२५ फेब्रु, २०११

माधव शिरवळकर यांची ध्वनीमुद्रित मुलाखत (पॉडकास्टींग)

महाराष्ट्र मंडळ, लॉस अँजेलिस, अमेरिका, यांनी घेतलेली मुलाखत खालील दुव्यावर ऐकता येईल. सदर मुलाखत ही पॉडकास्टींग प्रकारची म्हणजे ध्वनीमुद्रित आहे.
http://www.mmla.org/mmla/June2010

संगणक जगत वरील अभिप्राय -1

आजही हा अभिप्राय खालील दुव्यावर उपलब्ध आहेः
http://marathi.webdunia.com/newsworld/currentaffairs/blogscorner/0709/28/1070928004_1.htm

अथांग 'संगणक जगत'
- अभिनय कुलकर्णी

माधव शिरवळकर हे नाव मराठी वाचकाला विशेषतः तंत्रज्ञानविषयक वाचकाला नवे नाही. गेल्या अनेक वर्षांपासून विविध वर्तमानपत्रात त्यांचे लिखाण येते आहे. लोकसत्तात गाजलेल्या संगणक जगत या सदराचे लेखक ते हेच. याशिवाय समग्र राम गणेश गडकरी हे मराठीतील पहिले ई- बुकही त्यांनी प्रकाशित केले. त्यानंतर केशवसुत, लक्ष्मीबाई टिळकांचे आत्मचरित्र स्मृतिचित्रे यासह सुमारे पन्नास मराठी, इंग्रजी ई बुक्सची निर्मिती केली आहे.
तर अशा या शिरवळकरांचा ब्लॉग म्हणजे संगणकावर काम करणार्‍यांचा मार्गदर्शक आणि जालावर भटकंती करणार्‍यांसाठीचा पथदर्शक आहे. हे मार्गदर्शक आणि पथदर्शक वगैरे जड शब्द का वापरले असा प्रश्न तुम्हाला कदाचित पडला असेल. पण या ब्लॉगला तुम्ही भेट दिली तर याचा अनुभव तुम्हालाही आल्याशिवाय रहाणार नाही. हा ब्लॉग म्हणजे संगणकाविषयीचा एनसायक्लोपिडीया किंवा आन्सर.कॉम आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
संगणकविषयक कोणताही प्रश्न तुम्हाला पडलेला असो या ब्लॉगद्वारे शिरवळकरांना तो विचारल्यास तुम्हाला त्याचे उत्तर मिळेल. Tiff, JPG, GIF यांचा लॉंगफॉर्म म्हणजे काय पासून ते Blue Ray Disk म्हणजे नेमकं काय किंवा तुमच्या संगणकात येणारा प्रॉब्लेम असो किंवा एखाद्या संगणकीय जगतातील संज्ञेविषयी तुमच्या मनात दाटलेलं कुतूहल असो,अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे मिळू शकतात. या प्रश्नांची उत्तरे देऊनच शिरवळकर थांबत नाही तर उत्तरासंदर्भात अधिक माहिती देणार्‍या संकेतस्थळांचा दुवाही ते देतात. त्यामुळे तेथे जाऊनही आपल्याला ती माहिती मिळू शकते. शिवाय आगामी काळासाठी आपल्याकडे अशा संकेतस्थळांची बॅंकही तयार होते. माहिती शेअर करण्याचा हा त्यांचा दृष्टिकोन अतिशय चांगला आहे.
शिरवळकरांच्या ब्लॉगचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते जालावरचे अस्सल भटके आहेत. त्यांच्या या भटकंतीत त्यांना अनेक माहितीपूर्ण संकेतस्थळं सापडतात. आठवड्याची सात संकेतस्थळं म्हणून ते त्याची संक्षिप्त माहिती देतात. ते शिफारस करतात त्या संकेतस्थळांचे विषयही वैविध्यपूर्ण असतात. त्यामुळे आपल्या माहितीच्या कक्षाही चांगल्याच रूंदावरतात. उदाहरणेच सांगायची झाली तर व्होडका कसा बनवावा, त्याचा इतिहास, सॅंडविच शब्द कसा आला, त्याचा इतिहासा, वृत्तपत्रांचा इतिहास दर्शविणारी साईट,मोफत छायाचित्रे डाऊनलोड करण्याची सुविधा कुठे आहे, रूग्ण व त्याच्या नातेवाईकांना विविध चाचण्यांबद्दल माहिती कुठून मिळेल अशा अक्षरशः शेकडो संकेतस्थळांविषयीची माहिती त्यांनी दिली आहे. माहितीचा हा पूर उर धपापून टाकणारा आहे.
याशिवाय कुठे काय आहे आणि कुणासाठी ते उपयुक्त आहे याची शिफारसही ते करतात. त्यामुळे आपल्या आवडीच्या विषयांसंदर्भात किंवा आपल्याशी संबंधित विषयाचे संकेतस्थळ पाहता येते. त्याचे दुवेही ते देतात. अनेक संकेतस्थळांवर मोफत सॉफ्टवेअर असतात. त्याविषयीही ते माहिती पुरवतात. किंवा एखादी फॉंट पुरविणार्‍या संकेतस्थळाचीही ते शिफारस करतात. थोडक्यात जालावर भटकंती करताना कवडीही न खर्चता मोफत अनेक बाबी मिळतात तेही या ब्लॉगवर गेल्यानंतर कळते.
शिरवळकरांच्या ब्लॉगचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते संगणकविषयक अनेक युक्त्या आणि क्लृप्त्या सांगतात. रोजचे काम करताना त्या अतिशय उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ तुम्हाला ई मेलमधून मोठी फाईल पाठवायची आहे. पण सामान्यपणे ई मेलमधून फाईल पाठविण्याची क्षमता दहा एमबी असते. पण त्यापेक्षा मोठी फाईल पाठवायची तर काय करावे लागेल?शिरवळकरांच्या ब्लॉगवर त्याचे उत्तर आहे.
असा हा माहितीच्या कक्षा रूंदावणारा ब्लॉग. जालावर भटकंती करताना या ब्लॉगवर भेट दिल्यानंतर बाहेर पडताना नक्कीच समृद्ध झाल्याचा अनुभव येतो. त्यामुळे अस्सल नेटकर या ब्लॉगला टाळून पुढे जात नाहीत. मग शिरवळकरांना भेटताय ना?

२३ फेब्रु, २०११

डायरी आणि हिशोब

नव्या वर्षाची सुरूवात होताना नवं कॅलेंडर आणि नवी डायरी ह्या दोन वस्तू आपल्या भेटीला आलेल्या असतात. कॅलेंडर भिंतीवर कुठेतरी कायमचं लटकून जातं. पण, डायरी मात्र आपल्याला बर्‍यापैकी चिकटून राहते. कधी ती आपल्या पर्समध्ये किंवा बॅगेत, किंवा आपल्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये आपल्या एकट्याच्या विश्वासातली गोष्ट म्हणून साथ करू लागते. हळूहळू आपण त्यात काहीबाही लिहू लागतो. मग मात्र ती फारच व्यक्तीगत होऊन जाते. ती दुसर्‍याच्या हाती पडू नये अशी काळजी आपण आवर्जुन घेऊ लागतो. चुकून कधी ती जागेवर दिसली नाही किंवा इतरांच्या हातात क्वचित ती पडली तर आपलं बिनसतच. ही कागदाची डायरी हरवू शकते. दुसर्‍याच्या हातात पडू शकते. त्यामुळे ती जपावी लागते. ती जपण्यात आपल्या मेंदूच्या काही पेशी दिवस-रात्र बीझी राहतात.
हे झालं कागदाच्या डायरीबद्दल. आजकाल घरी आणि ऑफिसमध्ये संगणक जवळजवळ प्रत्येकाच्या टेबलावर असतो. संगणकावर ब्रॉडबॅंडचं इंटरनेट कनेक्शन हेही आता नेहमीचं होऊन गेलं आहे. संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातली डायरी ही कागदाच्या डायरीपेक्षा अधिक सुरक्षित असते. पासवर्ड शिवाय कोणीही ती उघडू शकत नाही. आणि पासवर्ड हा अर्थातच फक्त आपल्यालाच माहीत असतो. इंटरनेटवर अशी डायरी मोफत उपलब्ध आहे. त्यासाठी www.my-diary.org ह्या साईटवर जायला हवं. इंटरनेट साईटसवर मिळणारी सेवा ही तीन प्रकारची असते. आपल्याला एक तर त्यासाठी दमड्या मोजाव्या लागतात, किंवा साईटवरच्या जाहिरातींचा त्रास सहन करत ती सेवा घ्यावी लागते. My-diary.org वरील डायरीची सेवा घेण्यासाठी दमड्याही मोजाव्या लागत नाहीत आणि जाहिरातींची कटकटही तिथे नाही. ही साईट तिसर्‍या प्रकारची म्हणजे स्वेच्छेने येणार्‍या देणग्यांवर चालते. मात्र देणगी सक्तीची नाही. ती दिली नाहीत म्हणून तुम्हाला डायरी लिहीता येणार नाही अशी अट बिलकुल नाही.
My-diary.org चं वैशिष्ट्य म्हणजे ती अतिशय युजर-फ्रेंडली आहे. तिथे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही तुमचा ईमेल पत्ता फक्त द्या. तेवढं पुरे असतं. नाव, पत्ता, जन्मतारीख अमुक तमुक असं काहीही तिथे द्यावं लागत नाही. तुम्ही दिलेल्या ईमेल पत्त्यावर तुमच्या डायरीची अक्टीव्हेशन लिंक पाठवली जाते. त्या लिंकवर क्लीक करून आणि स्वतःचा पासवर्ड निवडून तुम्ही इंग्रजीत डायरी लिहायला प्रारंभ करू शकता. तुमच्याकडे मराठीचा युनिकोड फाँट असेल तर तुमची डायरी किंवा रोजनिशी तुम्ही मराठीतही लिहू शकता. मराठी युनिकोड फाँट तुमच्याकडे नसेल तर www.baraha.com वरून तो डाऊनलोड करून घ्या. Baraha वर तो मोफत उपलब्ध आहे. किंवा, तुमच्याकडे Windows XP वा त्यानंतरची विंडोज आवृत्ती असेल तर त्याबरोबर येणारा Mangal हा मराठी युनिकोड फाँटही तुम्हाला वापरता येईल. थोडक्यात काय, तर my-diary.org वर तुम्ही तुमची मराठी किंवा इंग्रजी रोजनिशी सहज आणि कुठेही लिहू शकता. यातला ‘कुठेही’ हा शब्द महत्वाचा आहे. जगात कुठेही तुम्ही गेलात तर इंटरनेटवर तुमची डायरी तुमच्या बरोबर नेहमीच असणार. कुठल्याही सायबरकॅफेत जाऊन तुम्ही ती केव्हाही उघडू शकता, त्यात लिहू शकता.
ह्या डायरीला ‘सर्च’ ची सोय आहे. समजा वर्षभरात तुम्ही शे दोनशे पाने लिहीलीत आणि त्यातला विशिष्ट संदर्भ तुम्हाला नेमका शोधायचा असेल तर तुम्ही तो ‘सर्च’ करू शकाल. मराठी युनिकोड फाँटही ‘सर्च’ ला अनुकूल आहेत. त्यामुळे केवळ इंग्रजीच नाही तर मराठीतही ‘सर्च’ इथे शक्य आहे. डायरीतलं एखादं पान तुम्हाला काढून टाकायचं असेल, किंवा बदलायचं असेल तर Delete आणि Edit ची सोयही my-diary.orgवर उपलब्ध आहे. अनेक सोयी इथे असल्या तरी my-diary.org वर स्पेलचेक ची सोय उपलब्ध नाही. डायरीत एखादा फोटो वा चित्र टाकायचं झालं तर त्याची सोय फक्त देणगीदारांसाठी उपलब्ध आहे. काहींनी केवळ अर्धा डॉलर (म्हणजे आपले जास्तीत जास्त २५ रूपये ) देणगी देऊन ही सोय पदरात पाडून घेतल्याचं देणगीदारांच्या यादीवरून आपल्याला दिसतं. ही देणगी क्रेडिट कार्ड वापरून देता येते. तुम्हाला डायरीत चित्रे वा फोटो टाकायचे नसतील तर देणगीचा प्रश्न अर्थातच उद्भवत नाही.
डायरीबरोबर हिशोब हा भागही आपल्या जीवनात दैनंदिन महत्वाचा आहे. त्यासाठी www.buxfer.com ही मोफत सेवा देणारी वेबसाईट तुमच्या मदतीला येईल. इथे तुम्हाला तुमचा रोजचा जमाखर्च ऑनलाईन लिहीता येईल. तुमचा जीमेल (गुगलमेल), याहूमेल, हॉटमेल यापैकी इमेल पत्ता असेल तर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करण्याचीही गरज नसते. तुमचा इमेल लॉगिन आणि पासवर्ड वापरून तुम्ही buxfer.com वर हिशेब लिहू शकता. तुमचं बॅंक अकाउंट, क्रेडिट कार्ड, रोजचा किरकोळ खर्च आणि जमा तुम्हाला इथे नोंदवता येते. बेरीज, वजाबाकी वगैरे गणितं अर्थातच buxfer करतो. त्यामुळे चुकण्याचा प्रश्न इथे नसतो. जमा आणि खर्च याचबरोबर उसने देणे-घेणे याची नोंद ठेवण्याचीही सोय इथे आहे. मित्रांबरोबर वा ग्रुपमध्ये असताना ‘शेअर्ड एक्सपेन्स’ किंवा खर्चातला आपला सहभाग देण्याचा प्रसंग विशेषतः कॉलेज तरूण-तरूणींना नेहमीचाच आहे. अशा ‘शेअर्ड एक्सपेन्स’ चा हिशेब ठेवण्यासाठीही खास व्यवस्था आहे. वेबसाईटस म्हंटलं की बहुधा त्या अमेरिकन वळणाच्या असतात आणि त्यामुळे तिथे हिशेब म्हंटलं की डॉलरची $ ही खूण आपल्याला पहावी लागते. आपल्याला Rs. ओळखीचे असतात आणि $ आपल्याला आपले वाटत नाहीत. पण buxfer ने याची काळजी घेतली आहे. आपले हिशोब रूपयांमध्ये ठेवण्याची सोय इथे आहे. आजकाल भारतातही अनेक बॅंका खातेदाराच्या व्यवहारांची मासिक स्टेटमेंटस इमेलने पाठवते किंवा इंटरनेटवर उपलब्ध करते. ही स्टेटमेंटस सामान्यतः .csv फाईलच्या स्वरूपात असतात. ह्या व्यतिरिक्त Microsoft Money किंवा Quicken च्या फाईल्स देणार्‍या बॅंकाही अनेक आहेत. आपली क्रेडिट कार्डची स्टेटमेंटसही ह्या फाईलच्या स्वरूपात मिळत असतात. ही संपूर्ण फाईल buxfer वर अपलोड करता येते. थोडक्यात काय, तर आपले स्वतःचे हिशोब अतिशय चोख पद्धतीने ठेवण्याची सेवा इथे उत्तम प्रकारे आणि मोफत उपलब्ध आहे.
वीज, गॅस, इंटरनेट कनेक्शन, सोसायटी मेंटेनन्स किंवा भाडे, विम्याचा हप्ता, कर्जाचा हप्ता अशा अनेक गोष्टी आपल्याला दरमहा लक्षात ठेवाव्या लागतात. घाईगडबडीत आपण विसरतो आणि मग दंड भरण्याची वेळ कधीकधी येते. Buxfer मध्ये यासाठी Reminder ची सोय आहे. आपण सांगू त्या दिवशी (तारखेस), त्यावेळी ती आठवण देणारे Reminder आपल्याला इमेलवर मिळते. अशी हवी तेवढी रिमाईंडर्स आपण वर्षभरासाठी सेट करून ठेवू शकतो.
Buxfer.com ही Buxfer Inc ह्या अमेरिकन कंपनीची वेबसाईट आहे हे खरं असलं तरी ही कंपनी शशांक पंडित आणि अश्विन भारंबे ह्या दोन ऐन विशीतल्या मराठी तरूणांनी तयार केली आहे हे ऐकल्यावर आपल्याला मनोमन समाधान वाटेल. शशांक आणि अश्विन हे दोघेही मुंबई आय.आय.टी. मधून बी.टेक (कॉंप्युटर्स) करून सध्या अमेरिकेतील कार्नेजी मेलन विद्यापीठात पीएच.डी. करण्यासाठी गेले आहेत. कार्नेजी मेलन विद्यापीठात असताना अश्विनच्या खोलीतील रेफ्रीजरेटरवर अनेक बिले वा ती देण्याची स्मरणपत्रे चिकटवलेली असतं. त्या बिलांची व्यवस्था लावण्यासाठी अश्विनने एक प्रोग्राम लिहीला. तो एवढा उपयुक्त होता की इतर मित्रांकडून त्याला मागणी येऊ लागली. प्रत्येकाला त्या प्रोग्रामची कॉपी देता देता अश्विन कंटाळून गेला. त्यातून मार्ग काढण्यासाठी मग त्याने आपला मित्र शशांक पंडित याच्या मदतीने एक वेबसाईट तयार केली. त्यात हा प्रोग्राम ऑनलाईन दिला गेला. त्यातूनच जन्माला आली Buxfer Inc ही कंपनी. Bucks आणि Transfer ह्या दोन इंग्रजी शब्दांतून Buxfer हे नाव जन्माला आले.
आज Buxfer.com बरेच लोकप्रिय होत आहे. Buxfer सारखीच सेवा देणारी www.wesabe.com नावाची वेबसाईट Buxfer च्या स्पर्धेत आहे. दोन्ही वेबसाईटसच्या तुलनेत Buxfer ची सोय वापरायला अधिक सोपी सरळ आहे. 2011 ची नवी नवलाई अजून ऐन जोमात आहे. त्या जोमात असतानाच दोन उपयुक्त सोयी आपल्याला ‘एंटर’ च्या माध्यमातून मिळाल्या आहेत. खरं तर फी घेऊन ऑनलाईन अकाऊंटींगची सुविधा देणार्‍या कंपन्या आणि वेबसाईटस अनेक आहेत. पण ही सुविधा मोफत आणि दर्जेदार पद्धतीने देणारी कंपनी आपल्या मराठी तरूणांची आहे हे ऐकल्यावर तुम्ही आम्ही आवर्जुन Buxfer वर जाऊन पाहणार यात मला शंका वाटत नाही

' ऑनलाईन प्रेमा ' तुझा रंग कसा ?

कविवर्य मंगेश पाडगावकरांचे प्रेमाबद्दलचे काव्यबद्ध शब्द माहीत नाहीत असा मराठी रसिक सापडणं अवघड. ' प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं ' ह्या शब्दांमध्ये पाडगावकरांनी विशुद्ध आणि प्रामाणिक प्रेम गृहित धरलं आहे. प्रेम हे इंटरनेटवरही सगळीकडे असंच ' सेम ' असतं असं गृहित धरून दिवस-रात्र माऊस पकडून बसलेली मुलं-मुली आपल्याला सायबर कॅफेत हमखास भेटतात. घरोघरी आलेल्या पीसीवर चिकटून असलेल्या तरूणाईचा माऊस कर्सर बहुधा ऑर्कुटसारख्या वेबसाईटवर बेभान होऊन भटकत असतो. ' ऑर्कुट ' सारख्या वेबसाईटवर किंवा इंटरनेटवर चॅट करता करता भेटलेला वा भेटलेली कुणीतरी साध्या टायपिंगयुक्त गप्पा मारता मारता एकाएकी आवडू लागते. ऑनलाईन गप्पा मारण्यासाठी ती पु्न्हा पुन्हा भेटावी असं कधी वाटू लागलं हे कळण्याच्या आत ऑनलाईन प्रेमाचा अंकुरही बरेचदा रूजू लागलेला असतो. ' भेट तुझी माझी स्मरते ' किंवा ' प्रथम तुज पाहता ' ह्या प्रकारातलं ते प्रेम नसतं. कारण समक्ष भेट कधी झालेलीच नसते आणि प्रथम सोडा, एकमेकांना त्यांनी प्रत्यक्ष कधी पाहिलेलंच नसतं. एकमेकांना पहावं असं जेव्हा फारच वाटू लागतं तेव्हा एकमेकांचे फोटो एकमेकांना ऑनलाईन पाठवले जातात, किंवा वेब कॅमेर्‍याच्या सहाय्याने एकमेकांचं दूरदर्शन त्यांनी इलेक्ट्रॉनिक चौकटीत स्वीकारलेलं असतं. ऑनलाईन प्रियकर आणि प्रेयसीचं प्रोफाईल हे साधारणतः इतपतच असतं.
प्रोफाईल ह्या शब्दात 'फाईल' आहे. संगणकाचं किंवा इंटरनेटचं जग हे इलेक्ट्रॉनिक फाईलच्या नियमाने चालत असतं. जोपर्यंत ही फाईल निर्मळ आहे तोपर्यंत समस्या नसते. संगणकाच्या आणि इंटरनेटच्या जगात आपली निर्मळ फाईल जपावी लागते. छुपे व्हायरस, वॉर्मस, स्पायवेअर, मालवेअर आणि आणखी कितीतरी प्रकारचे धोके असतात हे पावलोपावली ध्यानात घेणं क्रमप्राप्त असतं. जे फाईलचं तेच प्रोफाईलचं. जेव्हा दोन निर्मळ फाईल्सची किंवा प्रोफाईलची भेट होते तेव्हा समस्या येत नसते. पण जेव्हा दोनपैकी एक फाईल किंवा प्रोफाईल लबाडीने वा धोक्याने भरलेला असतो, तेव्हा त्यातून उद्‍भवणार्‍या समस्या जीवघेण्या असल्याचं आढळून येतं. ऑर्कुटवर प्रथम कुणीतरी कोणाचा फॅन होतो (किंवा होते) आणि नंतर तो फॅन ' फन अॅन्ड फ्रॉलिक ' करता करता ' फ्रेंड ' बनून त्याच्या वा तिच्या ऑनलाईन आयुष्याचा भाग बनून जातो. सायबर जगातला हा ' फन ' नावाचा शब्द मस्करीच्या अंगाने जात जात कुस्करीच्या परिणतीपर्यंत गेलेला अनेकदा दिसतो. ' ए मॅन, आय वॉज जस्ट कीडींग, आय वॉज नॉट सिरीयस ' असं म्हणून एखादा वा एखादी आपला मूळातच खोटा असलेला प्रोफाईल डिलीट करून मोकळा/ळी होऊन जाते. सायबर जगतात नाहीसं होण्यासाठी आपला गाव सोडून जावं लागत नाही. एकाच गावात एकाच संगणकावर राहून एकाच वेळी अनेक नावांनी, अनेक वयांनी, आणि एकाच वेळी स्त्री म्हणून व पुरूष म्हणूनही वावरता येतं. हे सारं ' फन ' म्हंटलं की झालं, इतकं सोपं असतं.
आजकाल ' ऑर्कुट 'ची चर्चा घराघरात आहे. ' ज्योत से ज्योत जगाते चलो ' एवढ्या सहजपणे भारतात ' ऑर्कुट ' पसरला आहे आणि आणखी पसरतो आहे. ' गुगल ' कंपनीची ही वेबसाईट. सोशल नेटवर्कींग साधणारी आणि जुने हरवलेले मित्र शोधून देणारी, किंवा नवे मित्र जोडण्यासाठी आवश्यक असलेला ऑनलाईन नुक्कड तयार देणारी 'ऑर्कुट ' ही वेबसाईट खरं तर एक वरदान आहे. कधीतरी शाळेत किंवा कॉलेजात असताना रोज भेटणार्‍या मित्र-मैत्रिणींना 'ऑर्कुट ' च्या माध्यमातून शोधणं सोपं आणि आनंददायकही असतं. एका वेगळ्या जिव्हाळ्याचा अंकूर त्या माध्यमातून रूजू शकतो हे अगदी खरं आहे. आपला एक मित्र लांब कुठेतरी गेलेला असतो. बरेचदा लांब म्हणजे तो साता समुद्रापार परदेशातही गेलेला वा स्थिरावलेला असतो. तिथे त्याचे नवे मित्र बनलेले असतात. तिथले त्याचे म्हणजे आपल्या मित्राचे मित्र ऑर्कुटच्या कट्ट्यावर आपलेही मित्र बनू लागलेले असतात. मित्रमंडळाचं असं सामाजिक मधाचं पोळं बनण्याची ही प्रक्रिया सर्वच अंगांनी तशी पोषकच आहे. पण समाज म्हंटलं की त्यात नकारात्मक तत्वंही आलीच. संगणक आला ही बाब सकारात्मक होती. पण त्याला लगेचच आव्हान मिळालं ते व्हायरसचं. इंटरनेटची संपर्क व्यवस्था अनेक अंगांनी खूपच सकारात्मक. पण त्याला आव्हान आलं ते वॉर्मस, स्पायवेअर, हॅकर्स वगैरेंकडून. ह्याच धर्तीवर सोशल नेटवर्कींगच्या साईटसना २००८ मध्ये नकारात्मक तत्वांकडून विविध प्रकारची आव्हानं येतील असा अंदाज आणि चर्चा आज जगभर ऐकू येते आहे.
थोडं मागे जाऊन पाहिलं तर 2011 येऊ घातलेल्या ह्या नकारात्मक किंवा घातक अशा आव्हानांचं स्वरूप नीट लक्षात येईल. ' ऑर्कुट ' ला नुकतीच सात वर्ष पूर्ण झाली. पण भारतात इंटरनेट नांदू लागलं त्याला आता पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. पूर्वी जगात 'ऑर्कुट ' नव्हतं. पण त्या काळातही काही ना काही घातक आव्हानं ही होतीच. ईमेल बरोबर येणाऱ्या फाईलला चिकटून येणारे व्हायरस हे त्या काळात मोठ्या प्रमाणावर आणि सर्रास होते. त्यांनी जगात धूमाकूळ घातला आणि अब्जावधींचे नुकसान केले. मग त्या संदर्भात जागरूकतेचा प्रचार होऊ लागला. अनोळखी ईमेल आली असेल आणि त्याला चिकटून एखादी अटॅच फाईल आली असेल तर ती स्कॅन करून घ्या. त्याशिवाय उघडू नका वगैरे सावधानतेचा सूर एवढा लागला की आता ते ईमेलला चिकटून येणारे व्हायरस कालबाह्य आहेत. व्हायरसचा एक प्रकार कालबाह्य झाला असला तरी जी प्रवृत्ती तसे व्हायरस तयार करत होती ती आजही कुठेना कुठे वावरतेच आहे. अनोळखी दिसणारी ईमेल तुम्ही उघडत नाही म्हंटल्यावर तुम्हाला ओळखीची अशी ईमेल तयार करण्याचा प्रयत्न ही प्रवृत्ती करणारच. तुमचे मित्र कोण, ते काय बोलतात, तुमचं त्यांचं नुकतच काय बोलणं झालं आहे हे कळण्यासाठी 'ऑर्कुट ' इतका चांगला माहितीचा स्त्रोत दुसरा कोणता असणार? आपण एक उदाहरण घेऊ. समजा पिंकी आणि अॅश ह्या ऑर्कुटवरच्या दोन मैत्रिणींच्या स्क्रॅपच्या माध्यमातून चाललेल्या ह्या गप्पा पहा ः
" अगं मी आज मामाकडे पुण्याला आलेय. इथे जाम थंडी आहे." - इति पिंकी.

" आयला (चालतं ऑर्कुटवर), स्वेटर नेलास की नाही ? कुठे राहतो तुझा मामा पुण्यात ?" - अॅशची चौकशी.

"अगं, तो डेक्कन जिमखान्यावर ती एक्स-वाय-झेड सोसायटी आहे नं तिथे राहतो. मस्त आहे ती सोसायटी"

"अगं बरी आठवण झाली. तुला पुण्यात ती म्युझिक सीडी मिळाली तर ट्राय कर नं. प्लीज"

"ओके, बघते, ट्राय करते, बसं?"

एवढा संवाद झाल्यावर दोन तासांनी पिंकीची एक ईमेल अॅशला मिळाली. त्याचा विषय होता Got your Music Cd.
हा विषय अॅशला माहीत असल्याने तिने ती ईमेल पिंकीचीच आहे असं समजून वाचायला घेतली. त्यात लिहीलं होतं की " त्या म्युझिक सीडीचे सगळे डिटेल्स अॅटॅच्ड फाईलमध्ये आहेत. ते बघ, आणि मला रिप्लाय कर. "
एवढा मजकूर पाहिल्यावर ती ईमेल पिंकीची नसेल असं वाटण्याचं काही कारणच नाही. अॅशने ती अॅटॅच्ड फाईल उघडली आणि नंतर एका व्हायरसने हैदोस घातला. अॅश बिथरली. पिंकीने व्हायरस कसा पाठवला. तोही एवढा डेडली!
सत्य परिस्थिती अशी होती की ती ईमेल मूळात पिंकीने पाठवलीच नव्हती. कुणीतरी पिंकी आणि अॅशचं 'ऑर्कुट' वरचं संभाषण पाहिलं होतं, आणि त्याचा संदर्भ देऊन अॅशला तो व्हायरस खोडसाळपणाने पाठवला होता. खरं तर पिंकी आणि अॅशचं संभाषण तसं अगदी साधच होतं. पण त्याचा कसा वापर केला जाऊ शकतो हे वर आलेल्या उदाहरणावरून आपल्या लक्षात आलं.
चार वर्षांपूर्वी ऑर्कुट नव्हतं, पण तेव्हा ICQ ( I seek you) नावाचा चॅट प्रोग्राम चांगला बहरला होता. तिथेही जुने मित्र भेटत होते, नवे मित्र मैत्रिणी होत होत्या, प्रेमाच्या आणाभाकाही घेतल्या जात होत्या, फोटोही पाठवले जात होते. सगळं जवळजवळ ऑर्कुटसारखंच होतं. त्या प्रेमामध्येही अनेकजण फसल्याची उदाहरणे होती. ICQ बरोबर इतरही चॅट प्रोग्राम्स होते. ईमेलची देवाणघेवाण होता होताही प्रीतीचे अंकूर फुटत होते. ते ' फुटणं ' दोन्ही प्रकारचं होतं. रूजणं ह्या अर्थीही होतं आणि फुटणं ह्या अर्थीही होतं. थोडक्यात, ज्याला पाहिलं नाही, ज्याच्या खरे-खोटेपणाची खात्री नाही त्याच्यात गूंतलात तर त्यातून फक्त गुंताच होणार हा धोका नीट लक्षात घ्या. हा मुद्दा लक्षात यावा यासाठी खालील लिंक वर जाऊन पहा ः
http://answers.yahoo.com/question/index?qid=20071129115049AACjiNo
ह्या पानावर ऑर्कुटवर फसलेल्या एका मुलीने विचारलं आहे -
I was duped by an unknown person in Orkut, whose photo was someone else. I need justice. what should be done? This person promised to marry me.where as the person is already married. I have spent lots of money.Please suggest what should be done.
कुणा तिसर्‍याच माणसाचा फोटो दाखवून त्या मुलीला लग्नाचं वचन देण्यात आलं होतं. प्रत्यक्षात तो माणूस दुसराच होता, आणि विवाहितही होता. पण दरम्यानच्या काळात त्या मुलीने त्या माणसावर भरपूर पैसा खर्च केला होता. हा पैसा अर्थातच तिने भेटवस्तू पाठवणे वगैरे मार्गाने खर्च केला असणार हे उघड आहे. पुरती फसल्यानंतर आता ह्या मुलीला काय करायचं हा प्रश्न पडला आहे. हे घडू नये यासाठी काही दक्षता पाळण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, आपला स्वतःचा आणि दुसर्‍या कुणाचाही मोबाईल नंबर वा फोन नंबर ऑर्कुटवर गप्पा मारताना स्क्रॅपवर देऊ नका. कामाशी संबंधित गप्पा स्क्रॅपच्या माध्यमातून मारू नका. मित्रांची संख्या वाढवण्याच्या मोहात कोणालाही मित्र म्हणून मान्यता देऊन टाकू नका. विशेषतः मुलींनी आपले फोटो देणं टाळलेलच बरं. फोटो गॅलरीतही आपले वा इतरांचे फोटो देताना ते शक्यतो क्लोजअप न देता लाँग शॉटचे देणंच अधिक बरं. ऑर्कुट काय किंवा तत्सम अन्य साईट काय, त्याचे व्यसन लागणार नाही, बेभान होऊन तास न तास त्यामागे जाणार नाहीत याची काळजी सर्वांनीच आवर्जुन घ्यावी. इंटरनेटवर भेटणारं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असेल, आणि त्याचं आणि तुमचं सेमच असेल याची कसलीच खात्री कुणीच देऊ शकत नाही. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे  चा संदेश हाच की ऑनलाईन प्रेमा, तुझा रंग कसा असेल हे परमेश्वरही सांगू शकणार नाही. थोडं सबुरीनेच घेतलेलं बरं. …

फोटोच्या दुनियेतील अलिबाबाची गुहा

एक दिवस असा येईल की तुमच्या संगणकावर एकही प्रोग्राम नसेल. असेल ती फक्त एकच सोय, इंटरनेट पाहण्याची. आता तुम्ही ह्यावर विचाराल की मला दररोज वर्ड प्रोग्राम वापरावा लागतो. त्यात मी दररोज काही ना काही पत्रे टाईप करतो. वर्ड प्रोग्रामच जर माझ्या संगणकावर नसेल तर माझे हे पत्रव्यवहाराचे काम मी करणार कसं? दुसरं कोणी म्हणेल मला दररोज एखादं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तयार करावं लागतं. ते कसं होणार. कोणी म्हणेल मी एक्सेलमध्ये दररोज हिशोबाचं काम फीड करतो, त्याचं काय होणार? त्यावरचं उत्तर आहे की हे सारे प्रोग्राम्स तुम्हाला इंटरनेटवर लाईव्ह वापरता येतील. म्हणजे तुम्ही एखाद्या विशिष्ट साईटवर जाल. तिकडे वर्डच्या लिंकवर क्लीक कराल. काही क्षणात मग तुमच्यासमोर वर्डप्रोसेसरचं कोरं पान येईल. तुम्ही त्या पानावर पत्र टाईप करायचं. हवा तो टाईप किंवा फाँट वापरायचा. बोल्ड, ईटालिक जसा हवा तसा त्याला आकार द्यायचा. परिच्छेद पाडायचे. सारं झालं की स्पेलींग चेकसुद्धा करायचं. मग तो तुमच्या अकाउंटमध्ये असलेल्या जागेत सेव्ह सुद्धा करून ठेवायचा. ही सारी सोय जर इंटरनेट देत असेल तर मग हवी कशाला तुमच्या संगणकात हार्ड डिस्क, आणि हवेत कशाला ते ऑफिस नामक अगडबंब प्रोग्राम्स? पॉवरपॉईंट असो की एक्सेल असो, तुम्ही क्लीक केलत की तो प्रोग्राम इंटरनेटच्या त्या एखाद्या साईटमध्येच उघडणार. एक्सेल असेल तर कोर्‍या कागदाच्या ऐवजी तुमची वर्कशीट समोर येऊन उघडणार. त्यात हवे ते आकडे फीड करा. मग फाईल सेव्ह करा.
आता ह्यावर कोणी म्हणेल की हे कसं शक्य आहे. किंवा हे शक्य होण्यासाठी अजून खूप वर्ष जावी लागतील. तर मंडळी, तसं नाहीये. ह्या सोयी अगदी आज म्हणाल तर आजच, नव्हे आता ह्या क्षणालाही उपलब्ध आहेत. आपलं गुगल सर्च इंजिन आहे त्याच्या वरच्या बाजूस डावीकडे पहा. खाली दिलेल्या वेगवेगळ्या लिंक्स दिसतात.
Web Images News Orkut Groups Gmail more ▼
त्यातली शेवटची लिंक आहे more . ह्या more वर क्लीक केलंत तर आणखी काही लिंक उघडतात. त्यातल्या Documents ह्या लिंकवर क्लीक करा. त्यानंतर येणार्‍या पानावर Take a tour of Google Docs नावाची लिंक तुम्हाला दिसेल. त्यावर क्लीक करा. आता पहा Create documents, spreadsheets and presentations online असं ठळठळीत शीर्षक मधोमध दिसेल. तुमच्याकडे गुगलची ईमेल किंवा गुगल अकाऊंट असेल तर Start Now ह्या खालील बाजूस दिसणार्‍या लिंकवर क्लीक करून लॉगिन करा. एक वर्डप्रोसेसर प्रोग्राम तुमच्यापुढे उभा असेल. त्यात तुम्ही वर्ड स्टाईलने पत्र टाईप करू शकता. एक्सेल स्टाईलने स्प्रेडशीट तयार करू शकता किंवा चक्क एखादे पॉवरपाईंट प्रेझेंटेशन सुद्धा त्यात तयार होऊ शकते. ह्यातून तयार होणारी तुमची फाईल सुद्धा गुगलच्या सर्व्हरवर सेव्ह करता येते. हवी तेव्हा जगात कुठूनही ती उघडता येते. प्रिंट करता येते वगैरे. २००८ च्या मे महिन्यात ही सोय इंटरनेटवर उपलब्ध आहे. सहजपणे. तुम्हाला चोरीचं म्हणजे पायरेटेड सॉफ्टवेअर वापरण्याची आवश्यकताच नाही. हे सारं शक्य झालं ते वेब अॅप्स किंवा वेब अॅप्लीकेशन्स ह्या संकल्पनेमुळे. तुम्हाला जो प्रोग्राम किंवा अॅप्लीकेशन लागतं ते वेबसाईटवरच उपलब्ध करून देणं ही वेब अॅप्सच्या मागची भूमिका.
आता हे वेब अॅप्सबद्दलचं प्रास्ताविक ऐकल्यानंतर कुणीतरी नक्कीच हात वर करून उभा राहणार आणि त्याची शंका विचारणार, हे मला अपेक्षित आहे. तो मला विचारणार की मी (म्हणजे तो) दररोज फोटोशॉप नावाचा प्रोग्राम वापरतो. त्यात त्याचे रंगीत फोटो उघडतो. त्याचे कृष्ण- धवल म्हणजे ब्लॅक अॅन्ड व्हाईट करतो. किंवा, त्या फोटोंवर निरनिराळ्या प्रक्रिया करतो. फोटोशॉप ह्या अवाढव्य आणि पॉवरफुल म्हणता येईल असा प्रोग्राम ते सारं शक्य करतो. ह्या त्याच्या कामासाठी तरी संगणकावर प्रोग्राम हवा की नको? की ते सारं कामही इंटरनेटवर करता येईल? तर मंडळी, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे - होय, फोटोवरचं ते बहुतेक सारं कामही इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या वेबअॅपवर करणं शक्य आहे. आता हे उत्तर ऐकल्यानंतर लगेचच पुढला प्रश्न किंवा शंका ही की हे शक्य होण्यासाठी किती काळ वाट पहावी लागेल. आज वर्ड, एक्सेल, पॉवरपाईंटसारख्या प्रोग्रामचं काम वेबअॅप करीत आहेत. फोटोशॉपसारख्या प्रोग्रामचं काम करणारं वेबअॅप केव्हा उपलब्ध होणार? ह्या प्रश्नाचं उत्तरही खूप आशादायक आहे. मंडळी, फोटोशॉपसारखं काम करणारं वेबअॅप आज ह्या क्षणाला इंटरनेटवर उपलब्ध आहे. ज्या साईटवर ते उपलब्ध आहे त्या साईटचं नाव आहे picnik.com.
हे पिकनीक डॉट कॉम नाव ऐकलं की आपल्या डोळ्यापुढे काहीतरी वेगळच चित्र उभं राहील. काहीतरी सहली किंवा पिकनीकच्या मजेसंबंधीची ही साईट असेल असा अंदाज आपण पटकन करूनही टाकू. पण नाव छोटं लक्षण मोठं अशा प्रकारची ही picnik.com आहे. त्यावर गेल्याशिवाय मी काय म्हणतोय याचा अंदाज येणार नाही. पिकनीक डॉट कॉम ला मी फोटोच्या दुनियेतली अलिबाबाची गुहा असं म्हणतो. त्याचं कारण सरळ आहे. ह्या साईटवर फोटोशॉपसारखं वेबअॅप उपलब्ध आहे, आणि त्यात फोटोवर काम करण्यासाठी लागणार्‍या शेकडो सोयी आणि टूल्स उपलब्ध आहेत. ह्या सोयी कोणकोणत्या याची ही एक वरवरची यादी पहाः १) रंगीत फोटोंचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो तयार करणे. २) समजा एखाद्या फोटोत कॅमेरा तिरका धरल्याने माणूस वा दृश्य तिरकं आलं असेल तर ते सरळ (Rotate) करणं. ३) एखाद्या फोटोतला विशिष्ट भाग कापून टाकणं (Crop करणं). ४) एखाद्या फोटोत Exposure चा दोष आल्याने फोटोत अनावश्यक सावली वा अंधुकता असेल तर त्याची दुरूस्ती करणं. ५) फोटोतले रंग कमीअधिक गडद वा फिकट वाटत असतील तर ते सुधारणं. ६) फोटोतला शार्पनेस वाढवणं. ७) फोटोत रेडआय नावाचा दोष काही वेळा दिसतो. डोळे अधिक लाल वगैरे वाटतात. तो रेडआय चा दोष दूर करणं. ८) एखाद्या फोटोतल्या माणसाचे पानामुळे लाल लाल झालेले दात पांढरे शुभ्र करणं ९) फोटोला सुंदरशी फ्रेम किंवा चौकट देणं. १०) फोटोचे कोपरे गोलाकार करणं. ११) फोटोखाली छान अक्षरांत टीपा किंवा नावे वेगवेगळ्या रंगात देणं. (पिकनीक फॉंट फार सुंदर आहेत. ते पहाच. १२) फोटोचं रेखाचित्र तयार करणं. १३) फोटो नाईटव्हिजन (हिरव्या प्रकाशात) मध्ये काढल्याप्रमाणे परिणाम तयार करणं. वगैरै वगैरे वगैरे.
ह्या सुट्टीच्या दिवसात छोट्या दोस्तांसाठी ही picnik.com एकदम मस्त टाईम पास साईट आहे. टाईम पास तर आहेच पण आपले उद्योग आणि उपदव्याप चाललेले असताना आपण नकळत फोटोचं तंत्रही शिकत असतो. आजकाल घराघरातून टीव्ही जसे आलेले आहेत, तसे डिजिटल कॅमेरेही आले आहेत. त्यातले फोटो आपण आपल्या संगणकात साठवत असतो. त्या फोटोंवर सुद्धा आपल्याला हे सारे इफेक्ट आणि युक्त्या वापरून पाहता येतील. मात्र, मूळ फोटो शाबूत ठेवून त्याच्या कॉपीवरच हे उद्योग करून पहा. नाहीतर चांगलेच फटकेच प़डतील. पण समजा तुमच्याकडे डिजिटल कॅमेरा नसेल तर इंटरनेटवरचे कोणतेही फोटो तुम्हाला घेता येतील. तुमच्या संगणकातले इतर काही निरूपयोगी फोटो किंवा चित्रे सुद्धा त्यासाठी उपयोगात येतील. सगळे उद्योग झाल्यानंतर आलेल्या इफेक्टचा फोटो तुम्हाला तुमच्या संगणकावर सेव्ह करता येतो. किंवा flickr.com, पिकासा वेब अल्बम वगैरेमध्येही ठेवता येतो.
पिकनीक डॉट कॉमचं कौतुक जगातल्या अनेक काँप्युटर मॅगझीन्सनी तोंड भरून केलं आहे. पीसी मॅगझीन पासून ते सीनेट पर्यंत, आणि वॉल स्ट्रीट जर्नल पासून ते बीबीसी व टाईम मॅगझीनपर्यंत अनेकांनी पिकनीक डॉट कॉमचं परिक्षण छापलं आहे. पिकनीक सारखी फोटोचं अॅप देणारी वेबसाईट आज तरी विरळा आहे. पण मंडळी, अतिशय झपाट्याने आपलं इंटरनेट विकसित होतय. पूर्वीसारख्या नुसत्या मुक्या साईटस आता जुनाट गणल्या जाऊ लागल्या आहेत. वेबअॅप आणि डायनॅमिक कंटेंटचे आता दिवस आहेत. पिकनीक डॉट कॉम ही सध्याच्या दिवसांचीच एक प्रतिनिधी आहे.
फोटोग्राफीमध्ये रस असणार्‍या प्रत्येकाने पिकनीक ला भेट द्यायला हवी.

२२ फेब्रु, २०११

संगणक डॉट इन्फो संबंधी प्रश्नोत्तरे, अर्थात FAQ.

ह्या ब्लॉगसाठी वापरलेला टाईप अतिशय बारीक वाटतो. त्यामुळे वाचताना त्रास होतो. तो थोडा मोठा का करीत नाही?
- ब्लॉगचे डिझाईन समतोल करण्याच्या दृष्टीने तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतलेला हा टाईप आहे. काहींना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना स्क्रीनवर वाचताना तो छोटा वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे. मात्र एक युक्ती वापरल्यास आपल्याला हा टाईप मोठा करून स्क्रीनवर वाचता येईल. युक्ती फारच सोपी आहे. आपण आपल्या कीबोर्डवरील Control म्हणजेच Ctrl हे बटण दाबून ठेवून अगदी उजवीकडील + (अधिक चिन्हाचे बटण) दाबा. आपल्या स्क्रीनवरील अक्षराचा आकार क्षणार्धात मोठा झालेला दिसेल. त्याही पेक्षा मोठी अक्षरे हवी असतील तर पुन्हा तेच करा, म्हणजे Ctrl दाबून ठेवून + हे बटण दाबा. अक्षरे आणखी मोठी होतील.
वाचून झाल्यानंतर अक्षरे पूर्वीसारखी करण्यासाठी Ctrl बटण दाबून ठेवून अगदी उजवीकडील - हे (वजाबाकी चिन्हाचे) बटण दाबा. अक्षरांचा आकार कमी झालेला दिसेल.

मी पूर्वी sanganaktoday.blogspot.com हा आपला जुना ब्लॉग वाचत असे. तो नंतर फक्त निमंत्रितांसाठी खुला होता. त्यावरील मजकूर ह्या ब्लॉगवर आहे काय?
- जुन्या ब्लॉगवरील सर्व मजकूर (सर्व पोस्टस) आता ह्या ब्लॉगवर उपलब्ध करण्यांत आल्या आहेत. हा ब्लॉग आता सर्वांना खुला राहणार आहे.

पूर्वीच्या ब्लॉगवर प्रश्न विचारण्याची सोय होती. ह्या ब्लॉगवर प्रश्न विचारता येतील काय?
- हो, आपले प्रश्न आपण sanganakinfo@gmail.com व mshirvalkar@gmail.com वर पाठवू शकता.

आपले लेख विविध वृत्तपत्रांमध्ये येत असतात. ते लेख ह्या ब्लॉगवर वाचण्यासाठी उपलब्ध होतील काय?
- होय. ते लेख किंवा त्या लेखांची त्या त्या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावरील लिंक ह्या ब्लॉगवर उपलब्ध करण्यांत  येणार आहे.

आपल्याशी संपर्क साधावयाचा असल्यास कुठे साधावा?
- mshirvalkar@gmail.com ह्या पत्त्यावर ईमेल करून संपर्क साधता येईल.

धन्यवाद.

२१ फेब्रु, २०११

देशोदेशीचा माहितीकोश

जगात अफगाणिस्तान व अल्बेनिया पासून ते झांबिया आणि झिंबाब्वे पर्यंत अनेकविध देश आहेत. ह्या सर्व देशांची अतिशय बारीक सारीक माहिती अमेरिकेचे हेरखाते आपल्या सी.आय.ए. ह्या गुप्तहेर संघटनेच्या माध्यमातून गोळा करीत असते. ही गोळा केलेली माहिती दर पंधरा दिवसांनी तपासून अद्ययावत ठेवण्याची व्यवस्था सी.आय.ए. कडे आहे. वेगवेगळ्या देशांची इतकी अद्ययावत माहिती गोळा करणारी यंत्रणा जगात दुसरी नसावी. सामान्यतः एखादे हेरखाते जेव्हा अशी माहिती गोळा करते तेव्हा त्याबद्दल पूर्णपणे गुप्तता पाळण्यात येते. पण अमेरिकेच्या सी.आय.ए. चे वैशिष्ट्य हे की गोळा केलेल्या माहितीतील फार मोठा भाग ते जगाच्या माहितीसाठी मोफत खुला करतात. दर वर्षी सी.आय.ए. 'दि वर्ल्ड फॅक्टबुक' ह्या नावाचा एक भला मोठा ग्रंथच पुस्तक रूपाने प्रकाशित करते. गेली दहा वर्षे तर हा ग्रंथ जगासाठी इंटरनेटवर उपलब्ध करण्यांत येत आहे. आज त्याबद्दल 'एंटर' मध्ये लिहिण्याचे कारण म्हणजे हा देशोदेशीचा विशाल माहितीकोश तुम्हीही इंटरनेटवर पाहू शकता, वाचू शकता, त्या माहितीचा संदर्भासाठी उपयोग करू शकता. सी.आय.ए. सारखी जागतिक स्तरावरील आणि अमेरिकन सरकारच्या अधिपत्याखाली अधिकृतपणे काम करणारी संस्था जेव्हा अशी माहिती उपलब्ध करते, तेव्हा तिच्या विश्वासार्हतेबद्दल शंका बाळगण्याचे कारण नसते. इंटरनेटवर ही माहिती पाहण्यासाठीचा वेबपत्ता आहे - https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/
दि वर्ल्ड फॅक्टबुक मध्ये १९४ स्वतंत्र देशांची अत्यंत सविस्तर अशी माहिती आहे. त्या व्यतिरिक्त तैवानसारखा अमेरिकेने अद्यापि मान्यता न दिलेला प्रदेश, वा ऑस्ट्रेलिया, ब्रिटन सारख्या खंडांतील काही प्रदेश वा बेटे वगैरेंची भर त्यात घातल्यास जगातील एकूण २६६ भौगोलिक क्षेत्रघटकांची माहिती ह्या कोशात आपल्याला मिळते.
माहितीचे स्वरूप 
एखाद्या देशाची सविस्तर माहिती हा कोश देतो म्हणजे नेमकी कोणती माहिती त्यात आपल्याला मिळते हे समजून घेणे आवश्यक आहे. आपण त्यासाठी आपल्याच देशाचे उदाहरण घेऊ. भारताची माहिती देणार्‍या पानावर जेव्हा आपण येतो तेव्हा सर्वांत वर एक सूचना आपल्याला वाचायला मिळते. 'This page was last updated on 19 June 2008' हे वाक्य पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की कोणतेही छापिल पुस्तक आपल्याला इतकी अद्ययावत माहिती उपलब्ध करू शकणार नाही. कारण छापिल पुस्तकातील माहिती कंपोज आणि प्रुफरीड करून पुढे ती छापली जाऊन जेव्हा आपल्यापुढे येते तेव्हा ती किमान महिना दोन महिने तरी जुनी झालेली असते. ते पुस्तक छापल्यानंतर त्याच्या प्रती संपेपर्यंत पुढील आवृत्ती येत नसल्याने छापिल पुस्तकांतील माहिती जुनी जुनी होत जाते. 'दि वर्ल्ड फॅक्टबुक' इंटरनेटवर दर पंधरा दिवसांनी अपडेट होत असल्याने माहितीच्या अद्ययावततेच्या स्पर्धेत ते छापिल पुस्तकाला शर्यतीत खूपच मागे टाकते. ह्या कारणामुळेच जगभरातील लाखो अभ्यासकांसाठी हे फॅक्टबुक म्हणजे एक दैनंदिन संदर्भासाठीचा ग्रंथ झालेला आहे.
आपण पुन्हा भारताच्या पानावर येऊ. भारताविषयीच्या माहितीचे पान आपण आपल्या प्रिंटरवर छापायचे ठरवले तर तो मजकूर ए-४ आकाराची एकूण १६ पाने व्यापतो. म्हणजेच भारतासारख्या एकूण २६६ भौगोलिक क्षेत्रघटकांची माहिती देण्यासाठी हे हँडबुक ३००० हून अधिक पानांचा मजकूर आपल्यापुढे उपलब्ध करते. भारताच्या पानावर सर्वात वर आपला तिरंगा झेंडा आणि भारताचा नकाशा आहे. त्यानंतर भारत देशाची एकूण ऐतिहासिक पार्श्वभूमी थोडक्यात, पण आर्य - द्रविड ते मौर्य काळापर्यंत आणि पुढे इंग्रजांचा अंमल, स्वातंत्र्य चळवळ असे टप्पे घेत आजच्या काळापर्यंत दिलेली आपल्याला दिसते. ही थोडक्यात पार्श्वभूमी संपली की पुढे आपल्यावर माहितीचा एक जबरदस्त धबधबा कोसळू लागतो. भारताचे जमिनी व सामुद्रिक क्षेत्रफळ, सीमारेषांची किलोमीटरमधील लांबी (उदाहरणार्थ चीनची सीमा ३३८० कि.मी., पाकिस्तानची २९१२ कि.मी., नेपाळची १६९० कि.मी. वगैरे), शेती व बिगर शेती जमिनीचे क्षेत्रफळ हे तपशील प्रथम येतात. मग लोकसंख्येचे आकडे दिसू लागतात. त्यात एकूण लोकसंख्या, त्यात स्त्रिया किती, पुरूष किती, ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण किती, जन्म-मृ्त्यूचा दर किती वगैरे माहिती नेमकी दिलेली दिसते. पुढे भारतातल्या एडस आणि एच.आय.व्ही. बाधितांचे आकडेही असतात. धर्माच्या निकषावर लोकसंख्येचे प्रमाण (हिंदू ८०.५%, मुस्लीम १३.४%, ख्रिस्ती २.३%, शीख १.९% वगैरे) देणारी टक्केवारी पुढे येते. कोणत्या भाषा बोलल्या जातात, साक्षरता किती आहे हा आणखी सविस्तर तपशीलही नोंदलेला दिसतो. एवढं झाल्यावर भारतातील सरकारी व राजकीय माहितीचा विभाग असतो. त्यात राज्यांची नावे, राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान मनमोहनसिंग, उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांच्या नावाचा उल्लेखही असतो. लोकसभेच्या ५४५ जागांपैकी ५४३ निवडणूकीने व २ जागा राष्ट्रपतींद्वारा नेमणूकीने भरल्या जातात हे देऊन काँग्रेस १४७, भाजपा १२९, सीपीआय(मा) ४३, स.प. ३८, शिवसेना १२, राष्ट्रवादी काँग्रेस १० वगैरे पक्के आकडे देऊन सरकारची रचना नेमकी कशी आहे हे दाखवलेलं असतं. राजकीय पक्षांचा तपशील देताना बहुजन समाज पार्टीच्या मायावतींपासून ते शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरें आणि काँग्रेसच्या सोनिया गांधींपर्यंत सर्व प्रमुख पक्षप्रमुखांची दखल घेतलेली दिसते. राजकीय दबाव गटात विश्व हिंदू परिषद, रा.स्व. संघ, बजरंग दलापासून ते हुरियत काँन्फरन्सनाही वगळलेले नसते.
राजकीय पार्श्वभूमी एवढी सविस्तर आल्यानंतर आर्थिक बाजू तेवढ्याच तपशीलाने येणं स्वाभाविकच असतं. शेतकर्‍यांचे प्रमाण, मजुरांची संख्या, बेकारांची संख्या, महागाईचा दर, राष्ट्रीय अंदाजपत्रक, पिके, उद्योग, तेल, वायू, खनिजे, आयात-निर्यात, चलन, आर्थिक वर्षाचा तपशील हे सारंही तपशीलाने असतं.
महत्वाची आकडेवारी 
भारतात एकूण लँडलाईन फोन्स २००५ साली ४ कोटी ९७ लाख होते. मात्र २००६ साली भारतातील मोबाईल फोन्सची संख्या १६ कोटी ६१ लाख होती. इतका बारीक तपशील देताना भारताच्या VSAT आणि INSAT पद्धतींचा उल्लेख करायला सी.आय.ए. चे हे हँडबुक विसरत नाही. भारतातील रेडिओ आणि टीव्ही स्टेशन्सची संख्या, इंटरनेट युजर्सची संख्या, इंटरनेट होस्टस, एकूण विमानतळे, विमानतळांच्या धावपट्ट्यांची एकूण लांबी, गॅस पाईपलाईन्सची एकूण लांबी, रेल्वेमार्गाची व महामार्गांची एकूण लांबी, जलमार्गांचा तपशील हा नेमकेपणाने सी.आय.ए. कडे उपलब्ध असतो. मुंबई, गोव्यापासून कांडलापर्यंत महत्वाची बंदरे त्यांनी नोंदलेली असतात.
एवढं झाल्यानंतर आपल्या लष्कराची माहिती त्यांनी दिली नसती तरच नवल. आपलं पायदळ, हवाई दल, आणि नाविक दलाचा तपशील तिथे आपल्याला मिळतो. भारताचे चीन, पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, भूतान वगैरेंशी कसे संबंध आहेत त्याबद्दलचे टिपणही पुढे वाचायला मिळते. पुढे भारतात आलेल्या निर्वासितांची संख्याही दिलेली असते.
वरील परिच्छेदांमध्ये आपण फक्त भारताविषयी कोणती माहिती आली आहे याचा तपशील पाहिला. अशाच प्रकारचा तपशील २५० हून अधिक देशांबद्दल आणि क्षेत्रघटकांबद्दल त्यात आलेला आहे. इंटरनेट वा संगणकावर बसून फक्त गेम खेळण्यात वेळ घालवणार्‍या आबालवृद्धांनी ही माहिती पाहताना चीन-भारत, किंवा भारत-पाकिस्तान, किंवा भारत-बांगला देश वगैरे तुलना करून पाहिली तर गेमपेक्षाही चांगले मनोरंजन होऊ शकेल.
वाचनासाठी मोफत उपलब्ध 
हा सारा माहितीचा खजिना तुम्ही इंटरनेटवर मोफत वाचू शकता. निरनिराळ्या स्पर्धा परिक्षांना बसणार्‍या विद्यार्थ्यांसाठी करन्ट इव्हेंटस वा जनरल अवेअरनेसचे ज्ञान सुधारण्यासाठी ह्या हँडबुकसारखे दुसरे साधन नाही.

ड्व्होरॅक (Dvorak) कीबोर्ड

माणूस परंपरेने चालत असतो असं म्हणतात. काँप्युटरचा कीबोर्ड हे एका परंपरेचच प्रतीक आहे. कीबोर्डची ही परंपरा चालत आली आहे १८७२ सालापासून. म्हणजे कीबोर्डच्या परंपरेला आता १३३ वर्षे झाली. संगणकाचा जो कीबोर्ड आज आपण वापरतो त्याला QWERTY कीबोर्ड असं म्हंटलं जातं. कीबोर्डवर अक्षरांची जी सर्वांत वरची बटणं असतात त्यात QWERTY ही ओळीने पहिली सहा अक्षरं. कीबोर्डवरील अक्षरांची ही रचना आणि पहिला टाईपरायटर तयार केला ख्रिस्तोफर शोल्स ह्या अमेरिकन माणसाने. १८७२ साली शोल्सने त्याचे पेटंट रेमिंग्टन ह्या टाईपरायटर कंपनीला १२००० डॉलर्सना र्विकून टाकले. तेव्हापासून शोल्सने तयार केलेली QWERTY कीबोर्डवरील अक्षरांची रचना काहीही बदल न होता जशीच्या तशी चालत आली आहे. काँप्युटरच्या कीबोर्डनेही शोल्सची ही रचना स्वीकारली आणि ती आता जगभर चालू आहे.
ख्रिस्तोफर शोल्स हा मूळचा एक पत्रकार. १८४५ साली तो 'साऊथपोर्ट टेलिग्राफ' नावाच्या एका छोट्या वृत्तपत्राचा संपादक होता. शोल्स पत्रकार असला तरी त्याच्या पिंडात एक संशोधक भिणलेला होता. तंत्रज्ञानविषयक त्याचे काही ना काही उद्योग सतत चाललेले असतं. कागदावर पान क्रमांक छापण्याचे जे छोटे यंत्र होते त्या यंत्राच्या आधारावर क्रमांकांच्या जागी अक्षरे टाकून त्याने एक मिनी टाईपरायटर तयार केला होता. आपल्या ह्या संशोधनाचं पेटंटही शोल्सने १८६४ साली नोंदवलेलं होतं. टाईपरायटरच्या ह्या टप्प्यापर्यंत QWERTY अक्षररचना शोल्सच्या स्वप्नातही नव्हती. पुढे १८६८ साली त्याने टाईपरायटरचं आणखी एक यंत्र तयार केलं आणि त्याचं पेटंटही आपल्या नावावर नोंदवलं. ह्याच दरम्यान कधीतरी QWERTY अक्षररचना तयार झाली.
खरं तर शोल्सने टाईपरायटरचा जो पहिला प्रयत्न केला होता त्यातली अक्षररचना ABCDEFG अशी क्रमाने म्हणजे अकारविल्हेच होती. ह्या पद्धतीने असलेल्या टाईपरायटरमधील अक्षरांचे दांडे टाईप करताना एकमेकात अडकत असतं. हे दांडे एकमेकात अडकले की टायपिस्टचं काम थांबत असे. टायपिस्टला ते अडकलेले दांडे हाताने सोडवावे लागत आणि मग पुन्हा टायपिंग सुरू करावे लागे. ह्या दोषावर मात करण्याचा प्रयत्न शोल्स आणि त्याचा व्यवसायातला भागीदार जेम्स डेन्समोर हे दोघे करीत होते. टायपिंग करताना नेमक्या कोणत्या अक्षरांच्या दांड्या वारंवार अडकतात याचे निरीक्षण डेन्समोरने केले. त्या निरीक्षणातून वारंवार अडकणार्‍या अक्षरांच्या दांड्यांच्या जागा त्यांनी बदलून पाहिल्या. अशा प्रकारे जागा बदलल्याने मूळची ABCDEFG अशी जी अकारविल्हे अक्षररचना मूळ कीबोर्डवर होती ती बदलली गेली. पण अक्षरांच्या दांड्या अडकण्याचे प्रमाण खूपच कमी झाले. अक्षरांच्या जागा बदलण्याच्या ह्या खटाटोपातूनच QWERTY ह्या अक्षररचनेचा आज वापरात असलेला कीबोर्ड तयार झाला. पुढे रेमिंग्टन टाईपरायटर कंपनीने आपला टाईपरायटर बाजारात आणला तो ह्याच अक्षररचनेला कायम स्वीकारून. पुढे टायपिस्टसच्या कितीतरी पिढ्या हाच कीबोर्ड शिकून आपला टायपिंग स्पीड वाढवत राहिल्या. इतर टाईपरायटर कंपन्यांनीही हीच अक्षररचना कायम ठेवून आपले टाईपरायटर बाजारात आणले.
शोल्सचा हा जो जगभर वापरला जाणारा कीबोर्ड (म्हणजे QWERTY ही अक्षररचना) आहे त्यामागे केवळ टाईपरायटरच्या अक्षरांच्या दांड्या एकमेकात अडकू नयेत इतकाच विचार आहे. आज आपण आपल्या काँप्युटरचा कीबोर्ड वापरतो त्यातही तीच अक्षररचना आली आहे ती केवळ परंपरेतून. ही परंपरा तोडण्याचा अंशतः यशस्वी प्रयत्न केला तो डॉ. ऑगस्ट ड्व्होरॅक ह्या शिक्षणतज्ज्ञाने. ड्व्होरॅक ह्या नावाचा उच्चार करताना सुरूवातीस ड चा अगदी पुसटसा उच्चार केला जातो. तो पुसटसा उच्चार ऐकू न आल्यास डॉ. ऑगस्ट व्होरॅक असेच नाव कानी पडेल. डॉ. ड्व्होरॅक हे वॉशिंग्टन विद्यापीठात सिअॅटल येथे शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्राचे प्राध्यापक होते. टायपिस्ट जेव्हा टायपिंग करीत असतो तेव्हा त्याचे काम तणावाचे न होता आरामदायी (Ergonomic) व्हावे आणि टायपिस्टची उत्पादकता वाढावी असा प्रयत्न डॉ. ड्व्होरॅक करीत होते. त्यांनी माणसाच्या बोटांचा शारिरीक व हालचालींच्या दृष्टीकोनातून बारकाईने अभ्यास केला. डॉ. ड्व्होरॅक यांचे हे संशोधन चालू होते १९३० च्या आसपास. १९३२ साली ते पुर्णत्वाला जाऊन त्यांचा नवा कोबोर्ड तयार झाला. १९३६ साली त्यांचे पेटंट अमेरिकन सरकारने नोंदवले. तो काळ दुसर्‍या महायुद्धाचा होता. महायुद्धाच्या समस्येपुढे डॉ. ड्व्होरॅक यांचे हे नवे संशोधन मागेच राहिले. १९७५ साली डॉ. ड्व्होरॅक यांचे निधन झाले. त्यानंतर सात वर्षांनी म्हणजे १९८२ साली त्यांच्या ह्या कीबोर्डला रितसर मान्यता मिळाली. पुढे आयबीएम कंपनीने आपल्या काँप्युटर कीबोर्डसाठी ड्व्होरॅक कीबोर्डचा पर्यायही उपलब्ध केला. १९८४ साली ड्व्होरॅक कीबोर्ड वापरणारे १००००० टायपिस्ट अमेरिकेत होते. १९९५ ची मायक्रोसॉफ्ट विंडोज ९५ आली तेव्हा त्याबरोबर नेहमीच्या QWERTY कीबोर्डबरोबर डव्होरॅक कीबोर्ड देखील उपलब्ध करण्यांत आला. आजही तुमच्या आमच्या संगणकावर तुम्ही ड्व्होरॅक कीबोर्ड वापरू शकता. एक गंमत म्हणून तो वापरून पहायला काहीच हरकत नाही.
तुम्ही जर Windows 98, Windows XP किंवा Windows Vista वापरत असाल तर तुमच्या संगणकावरचा तोच कीबोर्ड कायम ठेवून तुम्हाला ड्व्होरॅक कीबोर्ड (सॉफ्टवेअरच्या सहाय्याने) पद्धतीने टाईप करता येईल. त्यासाठी Help मध्ये जाऊन Dvorak हा एकच शब्द टाईप करून माहिती शोधा. तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती Windows Help मध्ये मिळेल. ड्व्होरॅक कीबोर्डचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात तुम्हाला एका हाताने टाईप करण्याची सोय आहे. आपला नेहमीचा QWERTY हा कीबोर्ड दोन्ही हातांनी टाईप करावा लागतो. पण खूपदा एखादा हात प्लास्टरमध्ये असेल किंवा काही दुखणे असेल तर एका हाताने (डाव्या आणि उजव्या कोणत्याही) टाईप करण्याची सोय ड्व्होरॅक कीबोर्डमध्ये आहे. अर्थात ज्यांना दोन्ही हातांनी टायपिंग करायचे असेल तर तीही सोय अर्थातच ड्व्होरॅक मध्ये आहे.
आता कोणी म्हणेल की हे काहीतरी काँप्युटर सॉफ्टवेअरवाल्यांचे नवे फॅड आहे. तर मंडळी तसं नाही. ड्व्होरॅक कीबोर्ड हा गीनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्येही गेला आहे. २००५ मध्ये बार्बारा ब्लॅकबर्न ह्या महिलेने ड्व्होरॅक कीबोर्ड वापरून दर मिनिटाला २१२ शब्द ह्या वेगाने टायपिंग करून दाखवले. तिचा हा टायपिंग वेग गीनेस बुकवाल्यांनी जगातील सर्वांत फास्ट टायपिंगचा विक्रम म्हणून नोंदवलेला आहे. ह्या कीबोर्डची माहिती विंडोजच्या हेल्पव्यतिरिक्त इंटरनेटवर सर्वत्र उपलब्ध आहे. http://www.gigliwood.com/abcd/ ह्या साईटवर तर A basic course in Dvorak (त्याला ABCD असं छान नाव दिलं आहे) हा कीबोर्ड शिकण्याचा एक कोर्सच उपलब्ध आहे. http://www.mwbrooks.com/dvorak/di.html ही साईट एका सेवाभावी संस्थेची म्हणजे Dvorak International यांची आहे. ही संस्था ह्या कीबोर्डचा प्रचार जगभरात सर्वत्र व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. तुमच्या संगणकावर ड्व्होरॅक कीबोर्ड कसा लावायचा याची माहिती http://www.dvorak-keyboard.com/convert.html ह्या साईटवर उपलब्ध आहे.
जे हा कीबोर्ड वापरतात त्यापैकी अनेकांचं म्हणणं असं आहे की हा कीबोर्ड वापरून तुमचा टायपिंग स्पीड ७० ते १०० टक्केपर्यंत वाढू शकतो. हे म्हणणं खरं असेल तर मग आजपर्यंत ह्या कीबोर्डचा प्रचार का झाला नाही? तो सगळीकडे मोठ्या प्रमाणावर का पसरला नाही? असे प्रश्न तुम्हा-आम्हाला पडणं स्वाभाविक आहे. ड्व्होरॅक कीबोर्डचे जे पाठिराखे आहेत ते त्यावर म्हणतात की परंपरा न सोडण्याची आपली वृत्ती त्याला कारणीभूत आहे. वेगळा मार्ग चोखाळण्याला धाडस लागतं. ते धाडस आपण करीत नाही. आपल्यासारखेच इतर बहुतेक जण असतात. त्यामुळे QWERTY कीबोर्ड पिढ्यान पिढ्या चालत राहिला. परंपरेच्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे चाकोरी. चाकोरीबाहेर जाऊन प्रयत्न करणारे कमी असतात. त्यामुळेच ड्व्होरॅक कीबोर्ड तितकासा रूढ झाला नाही. हे ड्व्होरॅकच्या पाठिराख्यांचं म्हणणं खरं की खोटं याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. तुमचं त्यावरचं मत ठरविण्यापूर्वी मात्र तुम्ही तो वापरून पहायला हवा इतकच मला म्हणायचं आहे.
तुम्हाला वाटतं तितकं ते अवघडही नाही, आणि वेगळ्या दमड्या मोजायच्या नसल्याने खिशाला चाट पाडणाराही हा प्रकार नाही. काहीतरी नवं करून पाहण्याची आवड असणारांनी हा नवा कीबोर्ड अवश्य वापरून पहायला हवा असं मला वाटतं.

मराठी विकीपेडियाचं दुर्लक्षित जग

इंटरनेटवर विकीपेडिया नावाचा एक ज्ञानकोश सर्वांसाठी मोफत खुला आहे. www.wikipedia.org ह्या साईटवर गेलात की तुम्हाला इंग्रजी विकीपेडियाचा ज्ञानखजिना मोफत खुला होतो. इंग्रजी धरून जगातल्या एकूण २५५ भाषांमध्ये आज हा विकीपेडिया उपलब्ध आहे. ह्या २५५ भाषांमध्ये इंग्रजी जशी आहे तशी आपली मायबोली मराठी पण आहे. इंग्रजीमध्ये आज पुस्तक रूपाने उपलब्ध असणारा एनसायक्लोपेडिया ब्रिटानिका, किंवा मुख्यत्वे सीडीवरचा मायक्रोसॉफ्टचा एनकार्टा एनसायक्लोपडिया वगैरे हजारो पानांचे ज्ञानकोश आपण पाहिले आहेत किंवा ऐकले आहेत. मराठीतही ज्ञानकोशकार श्री.व्यं. केतकरांचे ज्ञानकोश खंड, ग.रं भिडे यांचे व्यावहारिक ज्ञानकोशांचे खंड, पं. महादेवशास्त्री जोशी यांचे भारतीय संस्कृती कोश, आणि महाराष्ट्रात सर्वांना परिचित असलेला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा विश्वकोश असे लहान-मोठे ज्ञानकोश प्रकाशित झाले. इंग्रजीतल्या ब्रिटानिका किंवा एनकार्टा सारख्या ज्ञानकोशाची सुधारित (म्हणजे अद्ययावत ह्या अर्थाने) आवृत्ती पुस्तकरूपाने व/वा सीडी-डीव्हीडीच्या स्वरूपात दरवर्षी प्रकाशित होते. मात्र, मराठीत अद्ययावत स्वरूपात ग्रंथ वा सीडी-डीव्हीडी स्वरूपात नियमित प्रकाशित होणारा एकही ज्ञानकोश आज अस्तित्वात नाही.
ह्या पार्श्वभूमीवर मराठीत अद्ययावत स्वरूपात उपलब्ध होणारा ज्ञानकोश एकच, तो म्हणजे इंटरनेटवरचा मराठी विकीपेडिया. हा मराठी विकीपेडिया ज्ञानकोशाच्या स्वरूपात इंटरनेटवर उपलब्ध असला तरी तो परिपूर्ण मात्र नाही. मराठी विकिपेडिया व इंग्रजी विकीपेडिया यांच्यातला फरक डोळे दिपवणारा आहे. इंग्रजीत जो विकीपेडिया इंटरनेटवर उपलब्ध आहे त्यात १ मे २००८ रोजी २,३३,५४,८८० (अक्षरी- दोन कोटी तेहतीस लाख चोपन्न हजार आठशे ऐंशी फक्त) नोंदी (Articles) उपलब्ध होत्या. ह्याच तारखेस, मराठी विकीपेडियामध्ये १७,१०० (सतरा हजार एकशे फक्त) नोंदी (Articles) होत्या. जगातले ७० लाखांहून अधिक लोक (सदस्य) आज इंग्रजी विकीपेडियाचा वापर करतात. मराठीत त्या तुलनेत फक्त २०९४ लोक विकीपेडियाचे मेंबर युजर्स आहेत. केवळ ७ जण मराठी विकीपेडियाचे व्यवस्थापक (Admins) आहेत. इंग्रजीत व्यवस्थापकांचा हाच आकडा १५३८ आहे. इंग्रजीत ७ लाखांहून अधिक चित्रे/छायाचित्रे/आकृत्या/नकाशे नोंदींबरोबर पहायला मिळतात. मराठी विकीपेडियाचा हाच आकडा १,१९६ आहे.
इंग्रजीच्या मानाने मराठी विकीपेडिया हा इंटरनेटवरचा मराठी ज्ञानकोश खूपच मागे असला तरी इतर भारतीय भाषांतले विकीपेडियाही मराठीच्याच वळणाने प्रवास करताना दिसतात. तेलगू विकीपेडिया आज भारतीय भाषांमध्ये सर्वांत आघाडीवर आहे. त्यात ३९,९०८ नोंदी (Articles) आहेत. त्या खालोखाल बंगाली विकीपेडियामध्ये १७,३२९, हिंदी विकीपेडियात १८,२६०, तामिळमध्ये १३,६५९, उर्दूमध्ये ७५५३, मल्याळीमध्ये ६१४०, कानडीमध्ये ५४५२, संस्कृतमध्ये ३८८२, भोजपुरीमध्ये २४०९, गुजरातीमध्ये ५६७, उडिया ५४३, काश्मीरी ३७५, सिंधी ३१०, पंजाबी २९५, असामी १८० अशी इतर भारतीय भाषांमधील विकीपेडियांची अवस्था आहे.
जगातील अन्य भाषांमध्ये विकीपेडिया कशा प्रकारे विकसित होतोय हे पाहणंही उदबोधक ठरेल. इंग्रजीच्या खालोखाल दुसरा क्रमांक लागतो तो जर्मन भाषेचा. जर्मन विकीपेडियामध्ये ७,४३,४७७ नोंदी (Articles) आहेत. फ्रेंच ६,५२,६४७, जपानी४,८७,५५७, इटालियन ४,४६,८०९, डच ४,३४,११६, स्पॅनिश ३,५६,७३२, रशियन २,६७,३८१, चिनी १,७४,७२६.
ह्या संदर्भात सर्व २५५ भाषांची तपशीलवार आकडेवारी ज्यांना पहायची आहे त्यांनी http://meta.wikimedia.org/wiki/List_of_Wikipedias ह्या इंटरनेट लिंकवर जाऊन अवश्य पहावं.
विकीपेडियाचं स्वरूप 
लोकशाही सरकारची व्याख्या करताना नेहमी of the people, for the people, by the people अशी केली जाते. विकीपेडियाची व्याख्याही त्याच धर्तीवर करता येईल. विकीपेडिया हा सर्वांचा, सर्वांसाठी असलेला, सर्वांनी मिळून तयार केलेला खुला ज्ञानकोश आहे. विकीपेडिया हा कोणा एका व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या मालकीचा नाही. तो सर्वांचा आहे. त्यासाठी कोणीही लिखाण करू शकतो. उपलब्ध असलेले लेख जगातील कोणालाही संपादित करता येतात. उपलब्ध लेखातील माहिती चुकीची वाटली तर कोणीही ती सुधारू शकतो. नसलेली माहिती त्यात टाकू शकतो. चुकीची माहिती काढूनही टाकू शकतो. हा अधिकार जगातील प्रत्येकाला आणि अक्षरशः कोणालाही आहे. अशा परिस्थितीत विकीपेडियातील माहिती अचूक कशी काय असू शकेल? कोणी चेष्टा-मस्करी करण्यासाठी, किंवा मुद्दाम एखाद्याची बदनामी करण्यासाठी हेतुतः चुकीची माहिती त्यात टाकू शकणार नाही का? वगैरे प्रकारचे प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविक आहे.
विकीपेडियाचं हे खुलं आणि अनिर्बंध स्वरूप हे एकीकडे त्याचं बलस्थान आहे, आणि त्याच वेळी त्याचं दोषस्थानही आहे. जग हे चांगल्या माणसांमुळे चालत असतं असं म्हणतात. विकीपेडियाही असाच चांगल्या प्रवृत्तीच्या माणसांमुळे आज चालतो आहे ही वस्तुस्थिती आहे. महात्मा गांधीच्या वरचा विकीपेडियातील लेख समजा एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या माणसाने संपादित केला आणि त्यात महात्माजींची बदनामी करणारा मजकूर टाकला तर काय होईल? तो तसा मजकूर टाकू शकेल का? उत्तर आहे, होय, तो तसा मजकूर टाकू शकेल. पण मग जगाला तो बदनामीकारक मजकूर विकीपेडियामध्ये वाचायला मिळेल का? तर त्याचं उत्तर आहे, तशी शक्यता फार कमी आहे. याचं कारण जे बदल वा संपादन विकीपेडियातील लेखांमध्ये होत असतं त्यावर विकीपेडियाच्या व्यवस्थापकांचं (Admins) चं बारीक लक्ष असतं. ह्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येकाचं त्यावर लक्ष असणंही अपेक्षित असतं. जर एखाद्याच्या लक्षात तो बदनामीकारक मजकूर आला तर लगेचच तो काढून टाकण्याचं काम ती व्यक्ती करू शकते. वाईट प्रवृत्ती विरूद्ध सतप्रवृत्ती असा लढा विकीपेडियाच्या व्यासपीठावर होणार हे विकीपेडियाने गृहित धरलेलं आहे. नेमक्या ह्याच पायावर आजचा विकीपेडिया उभा आहे.
मूळात विकीपेडियामधला wiki कुठला हा प्रश्न अनेकांसमोर उभा असेल. Wiki हा हवाईयन शब्द आहे. त्याचा अर्थ- त्वरेने म्हणजे इंग्रजीत quick. १९९५ साली वार्ड कनिंगहॅम ह्या अमेरिकन सॉफ्टवेअर कंन्सल्टंटने प्रथम wiki तंत्र वापरले. कनिंगहॅम अँड कनिंगहॅम नावाची त्याची कन्सल्टंसी देणारी व्यावसायिक संस्था होती. आपल्या संस्थेत त्याने wikiwikiweb नावाचे सॉफ्टवेअर तयार केले आणि आपल्या कंपनीच्या वेबसाईटवर ठेवले. हे सॉफ्टवेअर वापरल्याने त्याच्या वेबसाईटवर इतर प्रोग्रामर्स येऊ शकत असत, आणि त्यांच्या काही नव्या कल्पना असतील तर त्यांना त्या तेथे ठेवता येत असतं. विकीपेडियाची कल्पना राबवणारे ते पहिले सॉफ्टवेअर. आपली कल्पना वेबसाईटवर पटकन (quick) ठेवण्याची सोय म्हणून त्या सॉफ्टवेअरचे नाव कनिंगहॅमने wikiwikiweb असे ठेवले. कनिंगहॅम एकदा होनोलूलू विमानतळावर गेला असताना विमानतळावरील एका सेविकेने त्याला त्याचे सामान पटापट एअरपोर्ट बसमध्ये ठेवण्यास सांगितले. तेव्हा तिने विकी विकी हे शब्द उच्चारले होते. कनिंगहॅमच्या ते विकी विकी हे शब्द लक्षात राहिले होते. आपण जो विकी हा शब्द वापरून एक सॉफ्टवेअर केले आहे त्यातून उद्या wikipedia.org नावाचा ज्ञानसूर्य उगवणार आहे याची कल्पना कनिंगहॅमला तेव्हा नव्हती. १५ जून २००१ रोजी विकीपेडियाचा शुभारंभ झाला आणि आज २००८ साली wikipedia.org ही वेबसाईट जगातील दहाव्या क्रमांकाची वेबसाईट आहे.
विकीपेडिया आणि मराठी 
इंग्रजी विकीपेडिया केवळ साडेसात वर्षांमध्ये ३० लाख लेखांचा विक्रम करू शकला. साधारणतः २००५ च्या सुमारास मराठी विकीपेडियाच्या आरंभाला खरी चालना मिळाली. आज मराठी विकीपेडियाला मराठी लेखन करणारांची नितांत गरज आहे. त्यासाठी www.mr.wikipedia.org ह्या मराठी विकीपेडियाच्या वेबसाईटवर वारंवार आवाहन करण्यांत येत आहे. मराठी लेख संपादनाची स्पर्धाही विकीपेडियावर वारंवार जाहीर होत असते. त्यात भाग घेण्यासाठी कळकळीने आवाहन केले जाते. संगणकावर मराठी अक्षरं, शब्द, जोडशब्द कसे आणावे याचेही मार्गदर्शन तेथे आहे. सध्या सर्वत्र मराठीची चर्चा चालू आहे. त्या चर्चेत मराठी विकीपेडिया येणेही आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून (खरं तर संपूर्ण जगातूनच) मराठी विकीपेडियाचे फक्त २१०० सदस्य व्हावेत हे पटण्यासारखेच नाही. ह्या सदस्य संख्येत लक्षणीय वाढ झाल्यास मराठी विकीपेडियाचा विकास झपाट्याने म्हणा, बिगी बिगी म्हणा किंवा विकी विकी म्हणा होत जाईल.
विकीपेडियाच्या पाठोपाठ आता विक्शनरी म्हणजे विकीच्या माध्यमातून तयार होणारी डिक्शनरी, विकीबुक्स, विकीन्यूज, विकीव्हर्सिटी वगैरे उपक्रमही विकसित झाले आहेत. मराठीत ते आणून यशस्वी करण्याचा प्रयत्न आज काही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच मराठी मंडळी आज करीत आहेत. त्यांना साथ देणं हे सर्व मराठीजनांचं कर्तव्य आहे. लक्षात घ्या की डच भाषा बोलणारे जगात फक्त २ कोटी ४० लाख लोक आहेत. ह्या लोकांनी आपल्या डच भाषेच्या विकीपेडियावर एकूण ४,३४,११६ एवढे लेख लिहीले आहेत. मराठी भाषा बोलणारे जगात ९ कोटीहून अधिक लोक आहेत. म्हणजे आपण संख्येने डच भाषिकांच्या चौपट आहोत. पण आपण आजपर्यंत फक्त १७,००० लेखच मराठी विकीपेडियावर लिहू शकलो आहोत. कुठे २ कोटी ४० लाख आणि कुठे ९ कोटीचा आकडा? कुठे डचांचे ४ लाख ३४ हजार ११६ लेख आणि कुठे आपले फक्त १७,००० लेख? विकीपेडियाच्या बाबतीत मराठीचं काहीतरी चुकतय एवढं नक्की.
जागतिक पातळीवर तुमच्या भाषेतील विकीपेडिया हाही प्रगतीचा एक निकष मानला जाऊ शकतो. मराठीने इतर गोष्टींबरोबर विकीपेडियाकडेही लक्ष द्यायला हवे. कुणी ऐकतय का मी काय म्हणतोय ते?

घरच्या प्लंबिंगच्या कामाबद्दल माहिती देणारी साईट

घरकामात उपयुक्त साईट म्हणजे www.friendlyplumber.com/plumbing101.html . नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की घरच्या प्लंबिंगच्या कामाबद्दल माहिती देणारी ही साईट आहे. पाईप, नळ, वायसर, टॉयलेट वगैरे विषय इथे उत्तम प्रकारे चर्चिले गेले आहेत. 'युएसए टुडे' सारख्या दैनिकाने ह्या साईटला 'हॉट साईट' म्हणून गौरविले होते. त्यावरून त्याच्या उपयुक्ततेची कल्पना तुम्हाला येईल.

काहीही कशालाही चिकटवा.

ही लिंक फार गंमतीदार आहे. तिचं नाव आहे www.thistothat.com . आता हे धीक टू दॅट नेमकं काय आहे हे सांगायला हवं. धीसच्या बाजूला सिरॅमिक, फॅब्रीक, ग्लास, लेदर, मेटल, पेपर, प्लास्टीक, रबर, फोम, विनायल आणि लाकूड एवढ्या गोष्टी आहेत. दॅटच्या बाजूलाही ह्या सर्व गोष्टी आहेत. मग धीक टू दॅट म्हणजे काय? उत्तर सोपं आहे. काहीही कशालाही चिकटवा. Let's glue. म्हणजे काचेला लाकूड चिकटवा, किंवा रबराला धातू चिकटवा, किंवा प्लास्टीकला फॅब्रीक चिकटवा. काहीही कशालाही कसं चिकटवायचं हे thistothat.com आपल्याला सांगते. त्यासाठी कोणते विशिष्ट गोंद किंवा रसायनं वगैरे उपलब्ध आहेत, त्यांना काय म्हणतात वगैरे माहिती तिथे मिळते. मुद्दाम पहावी आणि लक्षात ठेवावी अशी ही साईट.

१७५ प्रकारच्या घरगुती दुरूस्त्या

www.fixitclub.com/ तर चांगलीच कामाची आहे. एकूण १७५ प्रकारच्या घरगुती दुरूस्त्या तिथे शिकवल्या आहेत. त्यात तुमच्या डीव्हीडी प्लेअर रिपेअरपासून ते इलेक्ट्रीक ओव्हन रिपेअरपर्यंत बरंच काही आहे. यात वस्तूची दुरूस्ती करताना नेमकी कशी करावी हे सांगताना अनेक छायाचित्रे देऊन दाखविलेलं असल्याने नेमकी कृती समजण्यास सोपी जाते.

१०१ नवे उपयोग

आपल्या दैनंदिन जीवनातल्या साध्या साध्या गोष्टींचा नवा उपयोग सांगणारी. इंटरनेटवर अनेक ब्लॉग्जनी ह्या लिंकचा उल्लेख केल्याने ही लिंक चांगली लोकप्रिय झाली आहे. http://www.realsimple.com/work-life/101-new-uses-for-everyday-things-10000001030084/index.htmll . हा लिंकचा पत्ता लांबीला थोडा मोठा असला तरी तेथील माहिती फार उपयुक्त आहे. लिंबू, वर्तमानपत्र, कॉफी फिल्टर, ऑलिव्ह ऑईल, बेकींग सोडा, व्हिनेगार, वेलक्रो, खाण्याचं मीठ वगैरेंचे एकूण १०१ नवे उपयोग ह्या साईटने सांगितले आहेत. मूळात realsimple.com ही साईट life made easier ह्या ब्रीदवाक्याने चालत असते. त्यांनी सांगितलेले १०१ नवे उपयोग गंमतीदार आहेत. उदाहरणार्थ भरपूर मीठ घातलेलं गरम पाणी ड्रेनेजमध्ये ओतल्यास चोक-अप झालेले ड्रेनेज मोकळे होते. किंवा, दाढीचे क्रीम संपले असेल तर त्याजागी ऑलिव्ह ऑईल वापरल्यास दाढी उत्तम होते. व्हिनेगारचे दोन तीन चमचे पाण्यात टाकून त्या पाण्यातून स्वेटर वगैरे सारखे कपडे काढल्यास ते अधिक मऊसार होतात. वगैरे वगैरे. ह्या १०१ उपयोगांवर नजर टाकून त्यातले काही आपल्या कामी येतात का हे पहायला हरकत नाही.

www.myproductadvisor.com

www.myproductadvisor.com ही. एखादी वस्तू जेव्हा मला विकत घ्यायची असते तेव्हा दुकानात वा मॉलमध्ये जाण्यापूर्वी माझे ज्ञान वाढवणारी ही साईट आहे. समजा मला मोबाईल फोन विकत घ्यायचा आहे. तर मी Phone वर क्लीक करायचं. ही साईट मग मला वेगवेगळे प्रश्न विचारते. म्हणजे, त्या फोनमध्ये तुला कॅमेरा हवा आहे का? त्यातून ईमेल वगैरे पाठवायची आहे का? इंटरनेट हवं आहे का? किती किंमतीपर्यंत ती वस्तू घ्यायची आहे? एखादा विशिष्ट ब्रॅंड किंवा कंपनी डोळ्यासमोर आहे का? तुमचं वय किती आहे? वगैरे वगैरे. तुम्ही सर्वच प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत असं नाही. पण जेवढ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्याल त्यावर आधारित तुम्हाला हव्या त्या बजेटची, किंमतीची, कंपनीची, लाईफस्टाईलची वस्तू ही साईट तुम्हाला सुचवते. यातली किंमत अर्थातच अमेरिकन डॉलरची असते. पण आपण त्याचे रूपांतर रूपयात करून घ्यायचे, आणि नंतर हवा तो बोध त्यातून घ्यायचा. एखादी उपयुक्त टीप ह्या साईटने आपल्याला दिली तरी खूप झालं. शिवाय ही साईट रूपयात हिशोब देत नाही म्हणून एखाद्या भारतीय तरूणाला अशी वेबसाईट उभी करण्याची प्रेरणा मिळाली तर फारच उत्तम. त्यासाठी देखील ह्या साईटकडे लक्ष वेधणं गरजेच होतच.

युजर गाईडसचा संग्रह

सध्याचा काळ असा आहे की आपलं घर असो की आपलं कार्यालय, घरात इलेक्ट्रॉनिक आणि वीजेवर चालणार्‍या वस्तूंची रेलचेल असते. टीव्हीपासून ते म्युझिक सिस्टमपर्यंत, आणि स्वयंपाकघरातल्या मिक्सर पासून ते वॉशिंग मशीनपर्यंत अनेक गोष्टी असतात. मोबाईल तर प्रत्येकाच्याच खिशात असतो. खेरीज कॅलक्युलेटर्स, आपल्या संगणकाच्या माऊसपासून ते फॅक्स मशीनपर्यंत अनेक गोष्टी असतात. जेव्हा ह्या वस्तू नव्याने आपल्या घरात येतात, तेव्हा आपलं लक्ष त्या वस्तूकडे असतं. चकचकीत नव्या रूपातली ती देखणी वस्तू आपण कधी एकदा हाताळतोय, वापरायला सुरूवात करतोय इकडे सारं ध्यान एकवटलेलं असतं. पुढे कधीतरी ती वस्तू जुनी होते. अचानक बिघडते. ह्या टप्प्यावर मग आपल्याला आठवण होते ती त्या वस्तूच्या मॅन्युअलची किंवा युजर गाईडची. त्या युजर गाईडमध्ये बिघाड कसा दूर करावा याच्या टीप्स दिलेल्या असतात, आणि त्याच आपल्याला हव्या असतात. ट्रबल शुटींग ह्या शीर्षकाखाली ते तंत्र आणि मंत्र कधीतरी पाहिलेले आपल्याला आठवत असतात. पण झालेलं असं असतं, की बाकी सर्व आठवत असून ते मॅन्युअल किंवा युजर गाईड कुठे ठेवलय हे काही आठवत नसतं. कपाटं, ड्रावर्स, बॅगा, फाईल्स वगैरे धुंडाळून आपण शेवटी हरतो. ते मॅन्युअल काही हाती लागत नसतं, आणि त्यावाचून तर सारं अडलेलं असतं. मंडळी, अशा परिस्थितीत हमखास कामी येणारी वेबसाईट म्हणजे www.safemanuals.com . ह्या साईटवर सर्व प्रकारच्या युजर गाईडसचा संग्रह उपलब्ध आहे. एकूण ८८३५४२ एवढी युजर गाईडस तिथे उपलब्ध आहेत असा त्या साईटचा दावा आहे. ही युजर गाईडस पहाण्यासाठी आजपर्यंत ४,५७,००० पेक्षा जास्त जणांनी तिथे मेंबरशीप घेतली आहे. आपली वस्तू ज्या कंपनीची आहे त्या कंपनीनुसार किंवा वस्तूच्या प्रकारानुसार (डिजिटल कॅमेरा, लेझर प्रिंटर वगैरे) किंवा एकूणच हवा तसा सर्च करून युजर गाईड शोधण्याची सोय ह्या साईटवर आहे. ह्या साईटचे नाव आपल्या संग्रहात हवे. कधी तिची गरज लागेल हे सांगणं अवघड.

माध्यम इंटरनेट

पत्रकारिता, जाहिरात आणि जनसंपर्काशी संबंधित चर्चा किंवा अभ्यासक्रम असला की त्याची सुरूवात हमखास उपलब्ध माध्यमांच्या प्रस्तावनेने होते. छापिल माध्यम अर्थात प्रेस वा प्रिंट मिडीया, मग रेडिओ, त्यानंतर दूरदर्शन, आणि पुढे अगदी चित्रपटापर्यंतच्या विविध माध्यमांचा उल्लेख त्या प्रस्तावनेत अपरिहार्यपणे होतो. वृत्तपत्रांचा जनमानसावरील प्रभाव, दूरदर्शनच्या प्रभावातून उद्भवलेले परिणाम वगैरे विषय अगदी शाळकरी प्रश्नपत्रिकेत सुद्धा निबंध लिहीण्याचे विषय म्हणून डोकावताना दिसतात. बातम्यांची माध्यमं म्हणून वृत्तपत्रे आणि दूरदर्शन पटकन आपल्या डोळ्यासमोर येतात. ह्या व अशासारख्या चर्चेच्या ओघात 'मेरा नंबर कब आयेगा' म्हणत हमखास दरवाजाबाहेर ताटकळत असतं ते इंटरनेट.
इंटरनेट हे माध्यम? 
खरं तर वृत्तपत्र काय किंवा दुरदर्शनची एखादी वाहिनी म्हणजे चॅनल काय, त्यांच्या प्रसारणाला मूळातच भौगोलिक मर्यादा असते. देशातले अगदी सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र घेतले तरी ते जगातल्या प्रत्येक कानाकोपर्‍यात पोहोचू शकत नाही. ही व्यावहारिक मर्यादा जगातले प्रत्येक वृत्तपत्र मान्य करते. ह्याच मर्यादेवरचा एक उपाय म्हणून इंटरनेटवर वृत्तपत्रांच्या वेबसाईटस आपल्याला अपरिहार्यपणे दिसतात. वॉशिंग्टन पोस्ट किंवा न्युयॉर्क टाईम्स सारखं वृत्तपत्र मुंबई, पुणे गोव्यातल्या प्रत्येक इंग्रजी वाचकापर्यंत पोहोचणं जसं शक्य नसतं, तसच भारताचा टाईम्स ऑफ इंडिया किंवा लोकसत्ता वा गोमांतक न्यु जर्सीतल्या प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचणं अशक्य असतं. जगात कुठेही एखादं विशिष्ट वृत्तपत्र हाती पडलं नाही तरी त्या वृत्तपत्राची वेबसाईट त्या वाचकाची वाचनाची भूक भागवू शकते. म्हणजे, खरं तर इंटरनेट भौगोलिक दृष्ट्या वृत्तपत्राच्या एक पाऊल पुढेच असतं. वृत्तपत्राची ती मर्यादा त्याला कधीच अडवत नाही.
जो प्रकार वृत्तपत्रांच्या बाबतीत तोच दुरदर्शनच्या बाबतीतही आहेच. आजकल किंवा स्टार माझा वा मी मराठी सारख्या वाहिन्या जगभर दिसत नसल्या तरी इंटरनेटवरून त्यांचे प्रसारण जगाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचू शकते. दुरदर्शन वाहिन्यांना भौगोलिक मर्यादेबरोबर काळाची मर्यादाही असते. कालची बातमी पहायची तर एक दिवस अगोदरचा पेपर आपण रद्दीतून काढून पाहू शकतो. मात्र कालची बातमी आज पाहण्याची सोय दूरदर्शनवर नसते. कालची बातमी रेकॉर्डरवर रेकॉर्ड केलेली नसेल तर ती उपलब्ध होणं दुरापास्त आणि काही वेळा अशक्यच असतं. इंटरनेटवर ह्या उलट परिस्थिती असते. न्युयॉर्क टाईम्सच्या वेबसाईटवर आज १८५१ सालापासून ते आजतागायत म्हणजे २००८ सालापर्यंत प्रकाशित झालेल्या बातम्या तुम्ही पाहू शकता. थोडक्यात, काळ, वेळ आणि प्रदेशाच्या मर्यादा ओलांडून संपूर्ण पृथ्वीतल व्यापून राहिलेले आजचे इंटरनेट हे माध्यम, प्रेस आणि टीव्ही सारखे स्वतंत्र माध्यम मानायलाच हवे.
३१ ऑगस्ट १९२० रोजी अमेरिकेत डेट्रॉइट (मिशिगन) येथे जगातले रेडिओवरचे पहिले बातमीपत्र प्रसारित केले गेले. भारतात रेडिओची खरी सुरूवात १९३६ साली झाली. १९२० ते १९३६ हा काळ १६ वर्षांचा आहे. १९३६ ते १९४७ ह्या काळात भारतात केवळ ८ आकाशवाणी केंद्रे सुरू झाली होती. म्हणजेच रेडिओ माध्यमाचा प्रसार आपल्या देशात कुर्मगतीने झाला. इंटरनेट मात्र आज अतिशय सुसाट वेगाने भारतात पसरत आहे, आणि जगात होणारी प्रत्येक तांत्रिक प्रगती आपल्यामध्ये सामावून घेत आहे. १९२० किंवा त्या लगतचा अगदी कालपर्यंतच्या काळात ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना कल्पनेतही आलेली नव्हती. आता ती भारतासह सर्वच राष्ट्रांमध्ये कमीअधिक झपाट्याने रूजते आहे. ह्या ग्लोबल व्हिलेजमध्ये एका गल्लीतला विकास दुसर्‍या गल्लीत व्हायला पूर्वीसारखा दशका दशकांचा वेळ लागत नाही. इंटरनेट हे भारतामध्ये १९९४-९५ मध्ये शहरी लोकांच्या घरात पोहोचले. पुढल्या दहा वर्षांत ते खेड्यापाड्यातही पोहोचले. आपल्याकडील इंटरनेटचा प्रसार हा वायर आणि तारांच्या तांत्रिकतेमध्ये अडलेला नाही. तो आपल्याकडील शिक्षणाच्या धीम्या गतीमुळे व ग्रामीण भागातील इंग्रजी भाषेच्या आकलनाच्या मर्यादांमुळे धीम्या गतीने होतो आहे.
सुपर माध्यमाची बीजे 
छापलेले वृत्तपत्र हे कितीही गुळगुळीत आर्टपेपरवर छापलेले असले आणि डोळे दिपवणार्‍या बहुरंगी छायाचित्रांनी नटलेले असले तरी ते मुके असते. दुसरीकडे दुरदर्शन अगदी जिवंत दृश्य पहात आहोत एवढे प्रेक्षणीय असले तरी ती तशा दृश्यांची एक क्रमवारीने येणारी मालिका असते. न्युज अॅट टेन म्हणून बरोबर दहा वाजता सुरू झालेले दुरदर्शनवरचे वार्तापत्र काही मिनिटांनी पुढे गेले की ते मागे आणता येणे शक्य नसते. चुकलेली बातमी पुन्हा पंधरा मिनिटांनी वा अर्ध्या तासांनी जेव्हा पुन्हा दाखवली जाते तेव्हाच त्या दृश्यांचे दर्शन होते. दुरदर्शन संचावर अग्रलेख वाचता येत नाही, आणि घटना प्रत्यक्ष घडताना वृत्तपत्रात पहाता येत नाही. ह्या दोन्ही माध्यमांच्या त्या मर्यादा इंटरनेटच्या वेबसाईटला अडवू शकत नाहीत. वेबसाईटवर अग्रलेखही वाचता येतो आणि तीन मिनिटांपूर्वी दाखवले गेलेले दृश्य माऊसने एकदा क्लीक केलं की काही क्षणात डाऊनलोड होऊन समोर उलगडू लागते. म्हणजेच छापिल वृत्तपत्र आणि दुरदर्शन दोन्हींचे गुण एकत्र करणारे, व दोन्हींमधील दोषांना मागे सारून पुढे जाणारे माध्यम म्हणून इंटरनेट एकूण शर्यतीत पुढे येताना दिसते.
इंटरनेट प्रेस वा टीव्ही माध्यमांच्या दोषांवर उपाय देत पुढे सरसावते म्हणून त्याला कोणी सुपर माध्यम म्हणेल असे मात्र नाही. इंटरनेट उद्याच्या सुपर माध्यमाच्या दिशेने निश्चित वाटचाल करू शकेल असा एक महत्वाचा गुण त्यात आहे, तो गुण म्हणजे त्याची इंटरॅक्टीव्हीटी. वाचकांच्या प्रतिक्रिया वृत्तपत्रे वा दुरदर्शनकडे जाण्यासाठी काही काळ जावा लागतो. वाचक कागदावर काहीतरी लिहील, तो कागद पोस्टाने वा फॅक्सने वृत्तपत्राकडे किंवा दुरदर्शनकडे पाठवील. त्यानंतर त्या वाचकाची ती प्रतिक्रिया जगापुढे येईल. वृत्तपत्र अशी किती पत्रे छापू शकेल, किंवा दुरदर्शन अशा किती पत्रांचा उल्लेख करू शकेल याला अनुक्रमे वृत्तपत्रातील जागा व दुरदर्शनवरील वेळेच्या मर्यादा आहेत. इंटरनेटवर बसलेला वाचक मात्र काही क्षणात कोणताही कागद न घेता, पोस्ट वा फॅक्सच्या नादी न लागता चटकन आपली प्रतिक्रिया (Comment) वेबसाईटवर नोंदवू शकेल. अशा असंख्य प्रतिक्रिया आल्या तरी त्यांना तिथे जागा कमी पडणार नाही, आणि कोणत्याही वेळी, कोणत्याही दिवशी कोणालाही कुठेही त्या प्रतिक्रिया वाचता येतील. वाचकांच्या प्रतिक्रियांना काही क्षणात उत्तर देणे हेही लेखकाला अशक्य नाही. वाचक वा दर्शक आणि इंटरनेटचे माध्यम यातली ही थेट संवादाची सोय इंटरनेटला सुपर माध्यमाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे.
भाषेच्या मर्यादाही मागे पडत आहेत.. 
इंटरनेट म्हंटलं की इंग्रजी अपरिहार्य आहे, आणि त्यामुळेच भारतासारख्या देशात त्यावर मर्यादा पडतील असं काल-परवापर्यंत वाटत होतं. मात्र हिंदी, मराठी किंवा अगदी बंगाली, तामिळ, तेलुगू सारख्या भाषांचे युनिकोड फाँटस उपलब्ध झाल्याने आज अक्षरशः हजारो वेबसाईटस आणि ब्लॉग्ज भारतीय भाषांतून सहजपणे तयार होताना दिसू लागले आहेत. मध्यंतरी जया बच्चन यांनी 'हम युपीवाले है, हम हिंदी में बोलेंगे' हे उदगार काढले आणि त्यावर गदारोळ उठला. ह्या प्रकरणात स्वतः अमिताभ बच्चनला काय म्हणायचय याबद्दल सर्वांनाच कुतूहल होते. अमिताभला जे म्हणायचे होते, ते अमिताभने भारताबाहेर असताना आपल्या ब्लॉगवर लिहीले. हा ब्लॉग अमिताभचा अधिकृत ब्लॉग असल्याने तो विश्वासार्ह होता. अमिताभ वृत्तपत्रांना वा वाहिन्यांना मुलाखतीसाठी उपलब्ध होऊ शकला नाही, तरी ब्लॉगवरील त्याच्या स्वगतावरून सर्व वृत्तपत्रांनी व वाहिन्यांनी सविस्तर बातम्या दिल्या. जगभरात अक्षरशः लाखो लोकांनी तो ब्लॉग वाचला. आपल्या हजारो प्रतिक्रिया त्यावर नोंदवल्या. अमिताभचा हा ब्लॉग इंग्रजीत होता. मात्र ज्यांना चांगले इंग्रजी येत नाही, असे महत्वाचे पुढारी वा तत्सम महत्वाच्या व्यक्तींना आज हिंदी, मराठी वा तत्सम भाषेत आपला ब्लॉग तयार करणे आज शक्य आहे. इंटरनेटने इंग्रजी भाषेचा अडथळा मागे टाकला आहे ही बाब भारतासारख्या बहुभाषी देशाच्या दृष्टीने खरोखरीच क्रांतीकारक आहे.
इंटरनेटच्या बाबतीत डिजिटल डिव्हाईड च्या मुद्याबद्दल नेहमीच चर्चा होते. १९९५ साली भारतात आलेले इंटरनेट २००८ साली दुरदर्शनसारखे घराघरात गेलेले असेल असा दावा किंवा अपेक्षा कोणीच करणार नाही. त्यातही त्यातील भाषेचा वापर हा आजच्या पेक्षाही अधिक सुलभ होण्याची गरज आहे. भारतीय भाषांच्या युनिकोड तंत्राची प्रगती आजही पुढे सरकते आहे. २०१० सालापर्यंत तिला पुर्णत्व येईल अशी आशा बाळगली जात आहे.
सर्वसामान्यांची पत्रकारिता 
वृत्तपत्रांतील वाचकांची पत्रे हा नेहमीच एक महत्वाचा भाग मानला जातो. कित्येकदा जेथे बातमीदार पोहोचत नाही अशा एखाद्या मुद्यापर्यंत एखादा वाचक पोहोचलेला असतो. तो पत्र लिहून ती बाब वृत्तपत्राला कळवतो तेव्हा आश्चर्याचे धक्के बसतात, आणि चक्रे वेगाने फिरतात. अशी उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. आता ह्या वाचकांच्या पत्राच्या पुढे नेणारी सर्वसामान्यांची पत्रकारिता किंवा सिटीझन्स जर्नालिझम जगभरात बहरताना दिसतो आहे. माध्यमांच्या दृष्टीने म्हंटले तर एकीकडे हे आव्हान आहे, तर दुसरीकडे ते एक वरदानही आहे. ज्या वृत्तपत्राकडे सिटीझन जर्नालिझमची जास्तीत जास्त शक्ती असेल, वा ज्या वाहिनीकडे जास्तीत जास्त संख्येने नागरिकांकडून प्रत्यक्ष घेतलेल्या व्हिडिओ क्लीप्स येत असतील अशा वाहिनींची ताकद इतरांपेक्षा अधिक असणार आहे. प्रगत होत चाललेले तंत्रज्ञान एकीकडे सोपे आणि दुसरीकडे किंमतीला अतिशय स्वस्त व परवडण्याजोगे असल्यानेच सिटीझन जर्नालिझमचा प्रवाह दुथडी भरून वाहू लागणार आहे. शे दोनशेला मिळणारा डिजिटल कॅमेरा शेकडो छायाचित्रे घेऊ शकेल व त्यातली अनेक छायाचित्रे इंटरनेटवरून अपलोड होऊन क्षणार्धात वृत्तपत्रे व वाहिन्यांकडे पोहोचू शकतील. हाच प्रकार काही फरकाने व्हिडिओ कॅमेर्‍यांच्या बाबतीतही होणार आहे.
खर्‍या अर्थाने मल्टीमिडिया 
सर्वसामान्यांची पत्रकारिता हे खरं तर उद्याचे एक स्वतंत्र माध्यम म्हणून उभं राहण्याची शक्यता आहे. आजचे ब्लॉग्ज हे त्याच दृष्टीने वाटचाल करीत आहेत. वृत्तपत्रे व वाहिन्या देऊ शकणार नाहीत एवढा मजकूर, चित्रे, छायाचित्रे, विचार असा समृद्ध ज्ञानखजिना ब्लॉगचे माध्यम जगापुढे ठेवत जाणार आहे. इंटरनेटच्या पोटात अशा प्रकारची छोटी मोठी माध्यमं नांदत राहणार आहेत. त्यांचा थेट परिणाम आज ज्यांना आपण माध्यमं म्हणतो त्यावर होत जाणार आहे. प्रगत राष्ट्रांतील कित्येक दैनिक वृत्तपत्रांमध्ये आज दररोज वैशिष्ट्यपूर्ण वेबसाईटस व ब्लॉग्जची माहिती वाचकांना दिली जात असते. भाषिक वृत्तपत्रे त्या दृष्टीने आज मागे दिसतात. पण उद्या त्यांना हा भाग ठळकपणे द्यावाच लागणार आहे.
इंटरनेटच्या मर्यादा आणि उद्या 
इंटरनेटचं ताकदवान माध्यम कोणत्याही मर्यादांविना उभं आहे असं चित्र मला इथे रंगवायचं नाही. हे मुद्दे निघाले की हमखास समोरून प्रश्न येतो, की आम्ही बसमध्ये वा रेल्वेगाडीत बसून वृत्तपत्र वाचत जातो. इंटरनेटचं तसं कुठे करता येतं? आरामखुर्चीत बसून इंटरनेटवरचा पेपर कुठे वाचता येतो? किंवा प्रकाशमान संगणकी स्क्रीनवरचं एक पान वाचलं की डोळ्यातून पाणी येऊ लागतं. ह्या इंटरनेटच्या आजच्या काही मर्यादा जरूर आहेत. मोबाईल फोनवर इंटरनेट दिसतं, ते कुठेही पहाता येतं असं मी म्हणणार नाही. कारण त्यात तर प्रचंड मर्यादा आहेत. पण एक लक्षात घ्यायला हवं की गरज ही शोधाची जननी असते. शास्त्रज्ञांचे आजचे प्रयत्न ई इंक आणि ई पेपर च्या दिशेने चालले आहेत. झेरॉक्स, मोटोरोला सारख्या कंपन्या गेली काही वर्षे अब्जावधी रूपये खर्च करून संशोधन करीत आहेत. ई पेपर २०१५ च्या आसपास प्रत्यक्षात येईल अशी चर्चा तज्ज्ञ आणि माहीतगार मंडळी करीत आहेत. ई पेपर असेल आपल्या रोजच्या पेपर सारखाच. संपूर्ण आकाराचा. उदबत्तीचा गोल आकाराचा सुरनळीसारखा बॉक्स असेल तशी सुरनळी ह्या पेपरची होईल. ती तुम्ही जवळ ठेवायची. दर पाच दहा मिनिटांनी त्यातला मजकूर व छायाचित्रे बदलत असतील. तुम्हाला वेळ मिळाला की पेपरची ती सुरनळी सरळ करायची. आलेली ताजी बातमी पहायची. सुरनळी परत ठेवून द्यायची. जे दैनिक हवे त्याची वर्गणी भरलेली असली की त्यावर त्या बातम्या आपोआप उमटत राहणार. ई इंक चे अतिसुक्ष्म कण त्या ई पेपरवर आपोआप इकडे तिकडे होऊन नवनवी अक्षरे, मथळे, छायाचित्रे रिमोट पद्धतीने त्यावर उमटणार. बातमीदार तसच काम करत असणार. अग्रलेख तसेच येत राहतील. लेख तसेच असतील. फक्त पेपर आणि इंक बदलेल.
आज हा सारा प्रकार वाचताना स्वप्नवत आणि अशक्यप्राय वाटतोय. ते स्वाभाविक आहे. पण हे स्वप्न सत्याकडे वाटचाल करत हे देखील वास्तव आहे. ह्या दृष्टीने चाललेले अनेक प्रयोग यशस्वी होत आहेत. विज्ञानाची झेप मानवी मेंदूच्या पलिकडची असते. फॅक्स किंवा दुरदर्शनची कल्पना अठराव्या -एकोणीसाव्या शतकात अशक्यप्रायच वाटली होती. पण विसाव्या शतकात ते वास्तवात आलं. आपण माध्यमांची चर्चा आज करतोय ती आजचे संदर्भ डोक्यात घेऊन. उद्याचे प्रगत संदर्भ डोक्यात घेतले की वाटतं आपला ई पेपर उघडला की पहिल्या पानावर आलेली ताजी बातमी त्यावरची व्हिडिओ क्लीप पहात आपल्याला वाचता येईल. अशा वेळी प्रेस मिडीया विरूद्ध टीव्ही मिडीया अशी विसाव्या शतकात झालेली ऐतिहासिक चर्चा ऐकून हंसू आल्याशिवाय राहणार नाही.
एक मात्र नक्की, की माध्यमांचे दृश्य बदलले तरी त्याचा आत्मा बदलणं विज्ञानाच्या ताकदीबाहेरचं आहे. माणसाची चाल पायावरच राहणार आहे. आजचा कागदी पेपर असो की उद्याचा ई पेपर माणसाची चाल पायांनी आणि विचार डोक्यातूनच येत राहणार आहे. ई पेपर आल्याने माध्यमांच्या भूमिकेत मोठा बदल संभवतो अशी चर्चा मात्र जगभर कुठेही चाललेली दिसत नाही.

बहुगुणी गुगल कॅलेंडर

गुगल आणि जीमेलच्या सेवेशी आपण एव्हाना चांगले रूळलो आहोत. जीमेलमध्ये युनिकोडचे मराठी फाँट वापरून मराठी ईमेल पाठवता येते याचे प्रयोगही आपण बहुतेकांनी केलेले आहेत. आपण जेव्हा आपलं जीमेल अकाऊंट उघडतो तेव्हा त्या अकाऊंटच्या पोटात इतरही अनेक मोफत सेवा साठलेल्या आहेत याची कल्पना असूनही आपण त्यांच्या वाटेला फारसे गेलेलो नसतो. जीमेल अकाऊंट उघडून आपल्याला आलेल्या ईमेल पाहून झाल्या, किंवा फार तर पाठवायच्या ईमेल पाठवून झाल्या की आपण लॉगआऊट करून बाहेर पडतो. गुगलच्या सेवांपैकी फक्त जीमेल वापरणे आणि इतरांकडे फारसे न पाहणे म्हणजे आपल्या टीव्हीवर फक्त एकच चॅनेल बारा महिने पहात राहण्यासारखं आहे. आपल्या टीव्हीवर इतरही वेगवेगळ्या प्रकारचे चांगले-बरे-सोसो वगैरे वर्गीकरणात जाऊ शकणारे शेकडो चॅनेल्स असतात. ते न पहाता फक्त एकच चॅनेल पाहण्यात ज्या प्रकारचा तोटा आहे तोच तोटा आपण गुगलच्या अन्य सेवांचा लाभ न घेण्यात आहे.
गुगलच्या अनेक सेवांपैकी गुगल कॅलेंडर ह्या मोफत सेवेबद्दल मला आज खास करून बोलायचं आहे. ज्या मंडळींनी हे कॅलेंडर आजपर्यंत वापरलच नाही त्यांनी हा लेख वाचून ते वापरणं सुरू केलं तर एका कायम व उत्तम सुविधेचा अनुभव त्यांना येईल. इतर अनेक सेवांतून मी गुगल कॅलेंडर निवडलं याचं कारण हे कॅलेंडर आणि आपला मोबाईल फोन यांची अतिशय उपयुक्त सांगड आपल्याला घालता येते. उदाहरणार्थ पहा. रामरावांना डॉक्टरांनी त्यांचं दुपारचं आणि रात्रीचं जेवण वेळेवर घेण्याचा सल्ला दिला आहे. प्रकृतीला महत्व असल्याने रामरावांनीही दुपारी ठीक एक वाजता आणि रात्री ठीक आठ वाजता जेवायचच असा निश्चय केला आहे. रामराव तसे दिवसभर कामात गढलेले असतात. व्हिजिटर्स, मिटींग्ज, पत्रलेखन, ऑफिसच्या कामाचं वाचन यात पहिल्या दिवशी दुपारचे दोन कधी वाजले हे रामरावांना कळलच नाही. एक तास उशीर झाल्याने रामराव मनातल्या मनात चरफडले. कुणीतरी आपल्याला ठीक एक वाजता आठवण करायला हवी, आपण निदान मोबाईलवर अलार्म तरी लावायला हवा असं त्यांना वाटलं. पण पुढल्या काही दिवसांतही वेगवेगळ्या तर्‍हा होत राहिल्या. कधी ते अलार्म लावायलाच विसरायचे, कधी अलार्म लावलेल्या वेळी मोबाईल सायलेंट मोडवर असल्याने अलार्म कधी होऊन गेला हे कळायचं नाही. पुढे रामरावांची ती समस्या सुटली गुगल कॅलेंडरमुळे. रामरावांना ठीक बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी लंच घेण्याची आठवण करणारा एक एस.एम.एस. गुगल कंपनीतर्फे मिळू लागला. दररोज न चुकता त्या ठरलेल्या वेळेला तो एस.एम. एस. येणार याची रामरावांना सवयच झाली. रामराव एव्हढे बेशिस्त की केवळ एका एस.एम.एस. ला ते दाद देईनात. तो एस.एम.एस. यायचा. ते तो पहायचे. पुन्हा जेवण वेळेवर घेण्याचं विसरून जायचे. यावर त्यांनी रिरिमाईंडरचा उपाय शोधला. त्यानुसार त्यांना पहिला एस.एम.एस. बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी, दुसरा ठीक एक वाजता आणि तिसरा एक वाजून तीन मिनिटांनी मिळू लागला. हा उपाय मात्र बराचसा लागू पडला. तीन तीन वेळा त्यांच्या मोबाईलवर एस.एम.एस. आल्याने ते वेळेवर जेऊ लागले. ते तिन्ही एस.एम.एस. आता त्यांनी तीन महिन्यांसाठी कायम लावून ठेवून दिले आहेत. दररोज अलार्म लावण्याची कटकटही आता त्यांना नाही.
रामरावांनी हे आठवण करून देणारे एस.एम.एस. लावले ते गुगल कॅलेंडरवर. दिवसभरात ते असेच चहाच्या वेळेचे, ऑफिसमधून बाहेर पडण्याचे, एवढेच कशाला कुणाच्या वाढदिवसाचे, कुठल्या ठरलेल्या कार्यक्रमाचे, भेटीगाठींचे एस.एम.एस. वर्षभरासाठी लावून ठेवत असतात. हे एस.एम.एस. देखील ते तीन तीन वेळा रिरिमाईंडर पद्धतीने लावत असतात. त्यामुळे त्यांचा मोबाईल आता स्वस्थ नसतो. सारखा तो काही ना काही गोष्टींची आठवण करून देतच असतो. रामराव त्याप्रमाणे आपलं आयुष्य शिस्तबद्ध राखण्यात यशस्वीही होत असतात. आज तरी गुगल कॅलेंडरवर ही सेवा मोफत आहे. पुढेही ती मोफतच राहील असा विश्वास अनेकांना वाटतो आहे. रामरावांचं हे उदाहरण ऐकल्यावर काहींना प्रश्न पडेल की हे एस.एम.एस. रिमाईंडर भारतीय मोबाईल फोन्सवर लावता येतात का? ते आल्याबद्दल काही चार्ज आपल्याला द्यावा लागतो का? ह्या दोन प्रश्नांची उत्तरे प्रथम देतो आणि नंतर त्याच्या तंत्राकडे वळतो. पहिली गोष्ट म्हणजे गुगल कॅलेंडरची ही सेवा मोफत आहे. म्हणजे ह्या सेवेबद्दल गुगल कोणताही उघड वा हिडन चार्ज लावत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मोबाईल कंपन्याही येणार्‍या एस.एम.एस. साठी कोणताही चार्ज लावत नाही. म्हणजेच आपल्याला गुगल कॅलेंडरवरून कितीही एस.एम.एस. आले तरी आपल्या खिशाला कसलीही चाट पडत नाही.
गुगल कॅलेंडरवरून आठवणींचे मोठे मोठे एस.एम.एस. पाठवणं शक्य असतं. म्हणजे उदाहरणार्थ, समजा २१ नोव्हेंबर २००८ रोजी तुमच्या अमुक तमुक मित्राचे लग्न पुण्यात आहे. तुम्ही आज सप्टेंबर २००८ मध्ये ( किंवा अगदी वर्ष दोन वर्ष अगोदर सुद्धा) तो एस.एम.एस. प्रोग्राम करू शकता. त्या एस.एम.एस. मध्ये त्या लग्नाचा तपशील, वधू-वरांची नावे, लग्नस्थळाचा पत्ता, मित्राचा व लग्नस्थळाचा दूरध्वनी क्रमांक, मुहुर्ताची वेळ असं सारं काही सप्टेंबरमध्ये टाकून ठेवलत आणि तो एस.एम.एस. तुम्हाला २० नोव्हेंबर २००८ रोजी सकाळी ९ वाजता मिळावा असं गुगल कॅलेंडरमध्ये प्रोग्राम करून ठेवलत की तुम्ही सगळं विसरायला मोकळे. बरं, हे सारं करणं अगदी सोपं. आपल्या संगणकावर जीमेल पहात असताना आपल्या कीबोर्डचा वापर करून काय हवा तो आणि हवा तेव्हढा तपशील टाईप करून ठेवायचा. मोबाईलवर अलार्म लावायचा तर आपण किती तपशील की ईन करू शकणार याला मर्यादा असते. शिवाय मोबाईलची बटणं दाबून तो सारा तपशील टाकत बसणं किती जिकीरीचं असेल याचा विचार तुम्हीच करा. त्यापुढे गुगल कॅलेंडरची ही एस.एम.एस. रिमाईंडर्स खूपच सोपी आणि सुलभ वाटतात.
कॅलेंडर म्हंटलं की आपल्याला अपुरी जागा, तो तारखेचा इंचभर चौकोन असं काहीतरी डोळ्यासमोर येतं. गुगल कॅलेंडरचं तसं नाही. तुम्ही आफिसचं कॅलेंडर वेगळं, व्यक्तीगत कॅलेंडर वेगळं, आणखीही इतर काही खात्यांची वा प्रकल्पांची कॅलेंडर्स वेगवेगळी ठेवू शकता. ही वेगवेगळी कॅलेंडर्स वेगवेगळीही पाहू शकता, किंवा हवी तर सगळी एकदमही पाहता येतात. हा मुद्दा थोडा अधिक स्पष्ट करून सांगतो. गुगल वेगवेगळ्या कॅलेंडरसाठी वेगवेगळा रंग तुम्हाला देते. समजा ऑफिस कॅलेंडरचा रंग हिरवा असेल आणि व्यक्तीगत कॅलेंडरचा रंग लाल असेल तर हिरवं आणि लाल कॅलेंडर वेगवेगळं पाहता येणं शक्य असतं. पण समजा एका विशिष्ट तारखेला एकूणच काय स्थिती आहे हे पहायचं असेल तर तेही पहाता येतं. उदाहरण समजा १ ऑक्टोबर २००८ चं घ्या. ह्या दिवशी कोणत्या वेळी ऑफिसच्या कामाची आणि आपल्या व्यक्तीगत कार्यक्रमांची काय स्थिती आहे हे एकदम पाहता येतं. १ ऑक्टोबर २००८ ह्या दिवशी हिरव्या रंगातील आणि लाल रंगातील अपॉइंटमेंटस वा रिमाईंडर्स एकदम दिसत असल्याने नियोजन करणं अगदी सोपं असतं. ह्या सार्‍या गोष्टी एस.एम.एस. रिमाईंडर्सनी युक्त असल्यास आपण संगणकाच्या समोर नसलो तरी कोणतीही गोष्ट विसरणं शक्य नसतं.
गुगल कॅलेंडरचा पुढला महत्वाचा भाग म्हणजे तुमच्या मोबाईल फोनवर इंटरनेट चालू करून तुमच्या गुगल कॅलेंडरमध्ये तुम्ही भर घालू शकता वा त्यात बदल करू शकता. गुगल कॅलेंडरमध्ये एस.एम.एस. ची सुविधा मिळविण्यासाठी तुम्हाला विशिष्ट सेटींग (आजकाल सेटींग म्हंटलं की लोकांना सरकारी चहापाणी वगैरे वाटतं, इथे ते सेटींग नव्हे) करावं लागतं. त्यासाठी जीमेलच्या स्क्रीनवर सर्वांत वर डावीकडे असलेल्या Calendar ह्या शब्दावर क्लीक करून गुगल कॅलेंडर उघडा. मग सर्वांत वर उजवीकडे Settings ह्या शब्दावर क्लीक करा. तुम्हाला तीन प्रकारची कॅलेंडर सेटींग्ज दिसतील. त्यातील Mobile Setup वर क्लीक करा. ज्या मोबाईल फोनवर तुम्हाला एस.एम.एस. हवे असतील तो मोबाईल नंबर गुगल व्हेरीफाय करते. त्यासाठी तो मोबाईल नंबर टाईप करा. त्यानंतर Send verification code वर क्लीक करा. क्लीक केल्यानंतर काही क्षणातच गुगल तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक एस.एम.एस. पाठवेल. त्या एस.एम.एस. मध्ये एक कोड दिलेला असेल. तो कोड Settings मध्ये टाईप करायचा व नंतर Finish Setup वर क्लीक करायचं. एवढं केलत की तुमचा मोफत एस.एम.एस. मिळण्याचा मार्ग खुला झाला. आता तुमच्या कॅलेंडरमध्ये विशिष्ट तारखेला तुम्ही जे टाईप कराल त्याचा एस.एम.एस. मिळण्यासाठी Option मध्ये Reminder च्या खाली Email,Pop up आणि SMS हे जे तीन पर्याय आहेत त्यातील SMS हा पर्याय निवडा. शेवटी तळाशी असलेल्या Save ह्या बटणावर क्लीक करायला विसरू नका.
तुम्हाला तुमचे हवे तेवढे रिमाईंडर अशा प्रकारे लावता येतील. गुगल कॅलेंडरमधील ही एक महत्वाची सुविधा झाली. पण ही सुविधा म्हणजे गुगल कॅलेंडर नावाच्या मालगाडीचा एक डब्बा झाला. इतर डबे हेही अशाच प्रकारच्या महत्वाच्या सुविधा आहेत. त्यांचा वापर करून पाहिलात तर एक प्रकारचा खजिनाच हातात आल्याचा आभास तुम्हाला होईल. तो अनुभव मी घेतला आहे. तुम्हीही तो घेऊ शकता.

'क्रोमा' तुझा रंग कसा?

गणेश चतुर्थी, ३ सप्टेंबर २००८ रोजी गुगल कंपनीने आपला 'क्रोम' नावाचा नवा कोरा वेब ब्राऊझर अचानक आणि अनपेक्षितपणे बाजारात आणला. सध्या क्रोम हा बीटा आवृत्तीत आहे. ' जन्मानंतर पोराचं बारसं झालय, पण अजून पाळण्यातले पाय नीटपणे दिसायलाही लागलेले नाहीत' अशा अर्भकावस्थेत गुगलचा आजचा क्रोम ब्राऊझर आहे. क्रोमच्या स्पर्धेत मुख्यत्वे इंटरनेट एक्स्प्लोअरर, फायरफॉक्स आणि ऑपेरा हे तीन गेली कित्येक वर्षे कुस्तीचे फड गाजवणारे व पट्टीचे म्हणावे असे पैलवान आहेत. क्रोम नावाचं कुक्कुलं बाळ विरूद्ध इंटरनेट एक्स्प्लोअरर, फायरफॉक्स व ऑपेरा ह्या सामन्यात कोण जिंकणार, कोण किती तुल्यबळ आहे वगैरे चर्चा एव्हाना जगभर सुरूही झाली आहे. एवढच नव्हे तर क्रोम चा पोर्टेबल अवतार आपल्या पेन ड्राईव्हसाठी एव्हाना तयारही झाला आहे. जन्माला आलेल्या बाळाच्या दंडाची बेडकी किती फुगतेय हे पाहण्यासाठी आज जगभरचे हजारो तज्ज्ञ अक्षरशः लाखो तास आपापल्या संगणकासमोर बसून क्रोमची चांचणी घेण्यात गुंग झाले आहेत.
क्रोम हा गुगल ह्या खाजगी कंपनीचा ब्राऊझर असला तरी तो 'ओपन सोर्स' प्रकारचा (म्हणजे 'फायरफॉक्स' सारखा खुला व सार्वजनिक म्हणता येईल असा) ब्राऊझर आहे. तुमच्या आमच्यासाठी मोफत डाऊनलोडींगसाठी आज तो सहजपणे http://www.google.com/chrome येथे उपलब्ध आहे. गुगलच्या होमपेजवरही त्याची लिंक आहे. आपल्यापैकी शेकडोंनी गेल्या आठवड्यात क्रोम डाऊनलोड केलाही असेल, आणि वापरूनही पाहिला असेल. ज्यांनी तो केला नसेल त्यांनी काही नाही तरी एक गंमत म्हणून तो वापरून पहायला हवा. मात्र एक लक्षात घ्या की क्रोम हा आज फक्त विंडोज (एक्सपी व विस्टा) सिस्टम्सवरच चालेल. मॅक आणि लिनक्स साठी क्रोम अजून गर्भावस्थेत आहे. म्हणजे, मॅक व लिनक्ससाठीचा क्रोम अजून जन्माला आलेलाच नाही.
गुगल कंपनीने सर्च इंजिनपासून ते गुगल अर्थपर्यंत अनेक उत्पादने व सेवा आजपर्यंत उपलब्ध केल्या आहेत. त्यात आता त्यांना ह्या क्रोम ब्राऊझरची भर का घालावीशी वाटली याचं स्पष्टीकरण गुगलने स्वतःच अधिकृतपणे केलं आहे. त्यात गुगलवाले म्हणतात, " आम्ही ब्राऊझरमध्ये काम करण्यात आमचा जास्तीत जास्त वेळ व्यतित करीत असतो… लोक आज वेबवर ज्या गोष्टी (व कामे) करतात त्यांची कल्पनाही पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा वेब (इंटरनेट) सुरू झालं त्यावेळी कुणी केली नव्हती. आमच्या लक्षात आलं की ज्या वेब ब्राऊझरमध्ये आपण जास्तीत जास्त वेळ घालवतो त्याबद्दल अगदी मुलभूत विचार गंभीरपणे करण्याची गरज आहे. साधी वाचण्याची पानं ह्या स्वरूपात वेब सुरू झालं आणि आज ते अगदी आधुनिक अशा इंटरॅक्टीव्ह वेब अॅप्लीकेशन पर्यंत येऊन पोहोचलं आहे…" गुगलचं म्हणणं थोडक्यात असं की वेबचं जग सुरू झालं तेव्हा त्या सुरूवातीला अनुसरून असे ब्राऊझर तयार झाले. यथावकाश त्यात सुधारणा केल्या गेल्या. पण त्याचा मुलभूत गाभा हा जुनाच राहिला. त्या पार्श्वभूमीवर क्रोम हा नव्या जगाचा, नव्या मनूचा नवा दमदार अवतार आहे. त्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा आहे.
एखाद्या बंगल्याचा खुला व्हरांडा असावा तशी वेब ब्राऊझरची संगणकातली स्थिती असते. बंगल्याच्या व्हरांड्यात जसं बाहेरचं कोणीही येऊ शकतं. बसू शकतं. पोरं बाळं येऊन पकडापकडी खेळून जात असतात. तसंच, ब्राऊझरमध्ये जगभरच्या वेबसाईटस व त्यांचेशी संबंधित अप्लीकेशन्स वा लहानमोठी सॉफ्टवेअर येतात, सक्रिय होतात आणि निघून जातात. ह्याच प्रक्रियेत सुरक्षेची जोखीम असते. आजही अनेक स्पायवेअर्स, ट्रोजन्स वगैरे विघातक गँगस्टर्स आणि खतरनाक गुंड ब्राऊझर नावाच्या व्हरांड्यात वेष बदलून येतात, आणि हळूच आपल्या संगणकाच्या बंगल्यात कधी शिरतात हे आपलं आपल्यालाही कळत नाही. ब्राऊझर हा मूळात व्हरांडाच असल्याने इंटरनेट एक्स्प्लोअरर असो की फायरफॉक्स, आणि ऑपेरा असो की आणखी एखादा दुसरा ब्राऊझर असो सुरक्षेचा प्रश्न हा असतोच. व्हरांड्यात जमणारे सगळेच काही गुंड वा गँगस्टर नसतात. काही जण खरोखरीच सज्जन, विद्वान, ऋषी-मुनी असतात. ते बंगल्याला आणि व्हरांड्याला उपयुक्तही असतात. पण काही गुंड-पुंड हे सज्जनाच्या चेहेर्‍याने वा ऋषी-मुनींच्या वेषात व्हरांड्यात येतात. तेव्हा व्हरांड्याची सुरक्षा व्यवस्था उत्तम असणं गरजेचं असतं. आज मायक्रोसॉफ्टच्या इंटरनेट एक्स्प्लोअररचा आठवा अवतार उपलब्ध आहे. म्हणजे पुर्वीच्या सात अवतारांचा अनुभव इंटरनेट एक्स्प्लोअररच्या गाठीला आहे. जगातल्या शंभरातले सत्त्याण्णव लोक आजही इंटरनेट एक्स्प्लोअरर उघडून इंटरनेटवर मुशाफिरी करीत असतात. मायक्रोसॉफ्ट सारखी यंत्रणा, अनुभव मागे असतानाही आजही इंटरनेट एक्स्प्लोअरर (चा व्हरांडा) सुरक्षित नाही. तोच प्रकार कमी-अधिक फरकाने फायरफॉक्स व ऑपेराचाही आहे. थोडक्यात, वर्षो नु वर्षे जे ब्राऊझर्स विकसित होत आले आहेत, त्यांनीही अद्यापि इष्ट अशी विकासाची पातळी गाठलेली नाही. असं जर आहे, तर मग क्रोम नावाच्या त्या कुक्कुल्या बाळाचं काय? असा प्रश्न आहे. पण कृष्ण हे जसे देवकीचे बाळ होते, तसे क्रोम हे गुगलचे बाळ आहे. त्यामुळेच क्रोमभोवती एक वेगळे वलय आहे.
क्रोमचा विचार दोन पातळ्यांवर आपण करायला हवा. एक म्हणजे तुम्ही आम्ही युजर म्हणून क्रोममध्ये असे काय आहे की आपण तो वापरण्याचा विचार करावा? आज आपल्यापैकी बहुतेक जण एक तर इंटरनेट एक्स्प्लोअरर किंवा फायरफॉक्स हे ब्राऊझर वापरत आहेत. हे आपण महिने नु महिने करीत आलो आहोत. एकाएकी एका रात्री गुगलने नवा ब्राऊझर काढला म्हणून आपला नेहमीचा ब्राऊझर सोडून आपण आंधळेपणाने क्रोम वापरायला सुरूवात करायची का? पहिल्या पातळीवरचे हे दोन प्रश्न खूपच महत्वाचे आहेत. दुसरी पातळी आहे ती सुरक्षेची. हा भाग बराचसा तांत्रिक आहे. त्यात सहसा आपण डोकं घालत नाही. कारण आपली भूमिका इंटरनेट सर्फर इतकीच सरळ साधी असते. फार फार तर आपण ह्या बाबतीत अनुभवी वा तज्ज्ञांचा सल्ला अंगिकारत असतो. जरी आपल्याला सुरक्षेच्या बाबतीत खूप काही गम्य नसलं तरी क्रोमची परिस्थिती त्या बाबतीत कशी आहे? तज्ज्ञ मंडळी त्याबाबत काय म्हणताहेत? हे मुद्दे तुमच्या आमच्यासाठी महत्वाचे आहेत.
क्रोम मध्ये असं काही खास वा जास्त आहे का की कुणी सध्याचा ब्राऊझर सोडून क्रोम वापरायला लागावं. वेग व इंटरफेस (व्हरांड्याची मांडणी) ह्या बाबतीत क्रोममध्ये काही वैशिष्ट्ये आहेत एवढं नक्की. वेगाच्या बाबतीतल्या विश्वासार्ह चांचण्या अजून मोठ्या प्रमाणावर आलेल्या नसल्याने क्रोम त्या बाबतीत नेमका किती मागे वा पुढे आहे हे सांगणं थोडं जल्दबाजीचं होईल. पण एक मात्र नक्की की क्रोम हा कच्चा खिलाडू मात्र अजिबात नाही. जन्माला आल्या आल्या हनुमानाने सूर्यावर उ़डी घेतली अशी कथा आहे. क्रोमनेही आल्या आल्या इंटरनेट एक्स्प्लोअरर व ऑपेराच्या मार्केंट शेअरच्या दिशेने झेप घेतल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. फायरफॉक्सचे युजर्स हे जगात एखादा भला मोठा खंड असावा एवढ्या मोठ्या संख्येत आहेत. तिथेही चलबिचल आहे. क्रोम आज बीटा आवृ्‌त्तीत आहे. एवढ्यात त्याच्याकडे वळण्याचं कारण नाही. आगे आगे देखते है, होता है क्या असा पवित्रा बहुतेकांनी आज घेतला आहे. क्रोम चा इंटरफेस वैशिष्ट्यपूर्ण म्हणावा लागेल. मूळात गुगलचे होम पेज जसे स्वच्छ, सुटसुटीत व शुभ्र पांढरे आहे, तसाच क्रोम आहे. गडबड-गचडी तिथे अजिबात नाही. FILE, EDIT, VIEW, TOOLS वगैरे तोच तो आणि तोच तो प्रकारचा मेनू त्यात नाही. प्रथमदर्शनी आवडेल असा क्रोमचा इंटरफेस आहे. अक्षरे, चित्रे, फोटो त्यात व्यवस्थित दिसतात. वेगात इतरांच्या मानाने फार मोठी तफावत नाही (निदान पिछाडी तरी नक्कीच जाणवत नाही). गुगलचं म्हणणं असं आहे की त्यांनी सुरक्षेची फार मोठी काळजी क्रोमच्या बाबतीत घेतली आहे. एकाच वेळी ब्राऊझरमध्ये अनेक साईटस अनेक टॅब्जमध्ये उघडलेल्या असताना एखादी साईट वाईट प्रकारची असल्यास संपूर्ण ब्राऊझरच मान टाकून बंद होतो, हा अनुभव तुम्हा आम्हा सर्वांना कधी ना कधी आलेला आहे. गुगल म्हणते की हा अनुभव क्रोममध्ये येणार नाही (किंवा खूपच कमी येईल) कारण प्रत्येक टॅब हा क्रोममध्ये एक सॅन्डबॉक्स (गुगलनेच हा Sandbox शब्द वापरलाय) आहे. एक कोसळल्यास दुसरा कोसळणार नाही. खेरीज जावास्क्रीप्टच्या हाताळणीसाठी V2 हे नवे इंजिन क्रोममध्ये गुगलने वापरले असल्याने त्यावर आधारित अप्लीकेशन्स क्रोममध्ये इतरांपेक्षा फास्ट चालतील असा गुगलचा दावा आहे.
क्रोम तयार करताना गुगलने मोझीला फायरफॉक्स व अॅपलच्या सफारी ह्या दोन ब्राऊजर्समधील काही तंत्रे वापरली आहेत याची कबुली जाहीरपणे दिली आहे. खेरीज जे काही आहे ते ओपन सोर्स म्हणजे खुले आहे. खुले असल्याने तुम्हाला त्यात काही बदल करणे, अथवा क्रोमसाठी इतर उपयुक्त असे प्लगिन्स वा टूल्स बनवणे शक्य आहे. फायरफॉक्ससाठी अशी शेकडो प्लगिन्स व टूल्स बनून त्यांच्या कित्येक सुधारित आवृत्त्या आज उपलब्ध आहेत. क्रोमच्या बाबतीतही अशी शेकडो प्लगिन्स व टूल्स उद्या बनणार यात शंका नाही. क्रोमचा आजचा रंग आणि उद्याचा रंग यात झपाट्याने प्रवास होणार आहे. क्रोमचा उद्याचा म्हणजे भविष्यातला रंग नेमका कसा असेल याचा अंदाज करणं फार अवघड आहे. एक मात्र नक्की की मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट एक्स्प्लोअरर आणि गुगलचा क्रोम यांच्यात येत्या वर्षभरात एक जबरदस्त फ्री स्टाईल कुस्ती रंगणार आहे. ही कुस्ती आपण त्या दोन्ही ब्राऊझर्समध्ये पाहू शकू. देखने में क्या हर्ज है?

बहुगुणी इरफानव्यू

आपला संगणक सारं जग स्वतःमध्ये सामावून घेतो आहे. इंटरनेटची सुरूवात झाली तेव्हा त्याला फक्त अक्षरे आणि आकडेच तेवढे माहीत होते. नुसतं एकरंगी मजकूराचं इंटरनेट नीरस वाटणं हे साहजिक होतं. माणसाला जन्मतःच रंग आणि विविध आकारांचं आकर्षण असतं. इंटरनेटवर अक्षरं आणि शब्दांबरोबर चित्रे, छायाचित्रे हवीत आणि तीही रंगीत, स्पष्ट व आकर्षक हवीत हा ध्यास माणसाने घेणं हे स्वाभाविक होतं. त्यानुसार अतिशय झपाट्याने काम आणि संशोधन होत गेलं, आणि आपला संगणक रंगीत आणि सचित्र झाला. इंटरनेटही त्या पाठोपाठ चित्रमय झालं. माणूस हा समाधान मानणारा प्राणी नाही. मुकी चित्रे आणि छायाचित्रांवर तो थांबून कसा राहणार? स्टील ग्राफीक्स पाठोपाठ तो व्हिडिओच्या मागे न लागता तरच आश्चर्य होतं. माणसाने तेही साध्य केलं. संगणक आणि इंटरनेटवर आता मल्टीमिडिया पूर्णावस्थेपर्यंत पोहोचला आहे. टीव्हीवरच्या सिरीयल्स आणि नवे-जुने सिनेमे आपण आता इंटरनेटवरही पाहू शकतो.
संगणकाची तुलना आपण माणसाच्या शरीराशी केली तर सीपीयु म्हणजे मेंदू, कीबोर्ड आणि माऊस म्हणजे हात-पाय, मदरबोर्ड म्हणजे अस्थिसंस्था, आणि हार्ड डिस्क म्हणजे त्याचं पोट हे वर्णन एखादा शाळकरी मुलगा सुद्धा आता सांगू शकेल. समोरचा स्क्रीन किंवा मॉनिटर म्हणजे संगणकाचा चेहेरा असतो. असंच पुढे जाऊन विचार केला तर संगणकाच्या अंगात डिरेक्टरी किंवा फोल्डर्स म्हणजे रक्तवाहिन्या आणि असंख्य प्रकारच्या फाईल्स म्हणजे संगणकाच्या अंगातल्या पेशी असं आपल्याला सुचू शकतं. संगणक जेव्हा फक्त अक्षरं आणि शब्दांपुरता मर्यादेत होता तेव्हा त्याला TXT किंवा टेक्स्ट फाईल तेवढी माहित होती. पुढे जेव्हा चित्रे आणि छायाचित्रे आली तेव्हा JPG, TIFF वगैरे प्रकारच्या फाईल्स जन्माला आल्या. जेव्हा व्हिडीओ व चलत्चित्र आली तेव्हा AVI, MOV, MPEG ह्या फाईल्स अवतरल्या. आवाजासाठी mp3, midi, wav ह्या फाईल्सना महत्व आलं.
ही सारी बाळबोध प्रस्तावना इथे केली याचं कारण - इरफानव्यू. वाचकहो, कदाचित तुमच्यापैकी कितीतरी जण हे इरफानव्यू नावाचं सॉफ्टवेअर वापरतही असतील. कारण गेली अनेक वर्षे एक उत्तम फ्रीवेअर म्हणून इंटरनेटवर ते गाजतं आहे. मी स्वतः गेली किमान आठ वर्षे ते समाधानाने वापरतो आहे. मात्र अशी काही मंडळी असण्याची शक्यता आहे की ज्यांची ह्या इरफानव्यूशी गाठभेट किंवा ओळख अजून झालेली नाही. जर तुम्ही त्या पैकी एक असाल तर ह्या नंतरच्या परिच्छेदात येणारी माहिती तुम्हाला उपयोगाची वाटेल यात शंका नाही.
बहुगुणी इरफानव्यू असं शीर्षक ह्या लेखाला दिलं याचं कारण इरफानव्यू खरोखरीच बहुगुणी आहे. वर उल्लेख केलेल्या फाईल्स म्हणजे JPG, TIFF, AVI, MOV, MPEG, MP3, MIDI, WAV ह्या उघडण्याची वा चालविण्याची व्यवस्था इरफानव्यू मध्ये आहे. पण ह्या झाल्या फक्त ८ प्रकारच्या फाईल्स. इरफानव्यू ची ताकद प्रचंड आहे. तो एकूण ११७ प्रकारच्या फाईल्स उघडू शकतो. त्यातली एखादी TXT किंवा TTF प्रकारची फाईल सोडली तर बाकीच्या सर्व चित्रे, छायाचित्रे, चलत्चित्रे, आकृत्या, चित्रपट, आवाज यांचेशी संबंधित आहेत. थोडक्यात, इरफानव्यू हा ग्राफीक आणि मल्टीमिडीया फाईल स्पेशालिस्ट आहे. तुमचा संगणक नुकताच आणलेला वा नव्याने फॉरमॅट केलेला असेल तर इरफानव्यू त्यावर अग्रक्रमाने लावा असं मी सुचवेन. कारण उद्या समजा तुम्हाला तुमच्या मित्राने PSD प्रकारची फाईल पाठवली आणि तुमच्या संगणकावर अजून अडोबी फोटोशॉप हे महागडं सॉफ्टवेअर आलेलं नसेल तर ती PSD तुम्ही उघडणार कशी? PSD फाईल म्हणजे फोटोशॉपने तयार केलेली फाईल. ती उघडणार फोटोशॉपमध्ये, आणि तुमच्या संगणकावर फोटोशॉप अजून लागलेलंच नाही. हा पेचप्रसंग इरफानव्यू सोडवू शकतो. कारण इरफानव्यू मध्ये PSD फाईल उघडण्याची व्यवस्था आहे. आणखी एक उदाहरण घेऊ. समजा तुमच्याकडे एक चित्र BMP फाईलचे आहे. ते तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर, अर्थात इंटरनेटवर टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला ते चित्र JPG किंवा PNG किंवा GIF ह्यापैकी एका फाईल प्रकारात हवं आहे. तर त्यासाठीही इरफानव्यू तुमच्या मदतीला येतो. BMP, JPG, PNG, GIF ह्यापैकी कोणत्याही प्रकारची फाईल कोणत्याही प्रकारात बदलण्याची व्यवस्था इरफानव्यू मध्ये आहे. फाईल्स हँडलींगच्या बाबतीत इरफानव्यू इतकी बहुगुणी सॉफ्टवेअर्स (आणि त्यातही फ्रीवेअर म्हणजे मोफत असणारं टूल) फारच अपवादात्मक आहेत.
इरफानव्यूचे सारे उपयोग एका लेखात बसवून सांगण अशक्य आहे. इरफानव्यू हा एक चांगला MP3 Player सुद्धा आहे. तुमची MP3 गाणी तुम्ही त्यात ऐकू शकता. इरफानव्यू मध्ये स्लाईड शो तयार करता येतो. तोही अगदी दीड ते दोन मिनिटांत. हा स्लाईड शो तुम्हाला Exe फाईल म्हणून सेव्ह करता येतो. एवढच नव्हे तर तोच स्लाईड शो तुम्ही SCR फाईल म्हणजे Screen Saver म्हणूनही सेव्ह करू शकता. तुमची PDF प्रकारची फाईलही इरफानव्यूमध्ये उघडू शकते. म्हणजे काही कारणाने Acrobat Reader करप्ट झाला असेल तर काळजी नको, इरफानव्यू है ना? अक्षरशः "मै हूँ ना" म्हणत इरफानव्यू तुमच्या मदतीला नेहमीच धावून येतोय असं तुमच्या अनेकदा लक्षात येईल. आणखी एक उदाहरण सांगतो. आपले संगणकावरचे छोटे छोटे आयकॉन घ्या. ते ICO प्रकारच्या फाईलमध्ये साठवलेले असतात. इरफानव्यू मध्ये तुम्ही ते उघडू शकता. एखादा फोटो वा चित्र तुम्हाला आवडलं तर ते Wallpaper म्हणून वापरण्यासाठी इरफानव्यूमध्ये सेटींग उपलब्ध आहे. छायाचित्र शार्प करण्याची, ते ब्लॅक अँड व्हाईट करण्याची, ते अधिक आकर्षक (Enhance) करण्याची सोय देखील त्यात आहे. एखाद्या फोल्डरमध्ये अनेक फोटो असतील तर ते सारे फोटो थंबनेल्स स्वरूपात एकदम पाहण्याची सोय इरफानव्यू मध्ये आहे.
असे अनेक उपयोग. त्यासाठी तुम्ही इरफानव्यू वापरून पहायला हवा. वापरण्यासाठी तो डाऊनलोड करायला हवा. त्यासाठी www.irfanview.com ह्या साईटवर तुम्हाला जावं लागेल. इरफानव्यू तसा छोटासाच प्रोग्राम आहे. जेमतेम १.१० एम.बी. आकाराचा. त्या बरोबरचे प्लगिन्सही तुम्ही घ्यायला हवेत कारण ते खूपच उपयोगी आहेत. ते साधारणतः ७ एम.बी. आकाराचे आहेत. म्हणजे साधारणतः ८ एम.बी. आकाराचा हा इरफानव्यू आहे. इरफानव्यू मधला हा इरफान म्हणजे साधारणतः २३-२४ वर्षांचा तरूण आहे. तो मूळचा बोस्नियाचा. आता ऑस्ट्रिया देशात स्थायिक झालेला. त्याचा फोटो तुम्हाला irfanview.com वर पहायला मिळेल.
आणि हो, एक फार महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. इरफानव्यू हा युनिकोड काँप्लायंट आहे. म्हणजे तुम्ही इरफानव्यूच्या विंडोत मराठी युनिकोड फाँट वापरून टाईपही करू शकता, किंवा चक्क एखादी फाईल मराठी अक्षरात सेव्हही करू शकता. असा हा बहुगुणी इरफानव्यू. हॅटस ऑफ टू यू इरफान. हा प्रोग्राम तू एखाद्या कंपनीला लाखो डॉलर्सना विकू शकला असतास. त्यासाठी बड्याबड्यांनी रांगही लावली असती. पण तू लाखो करोडोंच्या मागे लागला नाहीस. गेली कित्येक वर्षे तू इरफानव्यू फ्री ठेवला आहेस. रियली हॅटस ऑफ टू यू.

आपापली मास्टर 'की'

"ड्राईव्ह" ह्या इंग्रजी शब्दाचे विविध अर्थ आहेत. "लेफ्ट हँड ड्राईव्ह" पासून ते "ब्लड डोनेशन ड्राईव्ह" पर्यंत अनेक छटा त्यात आहेत. पण आपल्या संगणकातले ड्राईव्हज आणखी वेगळे. ते ड्राईव्हज म्हणजे संगणकाच्या मंत्रीमंडळातले कॅबिनेट मंत्रीच म्हणायला हवेत. हार्ड ड्राईव्ह, फ्लॉपी ड्राईव्ह, सीडी ड्राईव्ह असे वेगवेगळ्या प्रकारचे ड्राईव्हज संगणकाच्या कारभारात फार महत्वाची भूमिका बजावत असतात. हार्ड ड्राईव्ह हा तर संगणकाचा गृहमंत्रीच म्हणायला हवा. फ्लॉपी किंवा सीडी ड्राईव्ह ह्या मंत्रीपदाच्या खुर्च्या कायम असल्या तरी मंत्री मात्र सारखे बदलत असतात. आपल्या विंडोज एक्स्प्लोअररवर नजर टाकलीत तर दिसेल की आपल्या फ्लॉपी ड्राईव्हमध्ये फ्लॉपी असो वा नसो, त्याचा 'ए' किंवा 'बी' ड्राईव्ह कायम दिसत असतो. तीच गोष्ट सीडी वा डिव्हीडी ड्राईव्हची. त्यात सीडी असो वा नसो त्या ड्राईव्हला दिलेले अक्षर फाईल मॅनेजरमध्ये कायम दिसत असते. बहुतेक वेळा ई, एफ, जी, किंवा एच ह्यापैकी कोणते तरी एक अक्षर सीडी ड्राईव्हला बहाल केले गेलेले असते. ह्या ड्राईव्हमध्ये सीडी नसताना आपण त्या ड्राईव्हच्या अक्षरावर क्लीक केले तर 'आत सीडी नाही' असा संदेश संगणक देतो.
फ्लॉपी आणि सीडी ड्राईव्हपेक्षा वेगळी यंत्रणा असणारा ड्राईव्ह म्हणजे पेन ड्राईव्ह. पेन ड्राईव्हला युएसबी ड्राईव्ह, फ्लॅश ड्राईव्ह, युएसबी स्टीक वगैरे टोपण नावेही आहेत. पेनाला टोपण असते तशी पेन ड्राईव्हला ही काही टोपण नावे. पेन ड्राईव्हला अलिप्त ड्राईव्ह असेही नाव खरं तर द्यायला हरकत नाही. कारण पेन ड्राईव्ह कोणाचाही नसतो. तो आपला आपण स्वतंत्र असतो. कुठल्याही संगणकात तो गुंतत नाही. आपले अस्तित्व स्वतंत्र ठेवून कुठेही न गुंतणारी कोरडी माणसे जगात असतात, तसा हा पेन ड्राईव्ह कोरडा असतो. तुम्ही ज्यावेळी एखादा पेन ड्राईव्ह तुमच्या संगणकाला लावता, तेव्हा तो तुमच्या संगणकाचा होतो. त्याचे 'जी', 'एच', किंवा 'आय' वगैरे अक्षर तुमच्या संगणकाच्या फाईल मॅनेजरमध्ये दिसू लागते. मात्र हे अक्षर कायम नसते. जेव्हा तुम्ही तो पेन ड्राईव्ह बाहेर काढता तेव्हा बाहेर जाताना पेन ड्राईव्ह त्या संगणकाशी आपले नाते पूर्णपणे तोडूनच बाहेर पडतो. पुन्हा दुसर्‍या एखाद्या संगणकात तो गेला की तिथे तो आपले अक्षर तयार करतो आणि बाहेर पडला की पुन्हा पूर्वीचे नाते तोडून स्वतंत्र राहतो. 'पानी तेरा रंग कैसा जिसमे मिलावे वैसा' अशी हिंदी म्हण आहे. त्या आधाराने म्हणायचे तर 'पेन ड्राईव्ह तेरा अक्षर कैसा कंपुटर में जो मिले वैसा' असं म्हणता येईल.
पेन ड्राईव्ह हे आजच्या पीसी युजर्ससाठी म्हणजे तुमच्या आमच्यासाठी एक वरदान आहे. एक तर मुर्ती लहान किर्ती महान ही म्हण त्याला पुरेपूर लागू पडते. आपल्या कीचेनला पेन ड्राईव्ह लावून फिरणारे आज आयटी क्षेत्रामध्ये अक्षरशः हजारो आहेत. काही जण गळ्यात लॉकेट घालून फिरावं तसे पेन ड्राईव्ह गळ्यात घालून वावरताना दिसतात. जेमतेम पंचवीस-तीस ग्रॅम वजनाचा हा पेन ड्राईव्ह ताकदीने मात्र आपल्या सीडी किंवा अगदी डीव्हीडीपेक्षाही भारी असू शकतो. १ जीबी क्षमतेपासून ते अगदी १६ जीबी पर्यंतचे पेन ड्राईव्हज आपल्याकडे आज अडीचशे रूपयांपासून ते पाच हजार रूपयांपर्यंतच्या किंमतींना अगदी सहजपणे उपलब्ध आहेत. साध्या वह्या पुस्तके विकणार्‍या स्टेशनरी शॉप्समध्येही ते मिळू लागले आहेत यावरून त्यांची वाढती लोकप्रियता आपल्या लक्षात येते.
पेन ड्राईव्ह आणि आजची सीडी किंवा डिव्हीडी यांची उपयुक्ततेच्या दृष्टीने तुलना केली असता पेन ड्राईव्ह शर्यतीत जिंकतो. संगणक चालू होत नसेल तर आपण आपल्याकडील बुट डिस्क किंवा बुटेबल सीडी टाकून तो चालू करण्याचा प्रयत्न करतो. पण बहुतेक वेळा घडतं असं की ती बुटेबल सीडी कधी जागेवर मिळत नाही. अशा वेळी आपल्या खिशात किंवा गळ्यात कायम असणारा पेन ड्रार्ईव्ह उपयोगी पडू शकतो. पेन ड्राईव्हच्या माध्यमातून संगणक बुट करणे शक्य असते. बुटींग व्यतिरिक्त पोर्टेबल प्रोग्राम्स ही पेन ड्राईव्हने करून दिलेली एक फार मोठी सोय आहे. पोर्टेबल प्रोग्राम हा नावाप्रमाणे खरोखरीच पोर्टेबल असतो. पेन ड्राईव्हमध्ये त्याचे इन्स्टॉलेशन झालेले असते. संगणकाला पेन ड्राईव्ह लावताच आपण त्या प्रोग्रामचा वापर सुरू करू शकतो. उदाहरणार्थ, समजा काही कारणाने तुमच्या संगणकातला इंटरनेट एक्स्प्लोअरर करप्ट झाला आहे. तो पुन्हा नव्याने इन्स्टॉल करण्याइतका वेळ तुमच्याकडे नाही. पण चटकन एखादी ईमेल तुम्हाला चेक करायची आहे. अशा वेळी तुमच्याकडे पेन ड्राईव्ह असेल आणि त्यात पोर्टेबल फायरफॉक्स ब्राऊझर असेल तर तुम्ही फायरफॉक्समध्ये इंटरनेट सर्फींग करू शकता किंवा ईमेल चेक करू शकता. मला स्वतःला आवडणारा पोर्टेबल प्रोग्राम म्हणजे मोफत उपलब्ध असणारा अतिशय उपयुक्त असा ओपन ऑफिस सूट. वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट वगैरेच्या फाईल्स तातडीने उघडण्याची वेळ येते आणि नेमका आपला ऑफिस प्रोग्राम त्यावेळी बिघडलेला असतो. अशा वेळी पेन ड्राईव्हमधला ओपन ऑफिस हा अॅप्लीकेशन सूट खूपच उपयोगी पडतो.
पेन ड्राईव्ह हा प्रायव्हसीच्या दृष्टीने आपल्या मोबाईल फोनसारखा आहे. तो सतत आपल्या खिशात वा पर्समध्ये राहतो. इतरांना तो देण्याची वा इतरांनी तो वापरण्याची गरज नसते. त्यात आपल्या खाजगी फाईल्स, हिशोब, फोटो, व्हिडीओज, आवाजाच्या फाईल्स वगैरे आपण ठेवू शकतो. हा सर्व व्यक्तीगत किंवा गोपनीय स्वरूपाचा डेटा Trucrypt सारखे टूल (www.truecrypt.org) वापरून आपण एन्क्रीप्ट करून ठेवू शकतो. त्यामुळे आपला पेन ड्राईव्ह हरवला वा कोणी चोरला तरी त्याला आपला डेटा वाचता वा वापरता येत नाही. एन्क्रीप्शन करून ठेवलेला डेटा हा आपल्याला माहीत असलेल्या पासवर्डशिवाय उघडला जाऊ शकत नाही. त्यामुळे ज्यांना गोपनीय फाईल्स ठेवायच्या आहेत त्यांचेसाठी पेन ड्राईव्हसारखे दुसरे साधन नाही. पेन ड्राईव्हला सीडी वा डिव्हीडीप्रमाणे चरे येत नसल्याने त्या कारणाने तो बाद होऊन पंचाईत होण्याची वेळ येत नाही. मात्र अतिशय निष्काळजी पद्धतीने पेन ड्राईव्ह वापरल्यास तोही अकाली बाद होण्याची शक्यता असते. खूपदा घाईघाईत पेन ड्राईव्ह व्यवस्थित लॉग आऊट न करता खस्सकन खेचून बाहेर काढण्यामुळे डेटा करप्शन तर होतच होतं पण तो कायमचा बाद होण्याची शक्यताही असते. पेन ड्राईव्हमधील डेटा त्यामुळे बॅकअप करून ठेवणे हे अत्यंत आवश्यक असते. काही जण दोन पेन ड्राईव्ह ठेवतात आणि त्यापैकी एकात बॅकअप असतो. मात्र बॅकअप हा नेहमी वेगवेगळ्या प्रकारातील मिडीयामध्ये म्हणजे पेन ड्राईव्हबरोबरच सीडी वा डिव्हीडी तसेच हार्ड ड्राईव्ह अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये एकाच वेळी ठेवलेला असणे केव्हाही सुरक्षित असते.
तुम्ही पेन ड्राईव्ह वापरत नसाल तर अवश्य तुमच्यासाठी एक खरेदी करा. सुरूवातीस अडीचशे रूपयांचा १ जीबी क्षमतेचा पेन ड्राईव्ह खूप होतो. यात तुम्ही तुमचा सारा आवश्यक व महत्वाचा संगणकीय डेटा सतत जवळ बाळगू शकता. बाहेरगावी गेल्यानंतर तर याचा फारच उपयोग होतो. एखाद्या मित्राकडे वा सायबर कॅफेत हा पेन ड्राईव्ह उघडून त्यातील पत्रांच्या प्रिंटस घेणे खूपच सोपे असते. जे महत्वाचे पोर्टेबल प्रोग्राम्स आपल्याला नेहमी लागत असतात त्यांचा उत्तम संग्रह म्हणजे Lupo Pen Suite. हा सूट http://www.lupopensuite.com ह्या वेबसाईटवरून तुम्हाला मोफत डाऊनलोड करून घेता येईल. त्यात २०० हून अधिक अधिकृतरित्या मोफत असणारे उत्तम प्रोग्राम्स व काही गेम्सही उपलब्ध केलेले आहेत. ह्या Lupo Suite वर एक स्वतंत्र लेख लिहीता येईल एवढा त्याचा अंतरंग भरगच्च आहे. अशाच प्रकारचा एक संग्रह portableApps.com ह्या साईटवरही मोफत उपलब्ध आहे.
पेन ड्राईव्हमध्ये महत्वाची सॉफ्टवेअर व इतर आवश्यक डेटा ठेवल्याने त्याचा उपयोग एखाद्या मास्टर की सारखा होतो. एन्क्रीप्शनची सोय असल्याने तो डेटा चोरीस जाण्याची शक्यता नसते. पेन ड्राईव्हची किंमत खिशाला परवडण्यासारखी असल्याने तो सहज घेता येतो, आणि मोबाईल सांभाळताना आपल्या मनात जो एक तणाव असतो तसा तणाव पेन ड्राईव्हबद्दल नसतो. वजनाने फारच हलका असल्याने तो जड होत नाही. त्याची अडचण वाटत नाही. एकूण हे सारे गुण लक्षात घेतले तर प्रत्येकाकडे त्याची स्वतःची एक मास्टर की म्हणजे पेन ड्राईव्ह असायला हरकत नाही अशी शिफारस कोणीही करू शकेल.

रेलगाडीचा उपयुक्त ज्ञानकोश

झुक झुक गाडीच्या आकर्षणानं बालपणाला सुरूवात होते आणि पुढे ती रेल्वेची गाडी आपण गृहित धरायला लागलेलो असतो. पुढे ह्याच रेल्वेगाडीने आपण शेकडो मैलांचा प्रवासही केलेला असतो आणि स्टेशन, रिझर्व्हेशन, बर्थ, लगेज, वेटींग लिस्ट, आरएसी कोटा वगैरे शब्दांचं आपल्याला काहीही वाटेनासं झालेलं असतं. 'लांबचा प्रवास आणि रेल्वे' हे समीकरण आपल्या नकळत अंगवळणी पडून गेलेलं असतं. रेल्वेचा प्रवास अनेकदा केलेला अस ल्याने एक प्रकारचा घट्ट आत्मविश्वास आपल्याला आलेला असतो. ''रेल्वे' चं मला सगळं माहित आहे'' असा आपला आपण सोयीस्कर समजही करून घेतलेला असतो. पण हा समज बर्‍याच अर्थाने गैरसमज असतो. कितीतरी साध्या साध्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. उदाहरणार्थ हे तीन साधे प्रश्न घ्या. १) काही रेल्वे स्टेशनांच्या नावापुढे Road असा शब्द आलेला असतो. उदाहरणार्थ, नासिक रोड, वसई रोड वगैरे. अशा काही विशिष्ट स्टेशनांच्या पुढेच हा 'रोड' का आलेला असतो? २) रेल्वेने प्रत्येक स्टेशनला एक विशिष्ट कोड दिलेला आहे. स्टेशनच्या नावातील इंग्रजी अद्याक्षरांवर आधारित हे कोड असतात. उदाहरणार्थ, दादरला DDR, नागपूरला NGP, अंबरनाथला ABH वगैरे. असं असताना कुर्ल्याचा कोड CLA का? विजयवाडाचा कोड BZW का? किंवा कानपूर सेंट्रलचा कोड CNB का? 3) काही गाड्या Down Trains तर काही Up Trains असतात. हा Down आणि Up प्रकार कसा ठरतो, किंवा कशावर अवलंबून असतो?
खरं तर असे मुद्दे आपण कधी लक्षातच घेतलेले नसतात. कारण आपलं त्यावाचून तसं काही अडत नसतं. पण जेव्हा ते मुद्दे सरळ समोर येऊन उभे राहतात तेव्हा त्यांची उत्तरं पटकन मिळावीत यासाठी आपण अधीर होतो. दादर म्हणजे DDR, मग कुर्ल्याचं KLA का नाही, CLA कसं? त्याचं उत्तर म्हणजे Kurla हे स्पेलींग पूर्वी Coorla असं होतं. त्यामुळे ब्रिटीश काळातील पद्धतीनुसार चालत आलेलं कुर्ल्याचं कोड CLA हेच कायम राहिलेलं आहे. विजयवाडा हा नाव बदलण्यापूर्वी Bezwada होता. त्यामुळे त्याचं कोड BZW; आणि, 'कानपूर सेंट्रल' पूर्वी स्पेलींगने Cawnpore होतं त्यामुळे त्याचं कोड CLA.
तीन पैकी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. इतर दोन प्रश्नांच्या उत्तरांसाठी आपल्या मदतीला येतेय http://www.irfca.org ही वेबसाईट. IRFCA म्हणजे Indian Railways Fan Club. जसे अमिताभ बच्चन, शाहरूखखान आणि रजनीकांत वगैरे अभिनेत्यांचे फॅन क्लब आहेत, तसा फॅन क्लब भारतीय रेल्वेचा असू शकतो ह्या कल्पनेने आपल्याला एव्हाना कौतुक वाटलेलं आहे. भारतीय रेल्वेचा हा फॅन क्लब प्रथम सुरू झाला तो अमेरिकेत. त्यामुळे त्याचं नाव तेव्हा Indian Railways Fan Club of America असं होतं. IRFCA मध्ये शेवटी अमेरिकेचा A आहे तो त्या जुन्या नावामुळेच. IRFCA ची सुरूवात झाली ती ऑगस्ट १९८९ मध्ये अमेरिकेत. मणी विजय (विजय बालसुब्रमण्यम), शंकरन कुमार आणि धीरज संघी ह्या तीन जणांचा प्रायव्हेट ईमेल लीस्ट ग्रुप होता. यातून त्यांच्यात संपर्काची जी देवाणघेवाण व्हायची त्यातून IRFCA ची स्थापना झाली. मेरिलॅंड, येल, कॅलिफोर्निया, सांता बार्बारा ह्या विद्यापीठांच्या लीस्ट सर्व्हरवर १९८९ ते १९९९ ह्या काळात IRFCA चे वास्तव्य राहिले. पुढे तेथून ते OneLIST येथे हलविण्यात आले. ह्या सुमारास IRFCA ची सदस्य संख्या होती फक्त ५० ते १०० च्या दरम्यान. OneLIST हे पुढे eGroups मध्ये विलीन झाले, आणि eGroups चा ताबा नंतर YAHOO ने घेतला. ह्या काळापर्यंत IRFCA च्या सदस्यांमध्ये फक्त अमेरिकतील आणि काही ब्रिटनमधील मंडळी होती. १९९७ नंतर भारतात इंटरनेटचा प्रसार झपाट्याने होत गेल्यानंतर मात्र IRFCA मध्ये भारतीयांची संख्या झपाट्याने वाढत गेली. आज IRFCA मध्ये भारतीय आणि अनेक मराठी नावेही दिसतात. IRFCA ची सदस्यसंख्या आता ३००० च्या आसपास आहे. 
IRFCA चा हा सारा इतिहास आज तुमच्यापुढे अशासाठी ठेवला की तीन जणांनी केवळ गंमत म्हणून सुरू केलेला एक ग्रुप आज हजार पटींनी वाढला आहे. इंटरनेटवर होणारी वाढ अक्षरशः हजारो आणि खूपदा लाखो पटींचीही असू शकते. जेव्हा मनुष्यबळ हजार पटींनी वाढतं तेव्हा ज्ञानाची गंगा दुथडी भरून वाहू लागते. IRFCA चंही तसच झालं आहे. www.irfca.org ही वेबसाईट म्हणजे आज भारतीय रेल्वेचा एक समग्र ज्ञानकोश बनते आहे. ह्या वेबसाईटवर भारतीय रेल्वेसंबंधी अतिशय समृद्ध आणि सचित्र असा माहितीसंग्रह आहे. वाफेच्या रेल्वेगाडीपासून ते आजच्या आधुनिक गाडीपर्यंतच्या शिट्या कशा वाजतात हे दाखवणारा मल्टीमिडीया विभाग सुद्धा त्यात आहे. बोगद्यातून जाणार्‍या, डोंगर-दर्‍यांतून नागमोडी जाणार्‍या गाड्यांच्या व्हिडीओ क्लीप्स, रेल्वेसंबंधी अनेक छायाचित्रे हे सारे मल्टीमिडीयात आहे. भारतभरातल्या सर्व राज्यांतील रेल्वेमार्गांचे नकाशे, गाड्यांच्या आकृत्या (डायग्रॅम्स), भारतीय रेल्वेशी संबंधित पुस्तकांची यादी, आतापर्यंत आलेले रेल्वेविषयक पोस्टाची तिकीटे वगैरे वगैरे यादी करावी तेवढी थोडी आहे. १९३७ साली आलेले ब्रिटीश राजे किंग जॉर्ज (सहावे) यांचे चित्र असलेले रेल्वेविषयक पोस्टाचे दुर्मिळ तिकीट येथे पहायला मिळते. रेल्वे मॉडेलिंगच्या छंदाशी संबंधित संस्था व व्यक्तींची सविस्तर माहितीही इथे आहे. भारतीय रेल्वेचा इतिहास १८३२ सालापासून ते आजतागायत अतिशय सविस्तर असा येथे उपलब्ध आहे. 
ही साईट इतकी वेगवेगळी आणि एवढी आश्चर्यकारक माहिती देते की कुणीही प्रभावित व्हावं. मुंबईत बॅलार्ड पियर नावाचं एक रेल्वे स्टेशन कधी काळी होतं हे वाचून अचंबित व्हायला होतं. ह्या स्टेशनचे छायाचित्र आपण कौतुकाने पहात राहतो. कधी काळी मद्रास (आजचं चेन्नई) ते श्रीलंका (सिलोन) अशी रेल्वे असायची ही माहितीही चक्रावणारी आहे. रेल्वेशी संबंधित प्रवासापासून ते माल वाहतूकीपर्यंतचे आणि अपघातापासून ते सोयी-सुविधांपर्यंतचे सारे नियम इथे वाचायला मिळतात. A पासून ते Z पर्यंतची रेल्वेसंबंधीच्या Abbreviations ची सूचीही इथे तयार आहे. भारतातल्या सर्व रेल्वे स्टेशन्सचे कोडही देण्यांत आले आहेत. आपल्या रेल्वेशी संबंधित तांत्रिक माहितीचीही इथे रेलचेल आहे. ब्रॉ़डगेज, मीटरगेज आणि नॅरोगेज लाईन्सचे स्लीपर्स काय मापाचे (dimensions) असतात इथपासून ते दोन स्लीपर्समध्ये किती अंतर असतं इथपर्यंतची माहिती त्यात आहे. आपल्याला हे कुठे माहित असतं की सामान्यतः ब्रॉडगेज रेल्वेच्या रूळाची जास्तीत जास्त लांबी १३ मीटर (४२ फूट ८ इंच) एवढी असते? मात्र क्वचित काही वेळा २६ मीटर लांबीचे रूळही वापरले जातात.
विशेष गाड्यांचा एक विभाग ह्या साईटवर आहे. त्यात राजधानी एक्सप्रेसपासून ते पॅलेस ऑन व्हील्सपर्यंत आणि फ्लाईंग राणीपासून ते डेक्कन क्वीनपर्यंत अनेक गाड्यांचा इतिहास वगैरे आहे. पण ह्या विभागातील एक गाडी आपलं खास लक्ष वेधून घेते. ती गाडी म्हणजे 'प्रेसिडेन्शियल सलून' अर्थात फक्त भारताच्या राष्ट्रपतींची आणि फक्त त्यांच्यासाठीच सदैव राखीव असलेली गाडी. ही गाडी फक्त दोन डब्यांची आहे. १९५६ साली बांधण्यात आलेले हे आलिशान डबे नवी दिल्ली स्टेशनात कायम उभे असतात. ह्या दोन डब्यांमध्ये राष्ट्रपतींची बेडरूम, लाँजरूम, व्हिजिटर्स रूम, कॉन्फरन्स रूम असा लवाजमा एकीकडे आहे. दुसरीकडे राष्ट्रपतींचे सचिव व इतर कर्मचारी यांचेसाठी काही केबीन्स आहेत. हे दोन्ही डबे सागाच्या फर्निचरने तसेच रेशमी पडद्यांनी सजवण्यांत आले आहेत. 'प्रेसिडेन्शियल सलून' ची परंपरा फार जुनी आहे. १९ व्या व २० व्या शतकात भारताच्या इंग्रज व्हाईसरॉयने त्याचा उपयोग केला होता. १९२७ पर्यंत इंग्रजांची भारतीय राजधानी कलकत्ता येथे असल्याने हा 'प्रेसिडेन्शियल सलून' कलकत्त्यात उभा असे. १९२७ मध्ये इंग्रजांनी राजधानी दिल्लीत हलवल्यानंतर तो दिल्ली येथे आणण्यात आला. अत्यंत आलिशान अशा ह्या गाडीत पर्शियन गालिचे वगैरे वैभवी सजावट होती. ही गाडी वातानुकूलित नव्हती, पण आत गारवा कायम रहावा यासाठी त्यात खास पद्धतीचे पडदे लावण्यांत आले होते. गाडीत चोवीस तास गरम व थंड पाण्याची सोय करण्यांत आली होती. ही गाडी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १९५० साली प्रथमच वापरली. त्यानंतर आलेल्या राष्ट्रपतींनीही त्याचा वापर केला. राष्ट्रपतींची मुदत संपल्यानंतर त्या गाडीतून त्यांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्याचा एक प्रघात त्यानंतर पडला. ह्या प्रघातानुसार गाडी वापरणारे शेवटचे राष्ट्रपती म्हणजे डॉ. संजीव रेड्डी. त्यांनी १९७७ साली राष्ट्रपती भवनाचा निरोप घेताना ही गाडी वापरली. त्यानंतरच्या काळात सुरक्षेच्या कारणास्तव ही गाडी राष्ट्रपतींनी वापरली नाही. १९७७ ते २००३ ह्या २६ वर्षांच्या काळात ही गाडी नुसती उभी होती. नुसती उभी असली तरी तिची निगा उत्तम प्रकारे सांभाळण्याची पद्धत आहे. आपले मागील राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी ही गाडी हरनौत ते पटणा ह्या ६० किलोमीटरच्या प्रवासासाठी वापरली. त्यासाठी ह्या गाडीच्या सजावटीचे खास नूतनीकरण करण्यांत आले होते. त्याचाच एक भाग म्हणून गाडीत प्रगत तंत्रज्ञानाने व उपग्रह यंत्रणेने युक्त अशी आधुनिक संपर्क साधनेही डॉ. कलाम यांच्यासाठी बसविण्यांत आली होती. त्यानंतर मात्र आता गेली सुमारे ५ वर्षे 'प्रेसिडेन्शियल सलून' नवी दिल्लीत शांतपणे उभे आहे. नव्या राष्ट्रपती महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील ह्या 'प्रेसिडेन्शियल सलून' मध्ये कधी बसतील का हे येणारा काळच ठरवील.
थोडक्यात, मुद्दा काय तर www.irfca.org ही लक्षात ठेवून पहावी अशी वेबसाईट आहे. भारतीय रेल्वेचा असा ज्ञानकोश अन्यत्र शोधूनही सापडेल असे वाटत नाही. अवश्य बुकमार्क करावी अशी ही उपयुक्त वेबसाईट आहे.