतः २००५ च्या सुमारास मराठी विकीपेडियाच्या आरंभाला खरी चालना मिळाली. आज मराठी विकीपेडियाला मराठी लेखन करणारांची नितांत गरज आहे. त्यासाठी www.mr.wikipedia.org ह्या मराठी विकीपेडियाच्या वेबसाईटवर वारंवार आवाहन करण्यांत येत आहे. मराठी लेख संपादनाची स्पर्धाही विकीपेडियावर वारंवार जाहीर होत असते. त्यात भाग घेण्यासाठी कळकळीने आवाहन केले जाते. संगणकावर मराठी अक्षरं, शब्द, जोडशब्द कसे आणावे याचेही मार्गदर्शन तेथे आहे. सध्या सर्वत्र मराठीची चर्चा चालू आहे. त्या चर्चेत मराठी विकीपेडिया येणेही आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून (खरं तर संपूर्ण जगातूनच) मराठी विकीपेडियाचे फक्त २१०० सदस्य व्हावेत हे पटण्यासारखेच नाही. ह्या सदस्य संख्येत लक्षणीय वाढ झाल्यास मराठी विकीपेडियाचा विकास झपाट्याने म्हणा, बिगी बिगी म्हणा किंवा विकी विकी म्हणा होत जाईल.
विकीपेडियाच्या पाठोपाठ आता विक्शनरी म्हणजे विकीच्या माध्यमातून तयार होणारी डिक्शनरी, विकीबुक्स, विकीन्यूज, विकीव्हर्सिटी वगैरे उपक्रमही विकसित झाले आहेत. मराठीत ते आणून यशस्वी करण्याचा प्रयत्न आज काही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच मराठी मंडळी आज करीत आहेत. त्यांना साथ देणं हे सर्व मराठीजनांचं कर्तव्य आहे. लक्षात घ्या की डच भाषा बोलणारे जगात फक्त २ कोटी ४० लाख लोक आहेत. ह्या लोकांनी आपल्या डच भाषेच्या विकीपेडियावर एकूण ४,३४,११६ एवढे लेख लिहीले आहेत. मराठी भाषा बोलणारे जगात ९ कोटीहून अधिक लोक आहेत. म्हणजे आपण संख्येने डच भाषिकांच्या चौपट आहोत. पण आपण आजपर्यंत फक्त १७,००० लेखच मराठी विकीपेडियावर लिहू शकलो आहोत. कुठे २ कोटी ४० लाख आणि कुठे ९ कोटीचा आकडा? कुठे डचांचे ४ लाख ३४ हजार ११६ लेख आणि कुठे आपले फक्त १७,००० लेख? विकीपेडियाच्या बाबतीत मराठीचं काहीतरी चुकतय एवढं नक्की.
जागतिक पातळीवर तुमच्या भाषेतील विकीपेडिया हाही प्रगतीचा एक निकष मानला जाऊ शकतो. मराठीने इतर गोष्टींबरोबर विकीपेडियाकडेही लक्ष द्यायला हवे. कुणी ऐकतय का मी काय म्हणतोय ते?

२ टिप्पण्या:

  1. wiki या शब्दाची एक वेगळी व्युत्पत्ती एका मित्राने मागे कधीतरी सांगितली होती. wiki हे what I know is चं लघुरूप आहे, असं त्याचं म्हणणं होतं. याला विकिपिडियाच काय पण अन्यत्र कुठूनही काहीही आधार मिळाला नाही, हा भाग वेगळा. पण, तरीही मला ती व्युत्पत्ती आवडली. त्यात wiki ची भूमिका नीट स्पष्ट होते असं मला वाटतं. विकिपेडियावर मराठी नोंदी वाढायच्या असतील तर प्रत्येकानं आपणाला जे ठावे ते जगाते सांगावे, या भूमिकेतून काम करायला हवं.

    उत्तर द्याहटवा
  2. अभिजित, व्युत्पत्ती गंमतीदार आहे. बाकी मराठी विकीपेडियावरचा आपल्या मंडळींचा सहभाग वाढायला हवा यात शंका नाही. कॉमेंटसाठी धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा