२० फेब्रु, २०११

संगणकावरील मराठी आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र)


संगणकावरील मराठी आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र)

काही निवडक अभिप्राय


ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः

खालील अभिप्राय महाराष्ट्र सरकारच्या www.mahanews.gov.in ह्या संकेतस्थळावर खालील पत्त्यावर देखील वाचता येईल.

http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=H090AAtXQUNhpGou1m|ldjMHwr9pzG2kQFVhM1K1VZBgF9gJyMIEWQ==
युनिकोडचा मूलमंत्र

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०१०

महाराष्ट्राच्या उज्ज्वल संस्कृतीचा मान्यवरांनी करुन दिलेला परिचय. यात रविवारी खाद्यसंस्कृती, सोमवारी पद्म पुरस्कार शुभांगी मांडे, मंगळवारी लोककला डॉ.प्रकाश खांडगे, बुधवारी वाचावी अशी पुस्तके प्रकाश अकोलकर / नंदिनी आत्मसिध्द, गुरुवारी संतपरंपरा डॉ.यू.म.पठाण, शुक्रवारी सण-उत्सव ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर आणि शनिवारी गड-किल्ले प्रमोद मांडे यांचा अनमोल ठेवा.
संगणक आजच्या जगात अपरिहार्य बनला आहे. आज संगणकावरच बरेच काम केले जाते. लेखनाच्या क्षेत्रातही त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. भारतीय भाषांमधून संगणकावर लेखन करता येते आणि त्यातली सोय खूप महत्त्वाची आहे. पण संगणकासाठी वेगवेगळे फॉण्ट वापरले जात असल्याने विशिष्ट फॉण्ट संगणकावर नसल्यास मजकूर वाचता येत नाही. युनिकोडने ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण युनिकोडबद्दल नीट माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्याचा वापर मराठीच्या क्षेत्रात म्हणावा तेवढा होताना दिसत नाही. आधीपासून उपलब्ध असणाऱ्या फॉण्ट्सची सवय आणि सराव झाल्यामुळे युनिकोडकडे वळायला बरेचजण नाराज असतात. मात्र युनिकोडकडे दुर्लक्ष करणे आपल्याला परवडणारे नाही, कारण संगणकाच्या संदर्भात युनिकोड आता अपरिहार्य बनला आहे. युनिकोडमुळे आपण संगणकावर मराठीत सहजरीत्या काम करू शकतो आणि स्वतःच्या भाषेत आणि लिपीत थेट संगणकावर लिहू शकतो.
युनिकोड म्हणजे काय आणि त्याचे नेमके स्वरूप व महत्त्व काय आहे, याची माहिती अत्यंत सोप्या शब्दामध्ये सांगणारे ‘युनिकोड (तंत्र आणि मंत्र)’ हे माधव शिरवळकर यांचे पुस्तक युनिकोडची एक समग्र ओळख वाचकांसमोर घेऊन येते. नवी मुंबईतील ‘संगणक प्रकाशना’ने ते प्रसिद्ध केले आहे. संगणकासंबंधी सामान्य वाचकाला सुलभ भाषेत माहिती करून देणारे लेखन श्री. शिरवळकर वेळोवेळी करत आले आहेत. प्रस्तुत पुस्तकातही अगदी सोप्या शब्दांमध्ये त्यांनी युनिकोडची माहिती विशद केली आहे. संगणकावर मराठीतून काम करण्यासाठी, ईमेल किंवा अनेक सोशल नेटवर्किंग साईट्सवर मराठीचा वापर करून संवाद साधण्यासाठी अशा अनेक गोष्टींसाठी युनिकोड उपयुक्त आहे. म्हणूनच त्याबद्दल व्यवस्थित माहिती असणे आवश्यक बनते. यादृष्टीने सदर पुस्तक खूपच चांगले मार्गदर्शन करू शकेल.
अगदी संगणकाचा वापर नवखेपणाने करणाऱ्यालाही समजेल अशा पद्धतीने पुस्तकाची रचना लेखकाने केली आहे. युनिकोडपूर्व परिस्थिती, युनिकोडची पार्श्वभूमी, संगणक आणि इंटरनेटवर वापरल्या जाणाऱ्या अक्षरतंत्राचा तपशीलवार मागोवा अशा पद्धतीने युनिकोडपर्यंतची वाटचाल यात देण्यात आली आहे. इंग्रजीत फॉण्टचा प्रश्न उद्‍भवत नाही तीच स्थिती मराठी व इतर भारतीय भाषांमध्येही शक्य करण्यासाठी युनिकोडला पर्याय नाही, हे सांगतानाच युनिकोडमध्येही अजून सुधारणा करता येऊ शकतात हेही मांडले आहे. युनिकोडचा इतिहास व पार्श्वभूमी, अक्षरांना कोड देण्यामागची कारणमीमांसा, भारतीय भाषांसाठी युनिकोड वापराच्या संदर्भात करण्यात आलेले प्रयत्न आणि अशा प्रमाणित कोडची असलेली गरज याबद्दलचे लेखकाचे विवेचन पटण्यासारखे आहे. युनिकोडपुढे आजही चिनी-जपानी आणि कोरियन यासारख्या चित्रलिप्यांचे आव्हान खडे आहेच. पण भारतीय भाषा आणि त्यातही देवनागरी लिपी यासंदर्भातील त्रुटी भरून काढण्याचा प्रयत्न युनिकोडने केला आहे. मराठीतून लिहिताना सुरुवातीला ‘तऱ्हा’ या शब्दासाठी – हा असा डॅश वापरावा लागत होता, आता ऱ्हा नीटपणे लिहिता येतो. किंवा अॅ हे अक्षर लिहिता येत नव्हते, ते आता मराठी इंडिक इनपुटचा वापर करून लिहिता येते. अशा अनेक खास मराठी पद्धती युनिकोडमध्ये सामावून घेण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे, युनिकोडमधील लिहिलेला मजकूर कोणत्याही संगणकावर वाचता येणे शक्य आहे आणि युनिकोडला सरकारने मान्यता दिली असल्याने त्याच्या प्रसारार्थ तो आपल्या संगणकावर मोफत बसवता येतो. पण युनिकोड मोफत उपलब्ध आहे ही गोष्ट सर्वसामान्यांपर्यंत पोचलेली नाही.
युनिकोड संगणकावर कसा उतरवायचा, एक्सपीवर उतरवण्यासाठी काय करायचे, व्हिस्टासाठी काय करायचे इ. माहिती आकृत्यांसह पुस्तकात असल्याने, युनिकोड हवा असल्यास काय तरावे याचा वस्तुपाठच हे पुस्तक देऊ करते. प्रत्येक पायरी आणि तिचे चित्र पुस्तकात दिले असल्याने, कुठेही घोटाळा न होता युनिकोड बसवणे आणि तो वापरणे या गोष्टी सोप्या होऊन जातात. त्याशिवाय, फोनेटिक कीबोर्ड, इन्स्क्रिप्ट, मंगल फॉण्ट याबद्दलची माहितीही हे पुस्तक तपशिलात देते. गूगल आणि युनिकोड, मायक्रोसॉफ्ट आणि युनिकोड अशा प्रकरणांमधून या संकेतस्थळांवर युनिकोडचा वापर कसा करावा याची माहिती आहे. तसेच, जुन्या मराठी फॉण्ट्सचे रूपांतर करण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देणाऱ्या परिवर्तन या सॉफ्टवेअरबद्दलही एक स्वतंत्र प्रकरण पुस्तकात देण्यात आले आहे. युनिकोडचा भविष्यकाळ कसा असेल याबाबतचे विवेचनही लेखकाने केले आहे. रोमनमधून इंग्रजी अक्षरांच्या माध्यमातून मराठी लिहिण्यापेक्षा थेट देवनागरीतून मराठी लिहिणे नक्कीच आनंद देऊन जाणारे आहे आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषा जगवण्याचा तो एक उत्तम मार्ग आहे.
मराठी आणि युनिकोड या संदर्भात महाराष्ट्र सरकारने आजवर काहीसे दुर्लक्ष केले असेही लेखकाचे म्हणणे आहे. यापुढील सुवर्ण महोत्सवी वर्षात युनिकोड आणि मराठी यांच्या संदर्भात अधिक कृतिशील राहण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे ही स्वागतार्ह गोष्ट आहे. युनिकोडमधले दोष आणि त्रुटी याबद्दलही श्री. शिरवळकर यांनी लिहिले आहे. एकदोन विरामचिन्हे सोडता इतरांसाठी ‘शिफ्ट- आल्ट’ करून इंग्रजीत शिरावे लागते ही एक मोठीच त्रुटी आहे. अशा काही उणिवा दूर करण्याचे प्रयत्न यापुढे नक्कीच होतील अशी आशा आहे. तरीही, तोवर न थांबता, आज आहे त्या स्थितीतील युनिकोडचा स्वीकार केला तरी संगणकावर काम करणे किती सोपे व सुविधाजनक आहे हे असा वापर सुरू केल्याविना कळणार नाही.
माधव शिरवळकर यांनी भाषा आणि लिपी यांच्या संदर्भातही तांत्रिक माहितीही या पुस्तकात दिली आहे. या विषयात अधिक खोलात जाऊ इच्छिणाऱ्यांनाही हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल. तसेच संगणकाचा वापर नव्याने करू लागलेल्यांनाही या पुस्तकाची मदत मिळू शकेल.

- नंदिनी आत्मसिध्द


----------------------------------------------------------------------


प्रस्तुत वृत्त ईसकाळ मध्ये प्रकाशित झाले. ईसकाळ च्या खालील दुव्यावरही ते वाचता येईल.

http://72.78.249.126/esakal/20100626/4988200814448362507.htm


नवे मराठी मंत्रालय 'युनिकोड'कडे लक्ष केंद्रित करणार
सकाळ वृत्तसेवा
Saturday, June 26, 2010 AT 11:45 PM (IST)
मुंबई - महाराष्ट्र जागतिक 'युनिकोड कन्सोर्शियम'चे सदस्यत्व घेण्याविषयी आवश्‍यक ती पावले उचलील, असे आश्‍वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या अमेरिकाभेटीत मराठी संगणक व्यावसायिकांना दिले. मागील आठवड्यात मुख्यमंत्री अमेरिका दौऱ्यावर असताना लॉस एंजेलिस येथे अमेरिकेतील मराठी भाषकसंगणक व्यावसायिक व अभियंत्यांची त्यांनी भेट घेतली होती.
या भेटीत मराठी भाषेच्या संगणकीय विकासासाठी अमेरिकेतील मराठी संगणक व्यावसायिकांचे योगदान सदैव महाराष्ट्राला मिळत राहील, असे संगणकतज्ज्ञ वैभव पुराणिक आणि आशिष महाबळ यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तेथील मराठी संगणक व्यावसायिकांचे सर्व मुद्दे लक्षपूर्वक ऐकले. या वेळी माधव शिरवळकर यांचे "संगणकीय मराठी व युनिकोड तंत्र आणि मंत्र' हे पुस्तक अमेरिकन मराठी मंडळींच्या वतीने मुख्यमंत्र्यांना भेट देण्यात आले.

-------------------------------------------------------------

प्रस्तुत अभिप्राय खालील दुव्यावर देखील वाचता येईलःयुनिकोड : नवी लेखननीती

     या आधी एक पोस्ट लिहिली होती ज्यात 'वर्ड' आणि 'युनिकोड' एकमेकांना अनुकूल असल्याचा उल्लेख होता.
     संगणकावर मराठी लिहिण्यासाठी युनिकोड ही एक नवी पध्दत आहे. 'नवी' हा शब्द तसा चुकीचा आहे. पध्दत अस्तित्वात होतीच पण अनेकांना माहीत नव्हती. हळूहळू युनिकोडबद्दल लोकांमध्ये जागृती होत आहे कारण शासनस्तरावर या प्रणालीचा विचार झालेला आहे. तथापि, अजूनही अनेकजण 'फोनेटिक' प्रकारचा कीबोर्ड वापरुनच मराठी टायपिंगची झटापट करत असतात. 'युनिकोड' साठी निराळ्या प्रकारचा कीबोर्ड आवश्यक असतो. एकदा तो पाठ झाला की, काम फत्ते होते.  
     'युनिकोड' या विषयावर सर्वांगीण माहिती असेलेले एकही पुस्तक बाजारात नव्हते. ही कमतरता माधव शिरवळकर यांच्या पुस्तकांने पूर्ण केलेली आहे. पुस्तकाचे नावच 'युनिकोड-तंत्र आणि मंत्र ' आहे. 
     ज्यांना युनिकोड नावाची नवी लेखननीती समजून घ्यायची आहे अशांसाठी आणि जे आधीपासूनच संगणकावरील मराठी लेखनाचे शिलेदार आहेत त्यांच्यासाठीही हे पुस्तक खास आहे. 'मौलिक' हा शब्दही थिटा आहे. युनिकोडचा इतिहास आणि त्याचा सध्या विविध ठिकाणी होत असलेला वापर विस्तृतपणे विशद केलेला आहे. नमुन्यादाखल अनुक्रमणिकेतील काही प्रकरणांचा उल्लेख जरी केला तरी संगणकातील किड्यांचे डोळ चमकतील - भारतीय भाषा आणि युनिकोड, विंडोज आणि युनिकोड, गूगल आणि युनिकोड...!
    नवी मुंबईतील संगणक प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
    मराठी फॉंटच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग हे पुस्तक निःसंशयपणे दाखवू शकते.

-----------------------------------------------------------

1 टिप्पणी:

  1. युनिकोडच्याही पुढे जाऊन कलात्मक तंतू (फाँन्ट) मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावेत अशी अपेक्षा.. आणी लिहिलेले पुस्तक अतिशय सुंदर आहे. सोपी भाषा आणी शैली याच्या लोकप्रियतेचे गमक आहे असे मला वाटते. पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा..!!

    उत्तर द्याहटवा